Saturday, May 16, 2020

ऐतिहासिक डफळापूर

जत तालुका आदिलशाहीचा एक भाग होता. त्या काळात डफळापूर हे प्रगत व ऐतिहासिक व वीरांचे गाव म्हणून ओळखले जात होते. गावाला 1200 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. डफळापूर संस्थान काळात उपराजधानी म्हणून ओळखले जात होते. पूर्वी येथील कापूर ओढ्यावर दवनापूर म्हणून उल्लेख आढळतो. डफळापुरातील  चव्हाण (चौहान) हे मूळचे राजस्थान भागातील असून युद्ध करत करत येत ते डफळापुरात येऊन स्थिरावले.

यलदेव या पुरुषाकडून डफळापूर येथील जहागिरीची निर्मिती झाली. त्यांना मानकाबाई व वरमाबाई या दोन राण्या होत्या. त्यापैकी मानकाबाईच्या मुलाकडे मुलखी व पोलीस पाटीलकी आली तर वरमाबाईंच्या मुलाकडे शासकीय कारभार सोपवला होता. डफळापूर नजीक असणाऱ्या पुलांचे उदघाटन राणीबाई डफळे यांच्याहस्ते 1949 मध्ये झाले. एकंदर गावाला ऐतिहासिक वारसा मोठा आहे. आजही डफळापूर येथील राजवाडा शौर्य आणि जहागिरीची साक्ष देत उभा आहे.
जत तालुक्याला प्राचीन इतिहासदेखील आहे. शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटीच्या काळात जत तालुक्याला महत्त्व होते. डफळापूर जत तालुक्यातील महत्त्वाचे गाव. कवठेमहांकाळ मार्गावर असलेल्या या गावाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. इतिहास काळात या गावातील अनेक शूरवीर योद्द्यांनी रणांगण गाजवले आहे.
महाभारतातील भीम-बकासुर यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्या गोष्टीतील एक चक्रानगरी आणि एकवीरा देवीचा संदर्भ डफळापूरच्या बाबतीत सांगितला जातो. कारणही तसेच आहे. डफळापुरात एकवीरा देवीचे मंदिर आहे. डफळापूर या गावाशी चव्हाण घराणेच नव्हे तर जत संस्थानाची इतिहास निगडीत आहे. चव्हाणांच्या पराक्रमाची गाथा आजही येथे गायली जाते. सटवाजीराव चव्हाण (चौहान) या वीर पुरुषामुळे हे घराणे इतिहासात अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आले. चव्हाण घराण्याच्या इतिहासाचा धागा राजपूत राजापर्यंत जातो. दुधावत हाडा चौहान हे राजस्थानातील लढाऊ आणि देशभक्त घराणे म्हणून प्रसिद्ध होते. महाराणा प्रतापसिंह यांच्याप्रमाणेच या हाडा चौहान घराण्याने मोगल साम्राज्याशी सतत दोन हात केले. या लढाईत अनेक वीर रणभूमीवर धारातीर्थी पडले होते. मोगल साम्राज्याशी होणारी सततची लढाई , संघर्ष यामुळे दुधावत चौहान घराण्याने दक्षिणेकडे कूच केले. राव सर्जनसिंह , दुधासिंह यांची परंपरा शामलसिंह आणि त्यानंतर शार्दूलसिंह यांनी पुढे चालवली.
1672 ची गोष्ट सांगितली जाते. विजापूरच्या आदिलशहाने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज पाठवली. डफळापूर ते कोकळे दरम्यान आदिलशाही फौजेचा तळ होता. गावाजवळ फौज असल्याने काही तरुण फौजेच्या छावणी जवळ गेले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, ही फौज शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी चालली आहे. या फौजेवर सटवाजीराव आणि त्यांचे भाऊ बुवाजीसह अन्य साहसी युवकांनी अचानक हल्ला करून फौजेची दैना उडवून दिली. आदिलशाही फौजेतील सुमारे 150 हून सैन्याना यमसदनी पाठवले. यामुळे घाबरलेल्या उरलेल्या सैन्यांनी वाट दिसेल तिकडे पळ काढला आणि त्यांनी विजापूर गाठले. आदिलशहाला ही बाब कळल्यावर डफळापूर च्या या तरुणांचे त्याला कौतुक वाटले. असे शूर युवक आपल्या फौजेत असायला हवेत, असे त्याला वाटले. त्यांनी पंचवीस जणांची एक तुकडी सटवाजीराव व बुवाजी यांना बोलावून आणण्यासाठी पाठवली. या दोघांना आणण्यासाठी ही तुकडी डफळापूरच्या दिशेने निघाली. आडव्या डोंगराजवळ ही तुकडी येताच तरुणांना संशय आला. आदिलशाहाने आपल्याला पकडण्यासाठी सैन्य पाठवले आहे असे वाटल्याने त्यांनी या तुकडीवर हल्ला केला. घाबरून ही तुकडी साताऱ्याच्या दिशेने पळाली.  या तुकडीचा पाठलाग हा साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यापर्यंत होता. या लढाईत सटवाजीराव आणि बुवाजी जखमी झाले. जखमी झालेला बुवाजी आदिलशाह सैन्याच्या हाती लागला. त्याला विजापूरला नेण्यात आले. बुवाजीला सोडवून आणण्याचा संकल्प सटवाजीराव यांनी केला आणि आपल्या काही निवडक मित्रांसह त्याने विजापूर गाठले.
वाटेत रात्र झाल्याने सटवाजीराव आणि त्यांच्या मित्रांनी एका ठिकाणी मुक्काम करण्याचे ठरवले. याच ठिकाणी एका झाडाखाली त्यांना एक फकीर दिसला. सटवाजीरावने घडलेली सगळी हकीकत फकिरला सांगितली. फकिराने त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. नंतर त्यांनी आदिलशहाच्या भेट घालून दिली. या भेटी दरम्यान आदिलशाहाने 'आदिलशाहीचा चाकरी करण्यास सांगितले'.पण सटवाजीरावने त्याला नकार दिला.  उलट 'आमच्यामध्ये हिंमत आहे, आम्ही कुणाची चाकरी करणार नाही, असे सुनावले. भावाला सोडा व जहागिरी द्या असे सांगतानाच आपल्याला गरज पडेल तेव्हा आम्ही मदतीला येऊ, असा शब्द दिला.
आदिलशहाला सटवाजीराव सारख्या शूरवीर, पराक्रमी सरदाराची आवश्यकता होती. त्याने लगेच त्याला जहागिरी देऊन टाकली आणि बुवाजीची सुटकाही केली.
नंतर या दोघा भावांनी फकिराची भेट घेतली. आभार मानून आशीर्वाद मागितले. फकिराने त्यांना धुनीतील अंगारा दिला. 'हा चिनगीसाहेबाचा अंगारा आहे, तो घ्या'   साहेबाचे स्मरण करा, असे सांगितले. आशीर्वाद घेऊन दोघे भाऊ डफळापूरला आले. नंतर त्यांनी वाडा बांधला. आजही हा वाडा असून त्यांच्या शौर्याची साक्ष देतो. जत, बारडोल, करजगी, होनवाड या प्रांताची जहागिरी आदिलशहाने त्यांना दिली. जहागिरी स्वतंत्र होती. त्यावेळी सटवाजीराव यांच्याकडे सहा हजाराचे घोडदळ, पाच हजार पायदळ, हत्ती, उंट यांचा ताफा होता. सटवाजीराव यांना 'वजीर' हा किताब देण्यात आला. सटवाजीराव यांना मूळची मनसा विजापूरच्या आदिलशाहाने दिली होती. नंतर मोगल बादशहा औरंगजेब यांनी इ.स. 1701 मध्ये जारी केलेल्या सनदे मध्ये सटवाजीराव यांची जहागिरी कायम ठेवली.
सटवाजीराव यांनी नंतर छत्रपती राजाराम महाराजाना मदत केली. याशिवाय संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासमवेत स्वराज्य मोहिमेसाठीही मदत केली. एका मोहिमेवर असताना इस्लामपूर येथे सटवाजीराव यांचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment