Friday, May 22, 2020

उमराणी गावाचा वैभवशाली इतिहास

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्यांची एक स्वतंत्र गादी आहे. डफळे घराण्याचे संस्थापक महापराक्रमी श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते. श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सूनबाई राणी येसूबाई यांनी 1706 ते 1738 सालापर्यंत डफळे संस्थानचा एकसूत्री राज्य कारभार सांभाळला.

१७३८ साली राणी येसुबाई यांनी आपले सावत्र दीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले. दत्तकानंतर यशवंतराव, रामराव, भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानचे वारस झाले. या चारही मुलांना राणी येसुबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली. थोरले यशवंतराव यांना जत, दुसरे रामराव यांना डफळापूर, तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वांत लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी देवू केली.
भगवंतराव हे स्वतंत्र उमराणी गादीचे संस्थापक ठरले.
राणी येसुबाई या अत्यंत धार्मिक होत्या. उमराणी शेजारच्या रामतीर्थ येथील उमा-रामेश्वराच्या त्या निस्सीम भक्त होत्या. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांचे वास्तव उमराणी येथेच असे.
१७५४ साली राणी येसुबाई यांचे निधन उमराणी येथेच झाले. डफळे घराण्याच्या या कर्तबगार राणीची उमराणी येथे समाधी आहे. १७३८ साली भगवंतराव डफळे उमराणी संस्थानचे स्वतंत्र जहागिरदार म्हणून नियुक्त केल्यानंतर निजाम उल्मुक उर्फ असफसा बादशाहने त्यांना स्वतंत्र जहागिरीची सनद बहाल केली. त्यानंतर उमराणी संस्थान साताराच्या छत्रपतीच्या अधिपत्याखाली आले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे नाममात्र ठरले व पेशवाईचे युग आले.
१७६८ साली पेशवाईने भगवंतरावांना जहागिरीची सनद बहाल केली. भगवंतराव यांना बुवाजीराव, यशवंतराव व राणोजीराव हे तीन पुत्र होते. भगवंतराव यांच्यानंतर थोरले पुत्र बुवाजीराव गादीचे वारस झाले. त्यांना परशुराम व भगवंतराव ही दोन मुले होती, पेशवाईचा अंत होताच शनिवार वाडयात ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक फडकला. बुवाजीरावनंतर त्यांचे पुत्र परशुराम उमराणीचे राजे बनले.
१८५७ साली ब्रिटीश सरकारने दत्तक वारस नामंजूर केला. नागपूरचे भोसले, लखनोचे नबाब ऑफ अवध, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, साताऱ्याचे छत्रपती यांचे दत्तक वारस ब्रिटीशांनी नामंजूर केले. त्यावेळी १८५७ चे बंड झाले. या राष्ट्रीय उठावामध्ये उमराणी संस्थानने भाग घेतला व इंग्रजी सत्तेविरूध्द बंड पुकारले. ब्रिटीशांच्या सत्तेविरूध्द लढण्यासाठी उमराणीची मोठी फौज साताऱ्याच्या छत्रपतीच्या मदतीस धावून गेली. पण यश आले नाही. ब्रिटीशांनी साताऱ्यांची गादी जप्त केली व उमराणी संस्थानला ब्रिटीशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
राजे परशुराम यांच्या नंतर नारायणराव उमराणीच्या गादीवर आले. नारायणराव यांच्यानंतर त्यांचे पुत्र परशुराम दुसरे गादीवर आले. त्यांनी १९२१ पर्यंत उमराणीचा राज्य कारभार कुशलपणे चालविला. २ नोव्हेंबर १९२१ रोजी त्यांचे निधन झाले. दुसरे परशुराम महाराज यांना बुवाजीराव व अमृतराव हे दोन पुत्र होते. संस्थानाच्या प्रथेनुसार श्रीमंत बुवाजीराव गादीवर आले. श्रीमंत बुवाजीराजे हे प्रखर देशभक्त होते. या देशावरील इंग्रजी सत्ता हटली पाहिजे यासाठीच त्यांनी जोरदार प्रयत्न केले. देशात स्वातंत्र्याचा लढा जोर धरला होता. स्वातंत्र्य लढयातील देशभक्तांना हत्यारे तसेच अन्न, धान्य पुरविण्याचे बहुमोल कार्य बुवाजीराव यांनी केले.
क्रांतीकारकांच्या अनेक शिबिराचा खर्च बुवासाहेब यांनी केला. पत्री सरकार नाना पाटील, रत्नाप्पा कुंभार, वसंतदादा पाटील या क्रांती कारकांना बुवासाहेब महाराजांनी फार मोठे सहकार्य केले. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाच मार्च १९५६ रोजी देशभक्त राजे अनंतात विलीन झाले. श्रीमंत बुवाजीराव यांच्यानंतर त्यांचे पुत्र बाबासाहेब महाराज. उमराणी गादीचे वारस बनले. श्रीमंत बाबासाहेब हे १० वर्ष सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. पाच जानेवारी १९८३ साली त्यांचे निधन झाले. वंशपरंपरेप्रमाणे त्यांचे ज्येठ सुपुत्र कर्नल अजयसिंह उमराणीच्या गादीवर बसले. ते मराठा बटालियनमध्ये कर्नल या पदावर
होते. १९६२ साली झालेल्या भारत- पाकिस्तान, १९६५ साली झालेल्या भारत-चीन व १९७१ च्या बांगला देशात पराक्रम गाजविला. १४ जानेवारी १९९३ साली कर्नल अजयसिंह यांचे
निधन झाले. त्यांन मुलबाळ नव्हते. त्यामुळे बंधु अमरसिंह गादीवर आले. वंशपरंपरेने त्यांचा शाही राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना अदिराजसिंह नावाचे सुपुत्र आहेत. बुवाजीराव यांचे दुसरे बंधू अमृतराव यांनी विजयसिंह यांना आपले दत्तक वारस म्हणून घेतले. विजयसिंह डफळे उमराणीकर हे
राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. सांगली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदही त्यांची वर्णी लागलेली होती. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नावाजलेली पदे भूषविली. त्यांना दत्तराजसिंह नावाचे सुपुत्र आहेत. बुवाजीराव यांचे तिसरे बंधू दादासाहेब डफळे यांना फतेसिंह, धैर्यशील, दिलीपसिंह व रणजितसिंह अशी चार मुले आहेत.
श्रीमंत अमरसिंह डफळे यांचे पणजोबा श्रीमंत परशुराम महाराज हे सीजी हेडर्सन यांचे जवळचे मित्र होते. हेडर्सन यांना भारतीय प्रशासनाचे पितामह म्हटले जाते. विजापूर भागातील पोलिटिकल एजंट म्हणून कामकाज पहात असताना हेडर्सन उमराणीच्या राजवाड्यात येवून गेले होते. उमराणीचे डफळे अतिशय प्रजादक्ष राजे म्हणून ओळखले जात होते. गावातील दीनदलितांपासून कोणच्याही घरी पाहुणे आले तर पाहुण्यांच्या भोजनाचे सर्व साहित्य राजवाडयातून दिले जात होते.
उमराणी संस्थानच्या अनेक परंपरा आजही पाळल्या जातात. त्यामध्ये दसरा उत्सवाचा विशेष समावेश आहे. विजयादशमी च्या दिवशी संस्थानचे वारसदार राजेशाही पोशाख परिधान करतात.   सरदार व मानकरी आपला पारंपरिक पोशाख घालतात. व ज्या पद्धतीने सीमोल्लंघन आजही केलं जाते हे विशेष!
चिनगीसाहेब हे डफळे घराण्याचे दैवत असून उमराणी येथे दरवर्षी बाबांचा उरूस केला जातो. ईदच्या दिवशी नमाज पठणानंतर सर्व मुस्लीम समाज आजही राजवाड्यात येतात व तेथे दरबार भरविला जातो. दरबारात सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात.

No comments:

Post a Comment