Wednesday, June 3, 2020

ग्रामपंचायत ते नगरपरिषद

महाभारत, रामायण आणि इतिहासकालीन दाखले देणारे शहर म्हणून जत शहराकडे पाहिले जाते. आज जत हे शहर तालुक्याचे ठिकाण असले तरी  संस्थानकालीन राजवटीचा वेगळा ठसा व वारसा जत शहराला लाभला आहे. जत येथे संस्थानकाळात १८९३ साली नगर पालिकेची स्थापना करण्यात आली होती. संस्थानानंतर जतच्या नगरपालिकेचे ग्रामपंचायतीत रूपांतर झाले.  १९४९ मध्ये जत संस्थानने प्रजासत्ताक राज्य पध्दतीचा स्वीकार करत संस्थानचे विलिनीकरण केले. त्यानंतर ३० मे १९५३ साली ग्रामपंचायतीची स्थापन झाली.

जत ग्रामपंचायतीला श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी पुर्वीची जुन्या जेलची जागा बक्षीसपत्र म्हणून दिली. एवढेच नव्हे तर डफळे घराण्यांनी दूरदृष्टी ठेवत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नासाठी मंगळवार पेठेतील मारूती मंदिराच्या पुर्वेकडील गोडावून असलेली इमारत व ग्रामपंचायत समोरील जागाही विनाशर्त बक्षीसपत्र करून दिली आहे. डफळे घराण्याचे आराध्यदैवत असलेल्या श्री यल्लम्मा यात्रेची व्यवस्थाही त्याकाळी डफळे ,घराण्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपविली. आता नगरपरिषदेकडेच ही व्यवस्था आहे. यात्रेच्या काळात येणाऱ्या उत्पन्नही ग्रामपंचायतीकडे वर्ग केला जेणे करून या उत्पन्नातून नागरी समस्या दूर करणे ग्रामपंचायतीला सोपे जावे हा मुख्य उद्देश होता. यात्रेला येणाऱ्या भाविकांचे पाण्याविना हाल होत असल्याने विहीर खोदकामासाठी मंदिर परिसरातील १० गुंठे जमीन डफळे घराण्यांनी देवू केली. त्याच विहिरीतून आजही भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जतच्या ग्रामपंचायतीचा प्रथम सरपंच होण्याचा मान माजी पोलीस अधिकारी कै. यशवंतराव कृष्णराव चांदगुडे यांना मिळाला. १९५३ ते १९६२ सालापर्यंत त्यांनी ग्रामपंचायतीची धुरा यशस्वीपणे संभाळली. त्यानंतर बाळकृष्ण खमाजी जाधव, कै. आण्णाप्पा बाबू ऐनापुरे, कै. बाळू हाजी कोरबू मास्तर, रामचंद्र भिमराव पवार, जयसिंगराव बापुसाहेब डफळे, महमद खलील अब्दुल रहिमान खान, महादेव येगाप्पा तंगडी, सुभाष बळवंत कुलकर्णी, उदयसिंह गेणबा संकपाळ, सुरेश बाबुराव शिंदे. भिमराव आप्पा मोरे, नसीर मुल्ला, संजय दऱ्याप्पा कांबळे, अतुल कांबळे, महादेव कोळी , विजयकुमार खाडे ऊर्फ राजू,ईकबाल उर्फ पप्पू गवंडी  यांनी सरपंच पद भूषवले आहे. जतला नगरपरिषद झाल्यावर प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान रवींद्र साळे यांना मिळाला. नंतर काही वर्षे इकबाल गवंडी यांनी नगराध्यक्ष पॅड भूषवले. निवडणुकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत  शुभांगी बन्नेनवर  या थेट लोकांमधून नगराध्यक्षपदी निवडून आल्या आता त्या या पदाची  धुरा सांभाळत आहेत. जत नगरपरिषदच्या त्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून मान मिळवला आहे. 

No comments:

Post a Comment