जत तालुक्यातील पश्चिम भागातील कुडणूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर, मानसिंग कुमठेकर यांना हा शिलालेख आढळून आला आहे. कुडणूरजवळ असलेल्या शिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपासून या दोघांचे संशोधन सुरू आहे. हा शिलालेख मारुती मंदिराशेजारील रस्त्यावर भंगलेल्या अवस्थेत होता. तालुक्यात चालुक्य आणि यादवकालीन काही शिलालेख मिळाले आहेत. जत तालुक्याच्या एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर कुडणूर हे गाव आहे. कुडणूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतीश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी एक शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा.काटकर, कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती. शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखाच्या वरच्या बाजूला गाय, सूर्य-चंद्र, शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत. या लेखाचा अभ्यास तज्ज्ञ लोकांकडून अभ्यास करून घेण्यात आला. त्याचे वाचन करून घेण्यात आले. यात नऊ ओळी आहेत. वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. सदर लेखात शिंगणापूर येथील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. या गावाशेजारी शिंगणापूर हे गाव आहे. या गावात असलेल्या महादेवाच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र सध्या अशा नावाची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरून आणि लिपिवरून हा लेख उत्तर यादव काळातील असावा असाही अंदाज आहे. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादव राजा सिंघण याच्या नावावरून स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्यात सिंगणहळळी आणि शिंगणापूर अशी गावांची नावे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरूनच असावीत.
ओढयांच्या संगमावर
कुडणूर हे गाव ओढ्याच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोड्या अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ शिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडणूर गावाच्या हद्दीत आला असावा, असेही संशोधक कुमठेकर यांनी सांगितले.
खूप छान सर...
ReplyDelete