Tuesday, May 19, 2020

जत जवळील किल्ला:रामदुर्ग

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.

रामपुर गावातील टेकडीवर एक पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांचा वावर किल्ला बांधण्याच्या आधीच्या काळापासुन होता. तसेच या सपाट प्रदेशात ही एकमेव टेकडी असल्याने आजुबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवता येते. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेसाठी किल्ला बांधण्यासाठी ही योग्य जागा होती.
     मुंबई आणि पुण्याहुन "रामदुर्ग" हा सांगली जिल्ह्यातील जत या तालुक्याच्या गावाजवळ असलेला किल्ला खुप लांब पडतो. त्यामुळे मिरज अथवा सांगलीला येउन खाजगी वाहान केल्यास एका दिवसात रामदुर्ग आणि जुना पन्हाळा हे दोनही किल्ले पाहुन होतात.

पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच भव्य प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. दरवाजाची कमान शाबुत आहे. प्रवेशव्दारा समोरील दगडात कोरलेल्या काही पायर्‍या आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजुनही बर्‍यापैकी शाबुत आहेत. तटबंदी दगड एकावर एक रचुन तयार केलेली आहे. दोन दगडांमधील भेगा भरण्यासाठी स्थानिक पांढर्‍या मातीचा उपयोग करण्यात आला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला एक प्राचिन शिव मंदिर दिसते. शिव मंदिराच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. मंदिराकडे जाताना वाटेत पडलेले मंदिराचे घडीव दगड पाहायला मिळतात. या प्राचिन हेमाडपंथी मंदिराचे सभामंडप व गाभारा असे दोन भाग एकेकाळी होते. त्यातील सभामंडप आता नष्ट झालेला आहे. त्याचेच अवशेष आपल्याला किल्लाभर पसरलेले दिसतात. शिव मंदिर दक्षिणाभिमुख आहे. सभामंडपाचे चार कोरीव खांब अजुन तग धरुन आहेत. त्यावरुन सभामंडपाची कल्पना करता येते. गाभार्‍याच्या दरवाजावर सुंदर कोरीव काम आहे. व्दारपट्टीवर गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍यातील पिंडीवरील छतावर फुलांची नक्षी कोरलेली आहे.

मंदिर पाहुन झाल्यावर मंदिरासमोर असलेल्या झेंडा बुरुजाकडे जावे. हा बुरुज ढासळलेला आहे. या ढासळलेल्या बुरुजावर चढुन झेंड्यापाशी जावे. बुरुजावरुन किल्ल्या खालच रामपूर गाव व दुरवरचा परीसर दृष्टीक्षेपात येतो. झेंडा बुरुजावरुन तटबंदीवर उतरुन तटा वरुनच किल्ल्याची फेरी चालु करावी. तटावरुन फेरी मारताना शिव मंदिराच्या मागच्या बाजुस आल्यावर एके ठिकाणी दगडांची रास पडलेली दिसते. या ठिकाणी एखादी वास्तु असावी. पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिणेला खालच्या बाजुला एक बांधीव तलाव दिसतो. तलावाच्य उत्तरेला एक घडीव दगडाची भिंत बांधलेली आहे. किल्ल्यावर पाण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. त्यासाठीच या तलावाची निर्मिती केली असावी. किल्ल्यावरुन या तलावा पर्यंत जाण्यासाठी तटबंदीत एक वाट ठेवलेली आहे. तटबंदी वरुन फिरताना किल्ल्याच्या प्रवेशव्दाच्या विरुध्द बाजुस आल्यावर तटबंदी आणि उत्तरेकडील बुरुज यांच्या मधे ही वाट होती. बुरुज आणि तटबंदीचे दगड कोसळुन ती आज बंद झालेली आहे. ही वाट पाहुन तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा घालुन प्रवेशव्दारा पर्यंत आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडाचा आकार छोटा असल्याने अर्ध्या तासात गड पाहुन होतो.

पोहोचण्याच्या वाटा :
जत हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याच गाव आहे. सांगली पासुन डफ़ळापूर मार्गे ८३ किमी आणि मिरज पासुन डफ़ळापूर मार्गे ८० किमी अंतरावर जत आहे. जत - डफळापूर रस्त्यावर जत पासुन ३ किमीवर रामपूर गावाचा फाटा आहे. या फाट्यापासुन गाव १ किमीवर आहे. सांगली - मिरजहून डफ़ळापूर मार्गे जतला जाणार्‍या एसटी पकडुन रामपुर फाट्यावर उतरुन गावाच्या फाट्यावरुन आत शिरल्यावर छोट्याश्या टेकडीच्या माथ्यावर असलेला रामदुर्ग किल्ला आपले लक्ष वेधुन घेतो. रामपुर गावातील शाळेपर्यंत पक्का रस्ता आहे. शाळेमागील टेकडीवर किल्ला आहे. शाळेमागून जाणार्‍या रस्त्याने टेकडीवर बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. पाण्याच्या टाकीपाशी आल्यावर उजव्या बाजुला किल्ल्याचा दरवाजा दिसतो. रस्ता सोडुन पायवाटेने किल्ल्याच्या दरवाजाच्या रोखाने चालायला सुरुवात करावी. साधारणपणे ५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाजा समोर पोहोचतो.रामपुर फाट्यापासुन किल्ल्यावर जाण्यास अर्धातास लागतो.

1 comment:

  1. रामपूरगड विकास आराखड्यास तत्त्वतः मंजुरी

    चार कोटी 70 लाखांच्या निधीची तरतूद
    आयर्विन टाइम्स
    जत,(प्रतिनिधी) :
    जत तालुक्‍यातील प्राचीन व ऐतिहासिक किल्ले रामपूर डोंगरी गडावर पर्यटकांना पायाभूत सुविधा, त्याचे संवर्धन व विकासासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर विभागाने चार कोटी ७० लाख रुपयांच्या विकास आराखड्याला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. गत वर्षभरापासून या गडाच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव रखडला होता. त्याला अखेर मंजुरी मिळाल्याने गडाच्या विकासाला चालना मिळणार आहे.
    यापूर्वी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्व अधिकाऱ्यांसह किल्ले रामपूर गडाच्या विकासासाठी आढावा घेतला होता. शिवाय, माजी सरपंच मारुती पवार व ग्रामस्थांनी आमदार सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर वनविभागाने गडाच्या विकासासाठी पर्यटन विकास मंडळ, नागपूर विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
    दरम्यान, मंडळाने दोन वेळा त्यामध्ये त्रुटी काढून तो नामंजूर केला. वन विभागाने सुधारित प्रस्ताव पुन्हा पाठवला. त्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी चार कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे किल्ले रामपूर गडाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.
    ... असा होणार विकास
    महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ, नागपूर विभागाने ऐतिहासिक किल्ले रामपूर डोंगरी गडाच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये गडाच्या पायथ्यालगत असणारी विहीर नामशेष झाली आहे. ती पुनरुज्जीवित करणे, गडावर प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे, त्याचे सुशोभीकरण करणे, गडाच्या पश्‍चिम बाजूस पायथ्याला तलाव आहे. तो दुरुस्त करून त्यामध्ये पर्यटकांसाठी सुरक्षित बोटिंग तयार करणे, गडाची तटबंदी दुरुस्ती व तो अग्नीपासून सुरक्षित राहील, अशी बांबू निरीक्षण कुटी तयार करणे, यांसह पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने गडाचा विकास साधणे, हे आराखड्यात समाविष्ट करण्यात आहे,

    गडाचा ऐतिहासिक वारसा...
    जत शहरापासून तीन किलोमीटरवर असणाऱ्या रामपूर हद्दीत वसलेला किल्ले रामपूर डोंगरी गड दयनीय अवस्थेत आहे. प्राचीन व ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गडाचे अवशेष काही काळाच्या घटका मोजत आहेत. यामध्ये प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. ईशान्य कोपऱयावरील बुरुज व गडावरील इमारती, गडावर पाणीपुरवठा केली जाणारी ऐतिहासिक विहिरीची दुरवस्था झाली आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड, असा दाखला ग्रामस्थ देतात.

    महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या नागपूर विभागाने चार कोटी सत्तर लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. लवकरच निधीची तरतूद झाल्यानंतर गडाच्या विकास कामाला वेग येईल. जत तालुक्‍यातील एक ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी प्रयत्न राहील. - प्रवीण पाटील, वनक्षेत्रपाल, जत

    जत तालुक्याच्या वैभवात भर पडेल, अशी वास्तू व छत्रपती शिवाजी महाराज हे एक दिवस या किल्ले रामपूर गडावर वास्तव्यास होते. या ऐतिहासिक गडाचा विकास व्हावा, यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास मंत्री व मंत्रालय पातळीवर पाठपुरावा केला होता. आज याला नागपूरच्या पर्यटन विकास मंडळाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. लवकरच गडाच्या विकासाला वेग मिळेल. - आमदार विक्रम सावंत





    ReplyDelete