Monday, June 15, 2020

दुष्काळी भागाचा आधार दोड्डनाला तलाव

जत तालुक्यातील उमदी,उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, निगडी बुद्रुक या गावांना जलस्वराज्य व भारत निर्माण अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित आहे. मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मात्र दोड्डनाला तलावातील पाण्याचा उपयोग होत आहे. जत तालुक्यासह सर्वत्र1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. खायला अन्न नव्हते, अशा परिस्थितीत शासनाने 1985 च्या दरम्यान मध्यम प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
संखनंतर तालुक्यातील मोठा तलाव मात्र हा तलाव अगोदर पूर्ण झाला आहे. या तलावाची साठवणूक क्षमता मोठी असून या तलावात सोन्याळ, उटगी परिसरातील पावसाच्या पाण्याची ओढ्याद्वारे साठवण होते.
2007 साली उन्हाळ्यात मृत संचय पातळीखाली पाणी
गेले होते. त्यानंतर मात्र दोन वर्षात पर्जन्य वाढ झाल्याने पाणी पातळी टिकून आहे. सध्या तलाव तुडुंब आहे. तलावाकाठच्या शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला छेद देऊन द्राक्ष, डाळिंब, ऊस, पेरू, पपईसह सूर्यफूल, गहू, मका व इतर कडधान्ये घेण्याचा प्रयत्नात आहेत.
बहुसंख्य शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंबसारख्या पिकांना प्राधान्य देऊन आर्थिक प्रगती साधली आहे. डाळिंबासारख्या पिकाला विक्रमी दर मिळू लागल्याने परिसरातील डाळिंब उत्पादकांना चांगला फायदा होऊ लागला आहे. भगवा, गणेश, मृदुला या जातीच्या डाळिंबाना वाढती मागणी आहे. सर्वाधिक बागा
उमदी परिसरात आहेत.
या तलावाच्या पूर्वेला उमदी आहे. कालवे उमदीकडेच
गेल्याने याचा फायदा उमदीकरांना सर्वाधिक आहे. ओसाड पडिक अशी माळरान जमीन तलावातील पाण्यामुळे हिरवीगार बनली आहे. काही शेतकऱ्यांनी परवाना काढून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आपल्या शेतात नेऊन शेतीचे नंदनवन केले आहेत.
निसर्गाच्या अवकृपेमुळे सोन्याळ, उटगी, जा. बोबलाद,
उमदीसारख्या गावांना दरवर्षी हमखास पाणी टंचाई असायची. टँकरची मागणी व्हायची. याच तलावातून टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. आता मात्र चित्र बदलले आहे. जलस्वराज्य व भारत निर्माण योजनेतंर्गत उटगी, सोन्याळ व निगडीबुद्रुक जाडरबोबलाद, उमदी येथील प्रस्तावित पाणी योजना पूर्ण झाली आहे. तर सोन्याळ व उटगी निगडी बु।। या गावांना प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरू आहे. यामुळे सर्व गावांची टंचाई संपण्याच्या मार्गावर आहे. योजना मोठी असल्याने संबंधित गावाकडून (ग्रामपंचायतीकडून) देखरेख व नियंत्रण
योग्यरितीने ठेवणे आवश्यक आहे. तरच या राबवलेल्या
पाणीपुरवठा योजना व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने चालतील अशी अपेक्षा आहे.
बहुचर्चित व सर्वांना ओढ लागलेली म्हैसाळ सहावा
टण्याची कामे जत तालुक्यात येऊ घातलेली आहेत. या
टण्यांतर्गतच्या एका कालव्याचे काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे. या कालव्याचे पाणी नैसर्गिकरित्या या तलावात सोडल्यास कायमस्वरूपी हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले जाईल व भविष्यात कधीच येथील शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही. म्हैसाळ योजनांच्या कामांना गती देऊन कालवा- तलाव जोड प्रकल्प राबवण्याची मागणी या भागातून होत आहे.
या तलावामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा होत
आहे. त्याच्या पाण्यावर परिसरातील शेतकरी चांगले उत्पादन घेत असून त्यामुळे त्याच्या आयुष्यात बदल होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. एकेकाळी दुष्काळी म्हणून हा भाग ओळखला जायचा हमखास टँकर सुरू करावे लागायचे मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलले असून परिसरातील शेतीला या तलावामुळे पाणी उपलब्ध झाले आहे.

No comments:

Post a Comment