Saturday, June 6, 2020

जत पंचायत समितीची वाटचाल


जत पंचायत समितीची स्थापना 1962 मध्ये झाली. तालुक्यात 124 महसुली गावे असून 117 ग्रामपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. पूर्व-पश्चिम लांबी 120 किलोमीटर, तर दक्षिण उत्तर लांबी 67 किलोमीटर इतकी आहे. पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर स्वतःची प्रशासकीय इमारत नव्हती. त्यामुळे जत शहरातील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या बनाळी यांच्या भाड्याच्या इमारतीत पंचायत समितीचे सुरुवातीला कार्यालयीन कामकाज सुरू झाले होते. 1968-69 दरम्यान जत तहसील कार्यालयालगत जत पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम बांधकाम व्यावसायिक खान यांनी पूर्ण केले.
त्यानंतर भाड्याच्या इमारतीमधून शासकीय इमारतीत पंचायत समितीच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. आताची जी इमारत आहे तीच इमारत आता आपली पन्नाशी ओलांडून गेली आहे. या दुमजली इमारतीचे बांधकाम पूर्ण दगडी आहे. पंचायत समितीचा वाढता विस्तार ,त्यानंतर वेगवेगळे विभाग त्यामुळे या इमारतीत त्या त्या येणाऱ्या सत्ताधाऱयांनी अंतर्गत बदल केले. परंतु दर्शनी भागात कोणताच बदल करण्यात आला नाही. तहसील कार्यालय आणि न्यायालय इमारत यांच्या दरम्यान पंचायत समितीची इमारत आहे. जत पोलीस ठाणेदेखील अगोदर तहसील कार्यालय आवारातच होते. मात्र पाच-सहा वर्षांपूर्वी त्याचे नव्या इमारतीत स्थलांतर झाले आहे. अजून कैद्यांचा तुरुंग तहसील कार्यालयाच्या आवारातच आहे. जतला प्रांत कार्यालयदेखील अलीकडेच झाले आहे. महसूल भवन म्हणून उभारण्यात आलेल्या या इमारतीत आता प्रांत कार्यालय आहे.
जत पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक साधारण 35 लाख रुपयांचे आहे. पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या इतर विभागाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेतून निश्चित करण्यात येते. 1990 अखेरपर्यंत जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणाऱ्या सदस्यांना पंचायत समिती सभापती होता येत होते. याशिवाय पंचायत समितीच्या मासिक बैठकीस उपस्थित राहून चर्चेत भाग घेता येत होते. 1990 नंतर शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था नियमात बदल करून पूर्वीच्या नियमात दुरुस्ती केली. त्यानंतर पंचायत समिती मतदार संघातून निवडून येणाऱ्या सदस्यांना सभापती व उपसभापती पदाची संधी मिळत गेली. जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समितीच्या मासिक बैठकांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली नाही. त्यानंतरच्या कालावधीत जिल्हा परिषद सदस्यांचा पंचायत समितीच्या दैनंदिन कारभारातील हस्तक्षेप कमी झाला. त्यामुळे पंचायत समिती सदस्यांना पूर्णतः स्वायत्तता मिळाली.
जत पंचायत समितीचे पाहिले सभापती होण्याचा मान सरदार यशवंतराव सावंत यांना मिळाला. 1962 ते 5 ऑगस्ट 1972 अखेर सलग दहा वर्षे ते सभापती होते. नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करून त्यास प्रशासनाची मंजुरी घेऊन ही इमारत उभी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. 6 ऑगस्ट 1972 ते 12 ऑगस्ट1974 अशी दोन वर्षे बाळकृष्ण शिंदे सभापती होते. यावेळी भयंकर दुष्काळ आणि अन्न टंचाई निर्माण झाली होती. शिंदे यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाला बंडींगची कामे उपलब्ध करून दिली. शिवाय कामावर येणाऱ्या मजुरांना सुकडी आणि स्वस्त धान्य दुकानातून मिलो, काट्याळ व सातू वाटप करण्यात पुढाकार घेतला होता.
14 जून 1979 ते 20 जून 1990 अखेर सलग अकरा वर्षे रामराव सावंत सभापती होते. त्यांनी सभापती या नात्याने तालुक्यावर राजकीय पकड निर्माण केली होती. यशवंतराव सावंत व त्यांचे चिरंजीव रामराव सावंत यांच्या माध्यमातून सावंत घराण्याकडे सलग 31 वर्षे सभापतिपद होते.

No comments:

Post a Comment