Monday, June 1, 2020

उमदीचे जागृत श्री मलकारसिद्ध

उमदी येथील मलकारसिद्ध देवस्थान हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा देव म्हणून त्यांची ख्याती आहे. या देवाचा यात्रोत्सव वर्षातून दोन वेळा होतो. भिवर्गी हे मलकारसिद्धांचे मूळ गाव. श्री अमोगसिद्ध देवाच्या औदुसिद्ध, बिळयासिध्द, स्वामाणमुथ्या, कन्नमुथ्या या चार मुलांपैकी कन्नमुथ्या यांचा मुलगा मलकारसिद्ध होय. मलकारसिद्ध देवाला पाच भाऊ आणि एक बहीण होती. करियोगसिद्ध (ता.अथणी), यददनगेरी मलकारी (ता. बागलकोट), कुचनूर मादण्णा (ता.जमखंडी), उमदी मलकारसिद्ध (ता.जत),जोतलकाप्पा उमदी (ता.जत), आरकेरी भ्रमवडियर (ता.विजापूर) व एक बहीण गुबव्वा.
उमदी येथील पाटील रेवणसिद्ध हटदर याला जोतलकाप्पा त्रास देत असल्याने त्या पाटलाने भिवर्गीला जाऊन श्री मलकारसिद्ध यांना बोलावून आणले. तेव्हा ते उमदी हद्दीत आले. उमदी येथे आल्यानंतर त्यांनी आरोळी मारली. त्यावेळी या आवाजाने उमदीतील रेवलसिद्ध मंदिरातून वरच्या बाजूने जोतलकाप्पा पळून गेल्याचा इतिहास आहे. त्यानंतर मलकारसिद्ध उमदी येथे स्थायिक झाला. तेव्हापासून देवाने प्रथम मारलेली आरोळी म्हणजे येथे मोठा भूकंप झाल्यासारखी परिस्थिती झाल्याचा इतिहास सांगितला जातो.
कुचनूर मादण्णा व मलकारसिद्ध देवाची भेट झाली. त्यानंतर मलकारसिद्ध देवाच्या मूर्तीला सुवर्ण लेप दिल्यानंतर यात्रेस सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. देवाच्या पालखी भेटीचा कार्यक्रम दोन वेळा होतो. महाराष्ट्रासह कर्नाटकातील 21 पालख्या यात्रेसाठी येतात. दिवाळीच्या दिवशी व नंतर वर्षातील पाडव्याच्या दिवशी श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेच्या निमित्ताने जनावरांची मोठी यात्रा (प्रदर्शन) भरवली जाते. जत तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून मलकारसिद्ध देवाची यात्रा ओळखली जाते.

62 वर्षातून सुवर्णलेप
62 वर्षातून एकदा सुवर्णलेप देण्याची येथील पद्धत आहे. सुवर्णलेप म्हणजे देवाच्या मूर्तीला सोन्याचा लेप देणे होय. सोन्याचा लेप देण्यासाठी खास चेन्नई येथून कारागिरांना बोलावले जाते. लेपन दररोज रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फक्त श्वास ओढून धरून सोडेपर्यंतच दिला जातो. हा विधी तब्बल तीन महिने चालतो.

No comments:

Post a Comment