Thursday, June 4, 2020

लेखन परंपरेच्या पाईकांची भूमी


कडलास आणि आलेगाव या सांगोला तालुक्यात वास्तव्यास राहून जत तालुक्यातील येळवी गावात वास्तवास आलेला बाळकृष्ण कावडे यांचा कार्यकाला नक्की कोणता? याचे उत्तर आज तरी मिळत नाही. संपूर्ण शाकाहारी गाव आणि बनशंकरीचा सहवास या गोष्टीचे आकर्षण निर्माण झाल्याने हे बाळकृष्णबुवा बनाळीत स्थायिक झाले. त्यांनी या गावात
एक मठही बांधला. जीर्ण आणि भग्न अवस्थेत हा मठ आजही बाळकृष्ण बुवाच्या वैभवाची आणि कार्याची जाणीव करून देतो आहे. या बाळकृष्ण कावडे बुवांची पाचवी पिढी जगण्यासाठीचा संघर्ष करीत असली तरी त्यांचा शिष्य असणारे काराजनगी येथील कीर्तनकार आणि शाहिरी कवने करणारे मार्तड कुलकर्णी यांची शेकडो कवने आपल्या संशोधनाचा विषय केला आहे.
आवंढीच्या प्रा. कोडग यांच्या मते मार्तंड कुलकर्णीचा कार्यकाल १८८०-१९२० चा आहे. जर बाळकृष्णबुवा मार्तंडचे गुरू असतील तर त्यांच्या कार्यकाल १८८० पूर्वीचा असावा-असा अंदाज आहे. मंडळी हे सर्व लिहण्याचे कारण म्हणजे या कावडे बुवांनी दत्त सांप्रदायावरचे दोन ग्रंथ लिहिले असा संदर्भ सापडतो आहे. जर हे सत्य असले तर तालुक्यातीलच काय पण जिल्ह्यातील पहिला ग्रंथकार म्हणून बाळकृष्ण कावडे बुवा ओळखले जातील. या सिध्दतेची जबाबदारी आता पुरातन संशोधकाचीच आहे पण स्वातंत्र्यापूर्वीचा पहिला जतचा नावलौकिक मिळविणारा साहित्यिक कोण असेल बरं?
डॉ. श्रीपाद जोशी हे नाव जतच्या साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात अग्रक्रमाने घ्यावे लागते याचे कारण मराठी साहित्यातली डॉक्टरेट पदवी संपादन करूनही त्यांनी स्वत:ला जतकर करवून घेतले. ज्या काळात त्यांनी डॉक्टरेट मिळवली त्याकाळी पुण्यामुंबईत चांगल्या संस्थेत आध्यापकी मिळत असतानाही त्यांनी जतकरांच्या सेवेचा घेतलेला वसा सोडला नाही. संपूर्ण बालपण नदीकाठनं घालवताना झालेली 'होरपळ' आणि जतच्या माळरानावर पिण्याच्या पाण्याची चिंता करीत निर्माण केलेली त्यांची 'हिरवळ' नव्या पिढीला मार्गदर्शक आहे. त्यासाठी त्यांचे आत्मचरित्र 'होरपळ आणि हिरवळ' प्रेरणादायी तर आहेच पण प्राचार्य राम शेवाळकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेमुळे या ग्रंथाला एक वैभवप्राप्त झालं आहे. अनेक नियतकालीकातून केलेले जोशी सरांचे लेखन अविस्मरणीय आहे.
त्यांचेच समवयस्क असणाऱ्या आणखी दोन व्यक्ती म्हणजे एक विष्णुपंत खोचीकर. गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या खोचीकर सरांना वाचनांचा छंद अफाट, त्यांनी डॉ.ए.पी.जे. कलाम यांच्यावरच्या एका पुस्तकाचे भाषांतर प्रकाशित केले आहे. दुसरे नाव म्हणजे प्रमोद पोतनीस. प्रमोद पोतनीस सरांनी मराठा विद्या मंदिरचे एकेकाळचे सर्वेसर्वा बाबासाहेब गावडे यांच्यावरचा एक गौरवग्रंथ लिहिला आहे. साहित्य क्षेत्रात तालुक्यातून नव्याने उदयास येत असणारे आणखी एक नाव म्हणजे प्रा. पांडुरंग वाघमोडे. त्यांनी लिहलेली डोंगरचा राजा, धुळदेवाची कहाणी, अहिल्यादेवी आणि महात्मा बसवेश्वर आदी देवतांवरची पुस्तके त्यांच्या धार्मिक अभ्यासाची गती सांगतात. 'पंगची आई' आणि 'मॅडवाडा' ही पुस्तके वाचकाच्या हातात भेटीला येणार आहेत.
लवकुमार मुळे या शेगावच्या तरूणांने साहित्य निर्मितीत आणि साहित्य चळवळीत घेतलेली उडी साहित्याच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. साहित्य चळवळ स्थापून ती जोपासण्यासोबतच 'गुलमोहर' आणि ' माझ्या गावचं गाणं" असे दोन कवितासंग्रह प्रकाशित केले.
शेगावचाच सुपुत्र असणाऱ्या अपंग महादेव बुरूटे यांनी साहित्य चळवळीत सहभाग घेत साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने आणि जेष्ठम कवयाने शांता शेळके यांच्या गौरवोद्गाराने 'रानपावली' नावाचा कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यांनी लिहलेला 'साधुची युक्ती' हा बालकथासंग्रह तर पुरस्काराचा मानकरीच ठरला आहे. महादेव लिहू पाहत असणारे 'काटेरी गुलाब' नावाचं आत्मचरित्र म्हणजे शारिरिक अपंगात्वर इच्छाशक्तीनं केलेली यशस्वी मात कशी असू शकते याच सोदाहरण असणार आहे.
जतमथल्या दोन सुप्रसिध्द धन्वंतरी आणि एकमेकीच्या परममैत्रिणी म्हणजे डॉ. सरिता पट्टणशेट्टी आणि डॉ. वैशाली सनमडीकर. आपला वैद्यकीय व्यवसाय, घर, संसार सांभाळत 'कवितेच वेड जोपासलं. डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांनी 'शिंपला' नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. स्वामी विवेकानंद आणि महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा पगडा असणाऱ्या सरिता नावाप्रमाणेच शब्द सरिता आहेत. त्या लेखनप्रवाही व्हाव्यात कवितासंग्रह लिहून साहित्यीक जगातला घातलेल्या सादेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला.  कवितेचं वेड जोपासणं वेगळं आणि कवितेसाठी वेडं होणं वेगळं. कवितेसाठी वेडा झालेला एक माणूस माझ्या पाहण्यात आला तो उमदीचा कै. सिदु यदू वाघमारे गुरुजी. कविता लिहण्याचे वेड नाही तर सादरीकरणाचेही वेड लागलेल्या गुरूजींनी घरातली भांडी विकून संमेलनाला हजेरी लावली ती एका कवितेच्या सादरीकरणासाठी. त्यांच्या पश्चात त्यांचा 'स्वप्नपूर्ती' कवितासंग्रह त्यांच्या वारसांनी प्रकाशित केला.
प्रा. जयसिंग सावंत हे नाव आता पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम वक्ता म्हणून समोर येत असले तरी त्यांचा मुळचा पिंड लेखकाचाच आहे. आजवर त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याच्या नादात लेखणीतली शाई थिजणार नाही याची दखल ते घेतील यात शंका नाही.
डॉ. रविंद्र आरळी हे नाव तालुक्यातील नामांकित स्त्रीरोग तज्ञ म्हणून जितके प्रसिध्द आहेत तितकेच ते एक प्रभावी वक्ता म्हणूनही प्रसिध्द आहे. त्यांनी लिहिलेल्या स्त्रियांच्या आजारावरील ‘समज-गैरसमज' हे पुस्तक सामान्य महिलांच्या आजारावर औषधाविना असणारा उपचार आहे.
मच्छिद्र ऐनापुरे याने केलेला चित्रपटाचा आणि त्या संबधातील इतर बाबीचा अभ्यास त्यांच्या लेखणीने अनेकदा सिध्द केला आहे. बालकथा, चित्रपट कोडे, प्रासंगिक लेख, मुलांचे विनोद आदी प्रकारचे विपुल लेखन केले आहे.जत तालुक्याच्या साहित्य क्षेत्रास फार मोठी परंपरा नाही. ज्या मोजक्याच साहित्यीकांनी लेखक केले, त्यांनी आपल्या नावाचा सुस्पष्ट ठसा उमटविला आहे. त्यापैकी एक आहेत, मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे. प्राथमिक शिक्षक, अभ्यासू पत्रकार व साहित्यीक म्हणून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. जत तालुक्यातील ते असे एकमेव साहित्यिक आहेत, ज्यांची पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली आहे. बालकथा, विनोदी कथा, व्यक्तीचित्रे व वृत्तपत्र लेख असे त्यांनी विपुल लेखन केले आहे.
मच्छिंद्र ऐनापूरे यांचा जन्म दि. १ जून १९७४ रोजी मुचंडी ( ता.जत जि. सांगली) येथे झाला आहे.ते मूळचे जतचे रहिवाशी आहेत. त्यांचे शिक्षण जत, सांगली आणि मिरज येथे झाले. ते पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जत तालुक्यातील उंटवाडी, जत नंबर ३, अमृतवाडी, लमाणतांडा (निगडी बुद्रुक), एकुंडी आदी गावांमधील शाळेत त्यांची सेवा झाली आहे. त्यांचे ‘जंगल एक्सप्रेस', 'मौलिक धन' , 'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' हे बालकथासंग्रह, 'हसत जगावे' हा विनोदी कथासंग्रह तर 'सामान्यातील असामान्य' हा व्यक्तीचित्रसंग्रह प्रकाशित झाले आहेत. याशिवाय त्यांचे दहाच्यावर विविध विषयांवरचे ब्लॉग आहेत. याचा लाभ देश आणि जगभरातील लोक घेत आहेत. याशिवाय सर्वच आघाडीची दैनिके, साप्ताहिके, मासिकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. पंचवीस वर्षांपासून ते पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. 'जनप्रवास', 'केसरी','प्रभात', 'महासत्ता', 'संचार' या दैनिकात काम केले आहे.  २०११पासून त्यांनी स्वत:चा ब्लॉग तयार केला असून त्यावर १४०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. याशिवाय 'जत न्यूज' हे न्यूज पोर्टलही ते चालवत आहे. चित्रपट, जनरल नॉलेज, आरोग्य, बालसाहित्य, हिंदी साहित्य, चित्रकला, प्रेरणादायी आदी विषयांवर त्यांचे लेखन विविध ब्लॉगवर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ, पूणे यांनी २०१७ या वर्षांतील इयत्ता आठवीच्या बालभारती पुस्तकात त्यांच्या लेखाची निवड केली आहे. त्यांची 'धाडसी कॅप्टन: राधिका मेनन' ही शौर्यकथा पाठ्यपुस्तकात घेण्यात आली आहे. जत तालुक्याच्या साहित्य वैभवात भर टाकणारे ते लेखक म्हणून नावारूपास आले आहेत.
एका राजकीय पक्षाचे कार्य करतानाही कवितेला आपलसं केलयं ते लताताई डफळे यांनी. केवळ कवितेला आपलसं केलं नाही तर त्यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशितही केला आहे. याशिवाय श्रीयुत नेसुर यांनीही त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करून आपलं कवित्व आणि कवितेवरच येस सिध्द केलं आहे. एकंदर कविता प्रकाशित झालेल्यांची यादी मर्यादित असली तरी कविता करणारे आणि कविता जगणारे बरेचजण आहेत. यात रशिद मुलाणी, राजू कुलकर्णी, प्रा. रघुनाथ कुशाबा माने, डॉ. राजेश पतंगे, डॉ. विद्या नाईक, डॉ. महेश भोसले, प्राचार्य डॉ. नागेश सोनटक्के, श्रीयुत मालाणी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
बनाळीत बालपण आणि शिक्षण पूर्ण करणारे डॉ. कृष्णा इंगोले लोक संस्कृतीचे अभ्यासक म्हणून नावारूपाला आले. शिवाजी व सोलापूर विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या इंगोले यांची साहित्यसंपदा मोठी असली तरी स्त्री गीतातून स्त्री दर्शन घडवणारे आणि साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदानप्राप्त झालेले पुस्तक म्हणजे संस्कृतीचा उत्तम ठेवा. तालुक्यातील नसणारे पण या मातीच्या गंधाने ज्यांच्या प्रतिभेचे अविष्कार फुलले त्यात अग्रभागी असणारे नाव म्हणजे डॉ. सुनंदा शेळके. नोकरीच्या निमित्ताने जतला आलेल्या शेळके यांचा 'चंद्रकवडसे' नावाचा पहिला काव्यसंग्रह डॉ. आनंद यादव यांच्या हस्ते प्रकाशित करून साहित्य क्षेत्रात पदार्पण केले.
त्यानंतर त्यांची लेखणी गझल लेखनाकडे वळली आणि आज त्या महाराष्ट्रातील मोजक्याच गझलकारांपैकी एक आहेत.
लेखन करणाऱ्यापैकी रेवनाळचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गावडे आणि प्राचार्य एम. बी. वाघमोडे, उमराणीचे आणि दक्षिण कोरिया, जर्मनी या देशात संशोधन आणि संशोधनात्मक लेखन करणारे डॉ. चिदानंद कनमडी, नांदेड विद्यापीठात वनस्पती शाखाचे संशोधन करणारे डॉ. संजय वाघमारे, कुंभारीचे डॉ. शंकर पाटील, सोरडीचे डॉ. किसन गाडवे यांचे पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रातून होणारे संशोधन लेखन, मराठवाडा विद्यापीठातून लिहिणारे डॉ. नरेंद्र कुलकर्णी, मुंबई विद्यापीठातून कार्यरत असणारे बनाळीचे डॉ. एल.बी. पाटील, बनाळीचेच रहिवाशी आणि इसरोसारख्या संस्थेत काहीकाळ कार्यरत असणारे विठ्ठल सावंत, पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रात औषधशास्त्र विषयात कार्यरत असणारे डॉ. चंद्रकांत कोकरे, कृषी क्षेत्रात संशोधन करीत असणारी शेगावची कु. सुजाता शिंदे, युरॉलॉजी या वैद्यकीय क्षेत्रात लेखन आणि संपादनाची जबाबदारी पार पाडणारे डॉ. मकरंद खोचीकर, दंतचिकित्सक डॉ. मदन बोर्गीकर अशी कितीतरी नावे सांगता येतील या सर्वांनी आपापल्या क्षेत्रात राहून विपुल लेखन केले आणि जतच्या लेखन परंपरेचा पाईक होण्याचा बहुमान मिळविला.
याशिवाय आपल्या पत्रकारितेत लेखनीने लेखन करणारे  मनोहर कोकळे, विठ्ठल ऐनापुरे, जयवंत आदाटे, नजीरभाई चट्टरगी, दादासाहेब सय्यद, श्रीकृष्ण पाटील, प्रदिप कुलकर्णी, बाबुराव दुधाळ, विजय नाईक, अमोल कुलकर्णी, बुध्दसागर आदी मंडळी जतकरांच्या सुखदुःखाच्या वार्ता व वेदना याचे लेखन सातत्याने करतात. तेही या लेखन परंपरेचे पाईक आहेत. लेखन परंपरेचा हा प्रवाह सतत वाहणारा आहे आणि त्यासाठी जतच्या मातीचा ग्रंथ प्रतिभा फुलवणारा ठरतो आहे. यातून असेच नवे लेखक निर्माण व्हावेत आणि त्यांच्या प्रतिमेने लेखन क्षेत्रात नवी परिमाणे निर्माण होवोत हिच सदिच्छा।
बनाळी येथील डॉ. श्रीकांत कोकरे यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आढावा घेणारे 'आठवणीतील साहित्य संमेलने' हे पुस्तक राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते प्रकाशित झाले तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष वि. भा. देशपांडे यांची प्रस्तावना असणारे पुस्तक अभ्यासकांचा संदर्भग्रंथ झाले. 'तरूण भारत' मधल्या 'मांदेशी इच्चार' मालिकेचे पुस्तक ग्रामीण साहित्यातला मैलाचा दगड ठरणार आहे.
जत तालुक्यातील साहित्यिकांचा आढावा घेताना अत्यंत प्रखरपणे तळपणारा तारा जर कोण असेल तर ते डॉ. भिमराव कुलकर्णी. कुलकर्णी हे एकेकाळचे पुणे विद्यापीठातीलच मराठीचे नामांकित प्राध्यापक तर होतेच पण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते सक्रिय सभासदही होते. त्यांनी काही काळ महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपदी सांभाळले. आपल्या अध्यक्षीय कारर्किदीत भिमरावांनी साहित्य संमेलनाचा आढावा घेणारं एक पुस्तकही लिहलं इतकच काय पण त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनात झालेल्या अध्यक्षीय भाषणाचा संग्रहसुध्दा प्रकाशित केला.

No comments:

Post a Comment