Wednesday, June 3, 2020

द्राक्ष शेतीवर आधारित लघु उद्योग उभारण्याची गरज

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. महाराष्ट्र व
कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या या तालुक्यात निसर्गाची अवकृपा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबासह दरवर्षी नदीकाठी उसतोडणीसाठी जावे लागते. मात्र या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासावर द्राक्ष व डाळिंब बागेच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये या तालुक्यात येत आहेत.

उत्तम प्रतीच्या द्राक्षाची निर्यात आणि बेदाणा या क्षेत्रात जत तालुक्याने तासगावलाही आता मागे टाकले आहे. तर काही शेतकरी अनेक आव्हानांना तोंड देत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेत आहेत. यासाठी द्राक्ष लागवड हा कृषि उद्योग म्हणून भक्कम पायावर उभा राहण्याच्या दृष्टीने द्राक्ष निर्यात वाढविण्याबरोबर द्राक्ष प्रक्रियेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तालुका पन्नास वर्षापासून पिण्याबरोबर शेतीच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहे. आता कुठे काही भागात कृष्णेचे पाणी आले आहे. जत तालुका संपूर्ण पाणीमय होईल, तेव्हा तालुक्यातील शेतीचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. पण  तरीही इथला शेतकरी डगमगत नाही.
ज्वारी, बाजरी, गहू, मका, भुईमूग, सुर्यफूल आदी पिके घेत दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी डाळिंब बागा लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर बोरीच्या बागा लावल्या. कमी पाण्यावर जादा उत्पन्न देणारे पिक म्हणून शेतकरी याकडे पाहू लागले. तालुक्यात हजारो हेक्टरवर डाळिंब व बोरीच्या बागा लावल्या. हळूहळू उत्पादन वाढत गेले, एकरी ५० ते ६० हजार बोरी पासून तर, डाळिंबापासून एकरी एक लाख ते दोन लाख रूपयाचे उत्पन्न मिळू लागले. त्यातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. मात्र पंधरा वर्षापूर्वी डाळिंबावर तेल्या नावाचा रोग आला याने संपूर्ण डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. शेतकरी या रोगाविषयी महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञांची चर्चासत्रे ठेवली. अनेक कंपन्यांची औषधे मारली. तेल्या काही हटला नाही. पर्यायाने शेतकऱ्यांनी बागाच काढून टाकण्याचे ठराविक बागा काढून टाकल्या.  बोरीच्या बागाही दर नसल्याने शेतकऱ्यांनी काढून टाकल्या. त्यानंतर शेतकरी द्राक्ष पिकाकडे हळू हळू वळू लागला. जत तालुक्यात गेल्या पंधरा वर्षात आठ हजार २०० हेक्टर द्राक्षाचे क्षेत्र आहे. त्यातून एकूण उत्पादन ३०० कोटी रूपयांची द्राक्षे सध्या जातात.
तालुक्यातील शेतकऱ्याकडे द्राक्ष विषयीचे सखोल ज्ञान आहे. मशागतीत अनेक खाचाखोचा माहित आहेत. स्वत:च्या शेतात राबत असल्याने अनुभवाने अनेक गोष्टी त्याने आत्मसात केलेल्या आहेत. तो अत्यंत जिज्ञासू आहे. द्राक्षाविषयी आयोजित अनेक मेळाव्यातही शेतकरी भाग घेत आहे. भारतात किंवा परदेशात द्राक्षाविषयी काही नवीन तंत्रापैकी आपल्या वातावरणात त्याची किती उपयुक्तता आहे. हे समजावून घेऊन उपयोगी असणाऱ्या नवीन तंत्राचा काही अंशी वापर आपल्या बागेत करू पाहतो आहे. त्यामुळे तासगाव या तालुक्यापेक्षा जत तालुका हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर होत आहे.

एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्षे
तालुक्यातील शेतकरी जरी जिल्ह्यात दुष्काळी म्हणून गणला गेला तरी जिद्दीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा शेतकरी निर्यातक्षम द्राक्षे तयार करीत आहे. आपले द्राक्षे युरोपियन देश, आखाती देश, आदी ठिकाणी पाठवित आहे. आपली द्राक्षे कोणत्या बाजार पेठेत पाठविणार आहोत, कोणते व किती किलोचे पॅकींग वापरणार आहोत हे शेतकऱ्यांनी आगोदरच ठरविले आहे. मात्र भारतातील द्राक्षाला परदेशी बाजार पेठेत चांगला दर मिळत नाही. काहीवेळा कोट्यवधीची द्राक्षे रिजेक्ट करतात. त्यामुळे एक दमडीही हातात लागत नाही. यासाठी भारताने स्वतंत्र यंत्रणा या निर्यातक्षम द्राक्षासाठी ठेवण्यास कोट्यवधी रूपयांचे परकीय चलन या दुष्काळी तालुक्यात येणार आहे.

उत्कृष्ट क्वालिटीचे बेदाणे
शेतकरी वर्गाचे तयार द्राक्षाच्या निर्यातीबरोबर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आता बेदाणा निर्यातीकडे कल वळविला आहे. तालुक्यात दरवर्षी २८ हजार टन बेदाणा या तालुक्यात निर्याती करतोय यासाठी डिसेंबरपासून ते जूनपर्यंत या कामात हा शेतकरी मग्न असतो थॉमसन सिडलेसपासून ९० टक्के
बेदाण्याची निर्मिती करतो. तर तास गणेश, सोनाक्का, बेदाणा निर्मिती हे शेतकरी करीत आहेत. उत्कृष्ट बेदाणे दिसावसया सुबक हवेत, हिरवट पांढरे, मुलामय, भरपूर गर, मधुरता व सारखा आकार मुठीत दाबून सोडल्यास प्रत्येक मणी सुटा झाला पाहिजे असे बेदाणा या तालुक्यात तयार होत आहे. गतवर्षी एक टन बेदाण्यासाठी साधारण एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत शेतकऱ्याला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी बेदाणा निर्मितीकडे जास्त वळत आहे.
द्राक्षावर प्रक्रिया करणारा उद्योग हवा कायम दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. शेतकरी आता पुढारला आहे. तालुक्यात तीन हजार २०० हेक्टर वरती विविध जातीचे द्राक्षाची लागण आहे. मात्र या द्राक्षावरती प्रक्रिया करणारा एखादा प्रकल्प होणे गरजेचे आहे. जत, उमदी, संख, बिळूर, डफळापूर, उमराणी, खोजनवाडी, अमृतवाडी, उटगी, अंकलगी, आवंढी, सोनलगी, या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षे
आहेत. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या तालुक्यात उद्योगधंदे उभारत नाहीत मात्र आता महाराष्ट्रातील उद्योगपतींची केवळ शहरी भागाचे हित व जोपासता दुष्काळी भागातील शेती जिवंत रहावी, गरीब शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे त्यांचा मुलांना उद्योगधंद्यांच्या माध्यमातून पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
एकंदरीत तालुका द्राक्षशेतीमध्ये आघाडीवर आहे. मात्र
औषधांचे, मजुरांचे वाढणारे दर, निसर्गाचा बदलामुळे वारंवार पडणारे रोग यामुळे शेतकरी वैतागला आहे. तर द्राक्ष बेदाण्याचे दरही कमी जास्त होतात. दलालांची टोळी असल्यामुळे हे कमी दराने द्राक्षे व बेदाणे घेतले जातात. त्यामुळेच तालुक्यात द्राक्षावर प्रक्रिया करणारा उद्योग झाल्यास द्राक्ष शेती आणखी समृद्ध होईल.

No comments:

Post a Comment