Tuesday, May 26, 2020

स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर सोन्याळ

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा लढा असो अथवा स्वातंत्र्यानंतरचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा किंवा गोवामुक्ती संग्राम असो त्याचबरोबर भूमिहिनांचा सत्याग्रह असो या साऱ्या लढ्यात जत तालुक्यातील सोन्याळ गावचे योगदान मौलिक आणि दखलपात्र आहे. या गावाने विशेषतः काराजनगी कुटुंबीयाने या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा बनून गावाचे नाव इतिहासात कोरले  आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला तालुक्यातील एकमेव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा साक्ष देतो आहे.

स्वातंत्र्यापूर्वी सोन्याळची नाळ स्वातंत्र्य संग्रामाशी जुळली आणि ती स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली. कै. सद्गुरू रायाप्पा काराजनगी हे येथील धनाढ्य आणि इंचगिरी सांप्रदायातील एक लढाऊ व्यक्तिमत्व. त्यांनी कर्नाटकातील प्रसिध्द इंचगिरी मठाचे गुरू गिरीमल्लेश्वर व माधवानंद प्रभुजी यांचे शिष्यत्व पत्करले होते. १९४२ च्या चलेचाव चळवळीत माधवानंद प्रभुजी आणि काराजनगी यांनी स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधीच्या विचारधारेबरोबरच त्यांचा सशस्त्र लढ्यावरही विश्वास होता. त्यामुळे भूमिगत क्रांतीकारकांना मदतीचा हात दिला.
तत्कालिन मुंबई राज्यात कर्नाटकातील विजापूर, बेळगाव, धारवाड आणि गुलबर्गा या पाच जिल्ह्याचाही समावेश होता. याच मुंबई राज्यात जतचे डफळे संस्थान होते. या परिसरात डफळे घराण्याची राजवट होती. भूमिगत झालेल्या क्रांतीकारकांना खाण्या-पिण्याच्या रसदीबरोबरच दारूगोळा, शस्त्रे पुरविण्याची महत्वपूर्ण कामगिरी रायाप्पा काराजनगी करत होते. इंचगिरी, कोट्टलगी आणि सोन्याळ येथे शस्त्र कारखाने उभारण्यात आले होते. सोन्याळच्या कारखान्याची सारी जबाबदारी रायाप्पा काराजनगी व काही निवडक सहकाऱ्यांवर  होती. येथे रोज १०० हून अधिक पिस्तुलांची निर्मिती होत होती. रायाप्पाच्या मदतीला पोरसवदा असलेले त्यांचे चिरंजीव  मल्लेशाप्पाही असत. येथून तत्कालिन भूमिगत वसंतदादा पाटील, क्रांतीसिंह पाटील, राजारामबापू पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आदी क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असे. सोन्याळला शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना आहे याचा सुगावा जत संस्थानचे तत्कालिन राजे डफळे यांना लागला. त्यांनी महत्प्रयासाने हा कारखाना ताब्यात घेवून निर्मिलेला दारूगोळा, पिस्तूल व अन्य हत्यारे जप्त केली. ही शस्त्रास्त्रे पाहून राजे डफळेही अचंबित झाल्याचे सांगतात. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जत संस्थान विलिनीकरण करण्यासाठी इंचगिरी संप्रदायाने आंदोलन केले आणि त्याला यश आले. मलेशाप्पा काराजनगी यांनी वडिल रायाप्पाबरोबर लहान वयातच स्वातंत्र्य लढयाला स्वत:ला समर्पित केले होते. वडिलांची देशभक्ती त्यांच्या नसानसात भिनली होती. वडिलांपश्चातही त्यांनी आपले कार्य पुढे चालूच ठेवले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो अथवा गोवामुक्ती संग्राम असो या लढयात त्यांचा सहभाग राहिला. विनोबा भावे यांचे शिष्यत्व पत्करून भूदान चळवळीत सन १९६० मध्ये स्वत:ला झोकून दिले. या चळवळीत मलेशाप्पा महाराष्ट्र व बाहेरील राज्यात भावेंसोबत होते. १९७९ मध्ये गोहत्याबंदी सत्याग्रह पदयात्रेत त्यांनी सहभाग घेतला. दुसरीकडे गावात व परिसरात समाजहिताचे विविध उपक्रम त्यांनी राबविली. स्वातंत्र्यपूर्व काळात सोन्याळ या गावाला मोठे महत्व प्राप्त करून देण्यात या कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील येथे कन्नड व मराठी
माध्यमांच्या शाळा आहेत. गावानेही आपली ऐतिहासिक खूण कायमस्वरूपी स्मरणात राहावी यासाठी मल्लेशाप्पा काराजनगी यांच्या नेतृत्वाखाली गावात मध्यवर्ती ठिकाणी १९९३ मध्ये महात्मा गांधीजींचा सुंदर असा पुतळा उभारला. अर्थपुरवठा स्वतः मलेशाप्पा यांनी केला. येथील आणखी एक वैशिष्ट असं की या महात्मा गांधी पुतळा परिसरातील स्वच्छतेची, सकाळ, संध्याकाळ मोठया भक्तीभावाने पूजा-अर्चा आणि वेगवेगळया प्रकारची फुलझाडे व निसर्ग संगोपन एक मुस्लिम समाजातील व्यक्ती मोठया भक्तीभावाने करत आहे. या व्यक्तिचं नाव आहे हुशेनी लालासाहेब नदाफ! यात आपल्याला आनंद, मनशांती वाटत असल्याचे नदाफ सांगतात.
मलेशाप्पा काराजनगी  स्वातंत्र्य चळवळीतील उमेदीचा काळ आठवला की भारावून जात. त्यांच्यात स्फुलींग संचारते. त्यांनी आजही आपली लढावूवृत्ती सोडली नाही.. १९९२ मध्ये सोन्याळ गावात एस. टी. व्हाया झाली पाहिजे या मागणीसाठी १०० हून अधिक लोकांना घेवून बेमुदत उपोषण केले. शेवटी सहाव्या दिवशी एस. टी. सोन्याळ व्हाया सुरू करण्याचा निर्णय महामंडळाला मान्य करावा लागला. स्वातंत्र्य लढयातील सोन्याळ गावचा व मल्लेशाप्पा काराजनगी व कुटूंबियाचा सहभाग विसरता येणार नाही हे नक्की !

No comments:

Post a Comment