स्वामिनिष्ठा, पराक्रमाच्या बळावर आदिलशाहच्या साम्राज्याला सतत हादरा देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर या विराने आदिलशाहच्या 12 हजार सैन्यांना उमराणीत धूळ चारली. एवढेच नव्हे तर त्यांना शरण येण्यास भाग पाडले. जगात कुठेही झाली नसेल अशी सात सैनिक विरुद्ध 12 हजार सैन्यांची लढाई मराठयांच्या इतिहासात झाली. या लढाईची सुरुवात जत तालुक्यातील उमराणी येथे झाली. तर शेवट कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे सहा जून 1674 रोजी झाला.
प्रतापराव गुजर यांचे मूळ नाव कुडतोजी होते. सुरुवातीला राजे शिवछत्रपतीच्या सैन्यात घोडदळात गुप्तहेर म्हणून कार्यरत असणारे कुडतोजी यांना राजेंनी घोडदळातील तुकडीचा प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली. १६५९ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा सेनापती मोहकमसिंह याचा पराभव केला. त्याचबरोबर मोगलास जावून मिळालेल्या संभाजी कावजी कोंढाळकराला २४ एप्रिल १६६० रोजी द्वद्वयुध्दात यमसदनी पाठविले. पाच एप्रिल १६६३ रोजी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंहगडावर हल्ला करणाऱ्या मोगली फौजेला कुडतोजीने हुसकावून लावले होते. त्याच्या या अतुलनीय कार्याची दखल घेवून प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकरानंतर सेनापतीपद देवून छत्रपती शिवरायांनी कुडतोजी गुजर यांना १६६६ झाली 'प्रतापराव' ही पदवी बहाल करण्यात आली व १६६७ मध्ये सुरवातीला सरनौबतीचा हुद्दा देण्यात आला होता. शौर्य, पराक्रम आणि वेगवान हालचालींनी महाराजाबरोबर फौजेची दुसरी आघाडी प्रतापरावांनी समर्थपणे पेलली.
प्रतापरावांनी १६७० मध्ये वहाडातील कारंजे शहर
लुटले व एक कोटीची संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली. सुरतीची लुट करताना १७ ऑक्टोबर १६७० रोजी वणी दिंडोरीजवळ कांचनबारीच्या घाटात त्यांनी मोठा पराक्रम गाजविला होता. १६७३ मध्ये हुबळीची समृध्द पेठ प्रतापरावांनी लुटली होती.
'छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहा मार्च १६७३ ला पन्हाळा किल्ला जिंकल्यानंतर चिडलेल्या विजापूरच्या आदिलशाहने प्रचंड फौज, शस्त्रे, हत्ती, घोडदळ आदी १२ हजार लवाजम्यासह सरदार अब्दुल करील बहलोल खानला पन्हाळ्याच्या मोहिमेवर पाठविले. बेहलोल खानचा बंदोबस्त करण्यासाठी व स्वराज्यावर आलेले संकट परतावून लावण्यासाठी शिवरायांनी प्रतापराव गुजर यांना मोहिमेवर पाठविले.
विजापूर-तिकोटीमार्गे बहलोल खान उमराणीत पोहोचला होता. त्याला तेथून पुढे मोगलांची मदत मिळणार असल्याची माहिती प्रतापराव गुजर यांना मिळाली. मोगलांचे सैन्य मिळण्याअगोदरच बहलोल खानाला गाठले पाहिजे ही बाब लक्षात आल्यानंतर प्रतापराव व त्यांच्या सैन्यांनी सलग दोन रात्री कूच करून नऊ मार्च १६७३ रोजी खानाला उमराणीतच गाठले.
जतचा हा भाग दुष्काळी भाग. पिण्याच्या पाण्यासाठी
खानाच्या सैन्याला पायपीट करावी लागत असल्याचे लक्षात येताच प्रतापराव गुजर यांनी एक रणनिती आखली व या रणनितीनुसार उमराणीतील एकमेव असलेल्या जलाशयाची चोहोबाजूनी नाकाबंदी केली व खानाच्या फौजेला गराडा घातला. पिण्यासाठी पाणी, रसद मिळत नसल्याने खानाचे सैन्य, हत्ती, घोडे व्याकूळ झाले व सैरभैर पळू लागले.
'उमराणीत खान व प्रतापराव गुजर यांच्यात तुंबळ लढाई झाली. या लढाईत मराठे सैन्यांनी खानाच्या सैन्याचा सपशेल पराभव केला. मरणाच्या भितीने बहलोल खान व त्याचे सैन्य सात एप्रिल १६७३ रोजी प्रतापराव गुजर यांना शरण आले व प्राणदानाची याचना केली. शरण आल्याने प्रतापराव गुजरानी
बेहलोल खान यास माफ करून त्यास सोडून दिले व आपला पराक्रम महाराजांना कळविला.
स्वराज्यास लुटण्यास आलेल्या बहलोल खान याला
प्रतापराव गुजर यांनी सोडून दिल्याची वार्ता कळताच राजे संतापले व त्यांनी प्रतापरावांना पत्र पाठवून तुम्ही अधिकाराचे उल्लंघन केल्याचे कळविले. 'शत्रुला माफ करण्याचा अधिकार तुमचा नाही, बहलोल खान यास गर्दीस मिळवल्याशिवाय रायगडावर तोंड दाखवू नये' असा आदेश महाराजांनी गुजर यांना दिला.
फेब्रुवारी १६७४ मध्ये पुन्हा संपुर्ण तयारीनीशी बहलोल
खान स्वराज्यावर चालून आला. बहलोल खान तिकोटा,
निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज मार्गे स्वराजात प्रवेश करणार असल्याची माहिती गुजर यांना मिळाली. ती माहिती मिळताच बहलोल खानला जेरबंद करण्यासाठी लढाईसाठी आतुर झालेल्या प्रतापराव यांनी मोजक्या अन्य सहा अंगरक्षकांना सोबत घेवून बहलोल खानावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. पण नियतीने वेगळेच मांडून ठेवले होते. नेसरीजवळील खिंडीत अचानकपणे या सात वीरांचा सामना मोगल सैन्यांशी झाला. त्यावेळी या सात सैन्यांनी पळून न जाता मोगल सैन्यावर जोरदार हल्ला केला. तुंबळ लढाई जुंपली हया लढाईत सातही वीरांनी हौतात्म पत्करले. धन्याचा शब्द खरा
करण्यासाठी या महान विराने २४ फेब्रुवारी १६७४ रोजी
देहत्याग करून शिवरूपात विलीन झाला. प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे इतिहासाच्या पानात उमराणीचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरले गेले. त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्या यासाठी उमराणी येथे सांगली जिल्हा परिषदेने स्मारक उभे केले आहे. मात्र हे स्मारक साजेसे झाले नाही. काम हाती घेतले आहे पण ते काम ‘सात' वर्ष काम रेंगाळले होते. आजही त्याची देखभाल केली जात नाही. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेने हा भाग सुशोभित करावा. झाडे, फुलझाडे लावावीत, अशी इच्छा इतिहास प्रेमी करीत आहेत.
No comments:
Post a Comment