स्वातंत्र्य मिळून दोन दशके उलटली होती. देशभरातील संस्थाने खालसा झाली होती. तीन-चार वेळा सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. काँग्रेसच्या सत्तेची बीजे खोलवर रुजली जात होती. गरीबी निर्मूलन आणि शिक्षण यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि अंमलबजावणी चालू होती. लोकसंख्या नियंत्रणासोबतच वाढत्या लोकसंख्येच्या शिक्षणाचा प्रश्न सामाजिक सुधारणेतला महत्वाचा अडसर बनू पहात होता. दुष्काळ, रोगराई, अन्नधान्य टंचाई या प्रश्नाने जसा देश बेजार होता. तशीच अवस्था या तालुक्याची आणि येथील जनतेची होती. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेणारा एक सहृदय योद्धा या तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेवून चिंतन, मनन करीत होता. १९६८ चे साल होते.
तालुक्यात उच्च शिक्षणाचे एकही केंद्र नव्हते. मुठभर धनिकांची मुले सांगली-कोल्हापुरात जावून शिक्षण घेत होती. तर काही होतकरू गरीबांच्या मुलांना शासकीय बोर्डीगपर्यंत पोहोचण्यासही पैसा मिळत नव्हता. याचवेळी रयत शिक्षण संस्थेकडून शिक्षकांच्या नोकरीचा राजीनामा देवून श्री स्वामी विवेकानंदांच्या विचाराने प्रेरीत होवून रामानंद भारतीच्या सहकार्यातून गोविंद साळुखे उर्फ शिक्षणमहर्षि डॉ. बापूजी साळुखे यांनी शिक्षणाची गंगा गावागावात पोहोचवण्याचे व्रत्त घेतले होते. १९५४ सालातच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था या नावाची संस्था स्थापून ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार हे ध्येय ठरवून महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या बरोबरीने गावोगावी संस्कार केंद्रे उभारली जात होती. यावेळी जतच्या संस्थानिकांच्या नजरेत डॉ. बापुजी साळुखे यांचे कार्य व महती आली, दोन महान विभुतींची भेट झाली. दुग्धशर्करा योग होता. तो तालुक्याच्या दृष्टीने राजाने स्वत:च्या मालकीची सुमारे २८ एकर जागा एका इमारतीसह शिक्षण केंद्राला देवू केली. देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी ओळी असे झाले असेल तेव्हा डॉ. बापुजी साळुखे यांना १९६८ साली झालेल्या भेटीला आणि चर्चेला १९६९ च्या जुन महिन्यात मूर्तस्वरूप प्राप्त झाले आणि राजे रामराव महाविद्यालय नावाचं एक नव संस्कार केंद्र विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जतकरांच्या सेवेला अवतरले. पहिल्या वर्षी केवळ ६५ ते ७० विद्यार्थी आणि कला व वाणिज्य या दोन विद्याशाखा चालू झालेल्या या महाविद्यालयात आज कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यवसाय शिक्षण, स्पर्धा परीक्षा यासारख्या विद्या शाखांचे ज्ञानदान होते. या महाविद्यालयात आज तीन हजाराहून अधिक विद्यार्थी आहेत. केवळ चार ते पाच शिक्षकांची संख्या आता शेकड्यावर पोहोचली आहे. घोड्यांच्या पागा समजली जाणारी १० ते १२ खोल्यांच्या कौलारू इमारतीचे आता २२ खोल्यांची दुमजली आर.सी.सी. इमारत, सुमारे ५० मुलींच्या राहण्याची सोय असणारे अद्ययावत महिला वसतीगृह, जिमखाना, ग्रंथालय, प्रयोगशाळा यासाठी स्वतंत्र इमारती उभारल्या गेल्याने येथे भव्यता प्राप्त झाली आहे. चिटणीस हे या महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवणार पहिले प्राचार्य. त्यांनी लावलेल्या या रोपट्याला अनेकांनी पाणी घातले संरक्षण दिले पण, हे रोपटे बहरले ते प्राचार्य शामराव चव्हाण यांच्या कारकीर्दीत, अर्थशास्त्रातील पदवी लंडनमध्ये घेवून परत आलेले चव्हाण महाविद्यालयात आले आणि या महाविद्यालयाचा उसा केवळ जिल्हा, विद्यापीठ आणि राज्य पातळीवर उमटला, असे नाही तर तो देशपातळीवरही उमटू लागला.
दुष्काळी पट्ट्यात वाढलेल्या तरूणांच्या शारीरिक क्षमतांचा अंदाज घेत खेळ म्हणजे चैन समजणाऱ्या या भागात खेळातून विकासाकडे हा नवा संदेश रूजविला. महाविद्यालयाकडे असणाऱ्या क्रीडांगणाचा वापर करीत १९७६-७७ यावर्षी के. बी, माळी या विद्यार्थिनीने वीस कि.मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले. ७७-७८ साली खंडू कोळेकरने आठशे मीटर धावण्यात राष्ट्रीय पदक प्राप्त केले. ७८-७९ साली दत्ता मोहिते याने पाच हजार मीटर धावण्यात राष्ट्रीय पातळीवर व्दितीय क्रमांक मिळवला. तर ७९-८० साली
बाळासाहेब वाघमोडे ५००० मीटर धावण्यात राज्यात पहिला आला आणि राष्ट्रीय पातळीवर चौथा आला. ८०-८१ साली सिद्राम चव्हाण याने ८०० मीटर धावण्यात तिसरा क्रमांक मिळवला. म्हाळू कोळेकर याने १०,००० मीटर धावण्यात राज्यात प्रथम क्रमांक व राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चौथा क्रमांक पटकाविला. १९८१-८२ साली श्रीमंत ठोंबरे यांनी २० कि. मी. चालण्यात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर राष्ट्रीय
पातळीवर चौथा क्रमांक मिळवला. नागनाथ मोटे याने ८२-८३ साली २० कि.मी. चालण्यात निवड करून घेतली आणि ८३-८४ सालात राज्यात तिसरा आणि देशात पाचवा क्रमांक मिळवला. रावसाहेब रानगर याने ८३-८४ सालातच ५००० आणि १० हजार मीटर धावण्यात यश संपादन केले. तर ८६-८७ साली काका रूपनर १५०० मीटर धावण्यात दुसरा आला. कुशाबा करे याने २० कि. मी. चालण्यात राज्यात दुसरा येण्याचा मान ८९-९० सालात मिळवला. याशिवाय कुस्ती, खो खो आणि बास्केटबॉल आदी स्पर्धातून गाजलेले माळी बंध,ू डफळे भगिनी, कोरे यांची कामगिरी उल्लेखनीय होती. क्रीडा क्षेत्रातील या महाविद्यालयाने कामगिरी आजही झळाळी आणणारीच आहे. यानंतर काही काळ प्राचार्य भगवानराव बाबर यांनी धुरा सांभाळली आणि नंतर पोपटराव चव्हाण प्राचार्य म्हणून रूजू झाले. चव्हाण यांनी या महाविद्यालयात विज्ञान शाखा चालू करण्याचे स्वप्न पाहिले आणि मग पुढे प्राचार्य अशोकराव जगताप यांच्या काळात विज्ञान शाखा उदयास आली. महाविद्यालयाच्या नव्या इमारतीसाठीचा निधी गोळा करण्याचे चव्हाण यांचे कसब आणि शैली याची वाहवा करण्यासारखी होती. तमाशा मंडळापासून ते गुरूवारच्या बाजारापर्यंत सर्वांकडून निधी गोळा करणे, जतच्या यात्रेत प्राध्यापकांच्या ड्युट्या लावून मदत गोळा करणे इतकेच काय बाजारपेठेत फिरून स्वतः मदत गोळा करायचे हे आठवताना आता पुलाखालून बरेच पाणी गेल्याची जाणीव होते. यानंतर आलेले प्राचार्य विरसिंह इंगळे यांनी महाविद्यालयात मुक्त वातावरण निर्माण करीत कुणी कुणाला काम सांगण्यापेक्षा ते आपले आपण समजून केल्यास प्रभावी होते याचा साक्षात्कार घडविला. त्यांच्याच प्रयत्नाने आणि कल्पकतेने ग्रंथालयाची देखणी इमारत उभी आहे. जागोजागी स्वत:च्या नावाच्या पाट्या लावण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांनी प्राचार्य चिटणीसांपासून ते विरसिंह इंगळे पर्यंतच्या सर्वांचाच आदर्श घ्यावा. यापैकी एकाचेही नाव महाविद्यालयाच्या प्रांगणात कोरलेले नाही मात्र ही नावे हजारो जतकरांच्या मनामनात कोरलेली आहेत.त्यामुळे आजवरचा हा उज्ज्वल इतिहास आणि परंपरा पाहून असेच म्हणावे वाटते की महाविद्यालय म्हणजे जत तालुक्याच्या शैक्षणिक विकासाचा मानबिंदू आहे.
No comments:
Post a Comment