Wednesday, October 28, 2020

वज्रवाड येथे 650 वर्षांपूर्वीचा शिलालेख


जत तालुक्यातील वज्रवाड येथे ओढ्याच्या काठावर बसवेश्वर मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिक असून चालुक्यांच्या काळात बांधण्यात आले असावे,असे इतिहासकार सांगतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून सभामंडप ,अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागात उभारलेले आहे. परंतु  जुना सभामंडप नष्ट झाला आहे तर अंतराळ आणि गाभारा शिल्लक आहे. अंतराळ भागात दगडी भिंतीवर हळे कन्नड भाषेतील एक शिलालेख कोरला आहे. 12 ओळींचा हा शिलालेख तीन टप्प्यात आहे. मात्र या लेखावर ऑईलपेंटने रंगवण्यात आल्याने तो अस्पष्ट झाला होता. हा ऑईलपेंट काढण्यात आल्यानंतर त्यावरील अक्षरे सुस्पष्ट दिसू लागली. सदर शिलालेखाचा अभ्यास मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.गौतम काटकर यांनी वज्रवाड येथे येऊन केला. हंपी येथील डॉ.कलवीर मंवाचार्य यांच्याकडून त्याचे वाचन करून घेण्यात आले. 1371 मध्ये या बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.त्याचीच नोंद करण्यासाठी हा लेख कोरून ठेवण्यात आला. यावं काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता नष्ट होऊन मुस्लिम राजसत्तेचा अंमल या भागावर होता. अशा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार वज्रवाड येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाळ शेट्टी यांचा मुलगा याने केला. सदर मूळ मंदिर म्हणजे शिवालय आहे. सध्या मात्र बसवेश्वर मंदिर या नावाने ते ओळखले जाते. या मंदिराची रचना आणि बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असून ते उत्तर चालुक्यांच्या काळात बांधलेले असावे. 

वज्रवाड येथे जो शिलालेख सापडला आहे. त्या लेखात तत्कालीन प्रसिद्ध अशा वीरवणज या व्यापारी श्रेणीचा म्हणजे संघटनेचा उल्लेख आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या गावात आढळलेल्या या शिलालेखामुळे सांगली जिल्ह्याच्या इतिहासात अभ्यासकांच्या दृष्टीने एक नवी भर पडली आहे. या व्यापाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आणि जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या शिलालेखाच्या अभ्यासातून स्पष्ट होते.

या शिलालेखात शके 1293 मध्ये साधारण नाम संवत्सराच्या फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रोहिणी नक्षत्र असताना सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ शेट्टी यांच्या मुलाने केला असल्याचे म्हटले आहे. तीन फेब्रुवारी सन 1371 अशी इंग्रजी तारीख येते. हे शिवालय असून त्याच्या अंगभोग आणि रंगभोगासाठी काही जमीन ब्राह्मणांना दान देण्यात आली आहे. शेवटी हा शिलालेख नष्ट करू नये, अशा आशयाचे वाक्य लिहिले आहे. सांगली जिल्ह्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने या लेखाचे महत्त्व आहे.