Monday, June 1, 2020

स्वातंत्र्यपूर्व काळातील श्री रामराव विद्यामंदिर

जतचे संस्थानाधिपती कै.अमृतराव महाराज १८८० ते ८४ दरम्यान ब्रिटीशांच्या नजरकैदेत होते. ते नजरकैदेत असताना प्रजेच्या हिताच्या दृष्टीने मौलिक स्वरूपाचे विचारमंथन करून नजरकैदेतून सुटका होताच १८८५ साली त्यांनी जत शहरात इंग्रजी शिक्षणाचा पहिला वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. हीच श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलची स्थापना होय. प्रारंभी या विद्यामंदिरचे नाव ‘ए. व्ही. हायस्कूल' असे होते. नंतर काही वर्ष जत हायस्कूल असेही नाव होते. सुरुवातीला मराठी शाळेत व नंतर बंकेश्वर मंदिरात या शाळेचे वर्ग भरत. इंग्रजी शिकवणारे शिक्षक त्याकाळी मिळणे कठीण होते. तसेच जागा, साधनसामुग्रीचा अभावही होता. तरीसुध्दा न खचता शिक्षणाचा डोलारा वाढविण्याचा अविरत प्रयत्न सुरूच होता.
पुढे काही वर्षातच श्रीमंत रामराव महाराज यांनी या विद्या
मंदिरासाठी जतच्या पश्चिमेस सुयोग्य अशी जागा दिली. याच ठिकाणी शाळेसाठी भव्य वास्तु उभारण्यात आली आहे. त्याकाळी यासाठी कै. नारायणराव जिजाबा ताटे यांनी आपले कौशल्य पणाला लावून आर्किटेकचे काम पूर्ण केले. कै. श्रीमंत रामराव महाराज यांच्या खास देखरेखीखाली या विद्यामंदिराची सुरेख व रेखीव अशी आकर्षक अशी इमारत उभी राहिली. त्यावेळचे राजकुमार विजयसिंहाराव, राजकुमार अजितसिंह, राजकुमार उदयसिंहराव यांचे इंग्रजी शिक्षण याच प्रशालेत इतर जनसामान्यांच्या मुलासोबतच घेतले हे विशेष!
सन १९३६ मध्ये या विद्या मंदिराचे नामकरण 'श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल' असे करण्यात आले. त्याकाळी हा नामकरण सोहळा अतिशय दिमाखदार असा पार पडला होता. भारतीय प्रजातंत्राच्या धोरणानुसार १९४८ साली भारतातील अन्य संस्थान समवेत जत संस्थानचे विलीनीकरण करण्यात आले. जतचे राजेसाहेब श्रीमंत विजयसिंह डफळे यांनी आपल्या या विद्यामंदिराचे संगोपन व्यवस्थित व्हावे तसेच प्रशालेची शैक्षणिक प्रगती उत्तम साधावी यासद्हेतूने ८ फेब्रुवारी १९४८ साली हे विद्या मंदिर ‘मराठा मंदिर मुंबई' या समर्थ व समाजाभिमुख अशा संस्थेच्या हवाली केले. १९४८ ला २०० च्या आसपास असलेली विद्यार्थी संख्या आजच्या घडीला सुमारे तीन हजाराहून अधिक आहे. तर १९७५ पासून या शाळेत ज्युनिअर कॉलेजमध्ये शास्त्र शाखा सुरू करण्यात आली.
संस्थानच्या काळात स्काऊटची ऑस्ट्रेलिया, जांबोरी, मुंबई, दिल्ली येथे जावून आलेले लेझीमचे संघ बरेच गाजले होते. प्रशालेने फुटबॉल व क्रिकेट हे खेळ आजही जोपासलेले आहेत. आजमितीस प्रशालेत खेळासाठी पाच एकराची जागा उपलब्ध आहे. येथे नुकतेच चार लाख रूपये खर्च करून अद्यावत असे क्रिडागण तयार करण्यात आले आहे. यात ४०० मीटरचा धावण्याचा ट्रॅक व अद्यावत अशी क्रिकेटची
खेळपट्टी तयार केली आहे.
१९४८ पासून मराठा मंदिर मुंबईने या प्रशालेच्या प्रगतीसाठी विशेष योगदान दिले आहे. आजच्या घडीला येथे बालवाडी, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग, व्यवसाय शिक्षणही उपलब्ध आहे. व्यवसाय शिक्षणामध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स व एक्सरे असा दोन वर्षांचा सर्टीफिकेट कोर्स शिकविण्यात येतो. तसेच बदलत्या शिक्षण प्रणालीचा वेध घेत येथे पाचवी ते दहावीपर्यंत सेमी इंग्लिश सुरू करण्यात आले आहे.

लाखो रूपयांची कामे
आजच्या घडीला प्रशालेच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यासाठी सुमारे १३ लाख रूपये खर्ची करण्यात आले. तर विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी 20 लाख रुपये खर्ची करून अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. तर संपूर्ण प्रशाळेभोवती नऊ फूट उंचीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.  या प्रशालेच्या विकासासाठी मराठा मंदिरचे सरचिटणीस राजेंद्र गावडे, विद्यावर्धिनी शाळेचे अध्यक्ष कमलाकर सावंत, विलासराव देशमुख व मराठा मंदिराच्या मालमत्ता विभागाचे चिटणीस ऍड. शशिकांत पवार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या शाळेतील आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक
व्ही.व्ही.लेले, के.पी.जोशी, एस.पी.शेटके, आर.बी.कुलकर्णी, डी. व्ही.पुरोहित, चिंचोरे सर, के.जी.कुलकर्णी, जी.आर.कुलकर्णी, भावेसर, डी. के.दातार, एस.के.दातार, के.पी.जोशी, एस.व्ही.खोचीकर, एस.डी. बुवा, आर.डी. पाटील, आर.बी.पाटील, पी.बी.पोतनीस, वसंतराव गडदे, शिवाजीराव ताड, कटकटी सर, बालगावकर सर, पी.एन.व्हनमाने, आदींनी हे शिक्षणाचे मंदिर खऱ्या अर्थाने संस्कार मंदिर होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जत व जतच्या परिसरात 1960 पर्यंत इंग्रजी शिक्षण देणारे हे एकमेव विद्यालय होते. त्यामुळे शहर व तालुक्यातील प्रत्येक घरी या विद्यालयाचा एक तरी माजी विद्यार्थी आहे.

No comments:

Post a Comment