Thursday, June 4, 2020

जत तालुक्याची हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल

जत तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 2 लाख 24 हजार 824 हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 58 हजार 700 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र 65 हजार 700 हेक्टर तर रब्बीचे 93 हजार 300 हेक्टर क्षेत्र आहे. गायरान क्षेत्र 2 हजार 667 हेक्टर, मुलकी पड क्षेत्र 1 हजार970.73 हेक्टर आहे. तालुक्यातील एकूण बागायती क्षेत्र 22 हजार75 हेक्टर तर जिरायती क्षेत्र 62 हजार299 हेक्टर आहे.  जत तालुक्यातील एकूण महसूल गावे 123 आहेत. ग्रामपंचायती 117 आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 427.5 मि. मी. इतके आहे. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. 25 वर्षांपूर्वी शेती ही उदारनिर्वाहापुरती केली जात होती. ही शेती फक्त पावसाच्या भरवशावर केली जायची. अन्नधान्ये, कडधान्ये व गळीत धान्याची पिके घेतली जात होती. पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असल्याने मिळणारे उत्पन्न अत्यल्प होते.

आज शेतीत शेतकरी नवं नवे तंत्रज्ञान वापरत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून व त्याचा काटकसरीने वापर करून फळबागा, भाजीपाला या नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. विहिरी,कुपनलिका, शेततळे यांच्यामाध्यमातून पाणी उपलब्ध केले जात आहे. माळरानावर डाळिंब, द्राक्षे, बोर या फळबागेतून चांगले उत्पादन घेऊन शेतकरी आपली आर्थिक समृद्धी साधत आहेत. राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. ग्रामीण भागातील रोजगार,व्यापार, छोट्या-मोठ्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. शेती व्यवसायावर आधारित गावपातळीवर व्यवसाय केले जात आहेत. शेळ्या-मेंढ्या पालन यातून दूध, अंडी-बकरी विक्री यातून घराला बरकत आली आहे. काही गावे तर बागायतदारांची, व्यापारांची म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
पूर्वी गावात ठराविक धंदे असलेली दुकाने चालत होती. आज प्रत्येक गावात अनेक कृषी सेवा केंद्रे सुरू आहेत. डिप्लोमा, कृषी पदवी, बी.एस्सी., एम.एस्सी. असे सुशिक्षित युवक कृषी केंद्रे सुरू करून आपला रोजगार निवडला आहे. याशिवाय आपल्या नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीची शेतीही करत आहेत.
जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र आज आठ हजार एकर आहे. पूर्वी द्राक्षे शेती जेमतेमच होती. मात्र तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुक्यात जमिनी घेऊन द्राक्षे पिकवायला सुरू केल्याने आणि त्यात नफा चांगला असल्याने या भागातील शेतकरी लोकांनीही द्राक्ष शेती निवडली. आज जतची द्राक्षे परदेशात निर्यात होत आहेत. द्राक्षे शेती साधारण 15 वर्षांपासून आधुनिक पद्धतीने केली जात आहे. बेदाणा निर्मितीही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जतच्या पूर्व भागात उमदी,सिध्दनाथ, मोरबगी, सोनलगी, बेळोंडगी, जालिहाळ खुर्द, दरिकोनूर या भागात दर्जेदार सुटेखान बेदाण्याची निर्मिती केली जाते. या हिरव्या दर्जेदार सुटेखान बेदाण्यास उच्चान्की 350 ते 400 रुपयांचा दर मिळविलेला आहे. दरवर्षी तालुक्यातून 2 हजार कोटींची उलाढाल होते.
बेदाण्याबरोबरच द्राक्षांचे मार्केटिंग केले जाते. बिळूर,तिकोंडी, भिवर्गी, करजगी, डफळापूर या भागातील शेतकरी मालाची व्यापाऱयांच्या साहाय्याने जागेवरच किलो दराने विक्री करतो. एजंटांच्या साहाय्याने बंगळूर, चेन्नई, विजयवाडा येथे द्राक्षे पाठवतो. दरवर्षी एक हजार कोटींची उलाढाल होते. ही द्राक्षे श्रीलंका, जर्मनी, रशिया, इटली, इंग्लंड, नार्वे या देशांमध्ये निर्यात होतात. जत तालुक्यातील अमृतवाडी, रामपूर, जत, तिकोंडी येथील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतो. निर्यातक्षम द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने निर्यातक्षम द्राक्षांच्या उत्पादनात वाढ होत आहे.
तालुक्यात डाळींबाचे क्षेत्र 5 हजार500 एकर आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात फळपीक येत असल्याने शेतकऱ्यांनी माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी होऊन सुद्धा शेतकऱ्यांनी स्वखर्चातून शेततळी बांधली आहेत. कमी पाण्यावर दर्जेदार डाळींबाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यातील दरीबडची, वाळेखिंडी,काशीलिंगवाडी, बेवणूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, उमदी भागात डाळींबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. दरवर्षी डाळींबाची सुमारे दीड हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.
फळबागेतून चांगले आर्थिक उत्पादन मिळत असल्याने आर्थिक सुधारणा झाल्या आहेत. फळाबागांमुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. द्राक्षे छाटणीपासून ते काढणी, बेदाणा निर्मिती, खरड छाटणीपर्यंत रोजगाराची संधी मिळते.
सध्या अनेक गावांत मजुरांची टीम तयार आहे. चारचाकी, टमटम करून बागेतील कामावर 25-30 किलोमीटर अंतरापर्यंत ते जातात. गाडीभाडे शेतीमालक देतो. महिलांना 400 आणि पुरुषांना 500 रुपये रोज रोजगार मिळतो. छाटणी, डॉरमिक्स लावणे, पेस्ट लावणे याची मजुरी वेगवेगळी आहे. आपल्या भागात रोजगार मिळू लागल्याने ऊस तोडणीला जाणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. रोजगाराची उलाढाल कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.
म्हैसाळ योजनेच्या कामास 1986 मध्ये सुरुवात झाली. टप्पा क्रमांक 6 व 6 ब ची कामे सर्वसाधारण आराखड्यानुसार सुरू असून जत कालव्यावरील वितरण व्यवस्थेची कामे प्रगतीपथावर आहेत. बिळूर कालवा भाग 1 वरील थेट बांधकामे पूर्ण झाली आहेत. 1994 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती करण्यात आली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या जत भागातील कामांवर 2009 पूर्वी 7227 कोटी, मार्च 2018 अखेर 189.28 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. सहाव्या टप्प्याची 70 किलोमीटर कालव्याची कामे झाली आहेत. 11 किलोमीटर अंतरावरील कामे अपूर्ण आहेत. सध्या म्हैसाळ योजनेतून 34 हजार472 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी जतच्या पश्चिम ,उत्तर व दक्षिण भागात आले आहे. या भागातील शेतीचे रूपच पालटले आहे. शेतीमध्ये हरितक्रांती झाली आहे. ऊस,मका,भाजीपाल्याची शेती केली जात आहे. द्राक्षे, डाळींब, फळबागांचे क्षेत्र वाढत आहे. या भागातील शेतकरी गटशेती, समूहशेती करत आहेत. भाजीपाला कोल्हापूर, पुणे,वाशी (मुंबई) येथे पाठवला जात आहे. नगदी पिके घेतली जात आहेत. कुंभारी, बनाळी, माडग्याळ, शेगाव ,कोसारी भागात भाजीपाल्याची शेती करीत आहेत. नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा आल्याने आर्थिक स्थिती व राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. भाजीपाला शेतीतून दरवर्षी 1हजार कोटींची उलाढाल होते. झोपडी,छप्पर, मातीची घरे जाऊन पक्की,सिमेंट काँक्रीटची घरे तयार झाली आहेत.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेपासून जत पूर्व भागातील वंचीत 64 गावातील शेतकऱ्यांकडून पाण्याचा काटकसरीने उपयोग करून फळबागेची शेती केली जात आहे. शेततलाव बांधले आहेत. तेथे मत्स्य पालनाचा व्यवसाय केला जात आहे. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन पूर्वीपासून केले जाते. पूर्वी हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने केला जात होता. आज हा व्यवसाय व्यापार दृष्टिकोन ठेवून केला जात आहे. दुधाळ जनावरे पाळण्याकडे कल वाढला आहे. जास्त दूध देणाऱ्या गाई, म्हशी पाळल्या जात आहेत. गावोगावी दूध,दही,ताक विकणारे गवळी होते.आज त्यांची जागा दूध डेअरीने घेतली आहे. प्रत्येक गावात दूध संकलन केंद्रे आहेत. दुष्काळी परिस्थितीतही रोज लाखभर लिटर दूध संकलन होते.
पूर्वी शेतकऱ्यांच्या दावणीला खिलार व देशी म्हशी होत्या. आज दावणीला जर्सी, मुऱ्हा,जाफराबादी या जास्त दूध देणाऱ्या गाई,म्हशी आहेत. शेती व्यवसायाला भक्कम असा दूध व्यवसायाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. डेअरीमधून महिन्याला हजारो, कोट्यवधी ची उलाढाल होते. जत तालुक्यातील वाळेखिंडी गावात खवा आणि पेढ्याचा व्यवसाय केला जातो. तसेच शेळ्या-मेंढ्याचाही व्यवसाय केला जात आहे. त्याचबरोबर सिंदूरचे पेढे प्रसिद्ध आहेत. माडग्याळ जातीची मेंढी विकसित करण्यात आली आहे. अधिक उत्पन्न मिळवून देणारी ,जास्त मागणी आणि अधिक प्रतिकारशक्ती असलेली जात शोधल्यामुळे त्यातून पशुपालकांना अधिक उत्पन्न मिळते आहे. माडग्याळी मेंढीचे मांस चविष्ट असल्याने बाजारात मोठी मागणी आहे.
शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्याने दुष्काळी भागातील अर्थकारण बदलले आहे. शेती व्यवसायावर आधारित उद्योग-व्यापार गावागावात वाढला आहे. छोटेमोठे उद्योगधंदे तयार झाले. इलेक्ट्रिक दुकाने, कृषी सेवा केंद्रे, हॉटेल्स, कापड दुकाने ,भांडी वस्तू, व दुचाकी वाहनांची शोरूम्स ,गॅरेज, मोबाईल शॉपी, महासेवा केंद्रे, स्वीट मार्ट, कॉम्प्युटर सेंटर, खानावळी, बेकरी यांसारख्या उद्योग धंद्यातून सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागात वस्तू मिळू लागल्याने उलाढाल वाढली आहे.
ग्रामीण भागात वीस वर्षांपूर्वी शिक्षणासाठी सरकारी शाळा होत्या. फी न घेता शिक्षण मिळत होते. आज परिस्थिती बदलली आहे. बालवाडीपासून इंग्लिश मिडीयम, अकॅडमी, शिकवणीचे वर्ग सुरु आहेत. व्यावसायिक प्रशिक्षण देणारी केंद्रे सुरू आहेत. यावर आधारित व्यवसायात वाढ झाली आहे. आज ग्रामीण सुपर स्पेशालिटीने सुसज्ज रुग्णालये आहेत. दळणवळणाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नव्हत्या. आता पक्के रस्ते तयार झाले आहेत. दळणवळण सुविधांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारात पाठवणे सुलभ होणार आहे. गावागावात पापड,लोणची, तिखट, मसाला, शेंगदाणे चटणी, शेंगदाणे पोळ्या, शेवया, बाजरीची भाकरी आदी घरगुती व्यवसाय केले जात आहेत. बचत गटाच्या माध्यमातून कलाकुसरीच्या वस्तू, बाजरीची भाकरी तयार करून विक्री केली जात आहे. यातूनही आर्थिक उलाढाल होत आहे.

No comments:

Post a Comment