Tuesday, May 19, 2020

जतचा पहिला क्रांतीकारक- वीर सिंदूर लक्ष्मण

भारत स्वतंत्र व्हावा यासाठी देशभरातील लाखो देशभक्तांनी आपल्या जिवाचे रान केले. अनेकांनी निधडया छातीने इंग्रजाच्या गोळया छातीवर झेलल्या, जन्मठेपेची शिक्षा भोगली. जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञातअज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जतसारख्या दुष्काळी व मागासलेल्या भागातही स्वातंत्र्याच्या क्रांतीचे वारे जोरात वाहू लागले होते. याच काळात जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण नामक युवकांने क्रांतीचा झेंडा हाती घेतला व सारे रान, पेटविले. भीम ताकतीच्या या युवकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

देशासाठी या क्रांतीकाराने आपल्या प्राणाची आहुती देत जतचा पहिला क्रांतीकारक होण्याचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. जत तालुक्यतील सिंदूर येथील लक्ष्मण नाईक हा गरीब शेतकरी कुटुंबातला  उमराणीहून सिंदूरला जाताना जी खोल दरी लागते तेथे राहत होते. एक तडफदार व भीम ताकतीचा युवक म्हणूनच त्याला परिसरात ओळखले जात होते. इंग्रजाचा राजरोस सुरू असलेला अन्याय, श्रीमंत वर्गाचा मनमानी कारभार यामुळे सिंदूरचा लक्ष्मण अस्वस्थ असायचा. गोरगरिबांवर अन्याय झाल्यास त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जायाची. पण एकीची ताकत नसल्याने सिंदूरच्या या लक्ष्मणाचे काहीच चालत नसल्याने चावडीत बेसाकरची (वालीकर) म्हणूनच काम करणे लक्ष्मणने पसंत केले होते. पण, काळाला ते मान्य नव्हते. एका दुष्काळी रात्री लक्ष्मण घराबाहेर झोपला असता दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून आसरा मागितला. दरोडेखोराचे रूप पाहून लक्ष्मण चवताळला व त्यांनी गोरगरिबांची लूट करत असल्याबद्दल त्या दरोडेखोरांची खरडपट्टी काढली. दरोडेखोरांशी सुरू असलेल्या संभाषणातून लक्ष्मणाच्या एक गोष्ट लक्षात आली की केवळ इंग्रजच देशाला लुटत नाहीत तर गोरगरिबांच्या जमिनी, सोने-नाणे, घरदार लुटणारी उच्चप्रभू श्रीमंतांची टोळीच कार्यरत आहे. केवळ गोरगरिबांना श्रीमंत मंडळी लुटत नव्हती तर त्यांच्या बायकापोरावरही वाईट नजर ठेवायची. अन्यायाची चीड येणारा लक्ष्मण या वृत्ताने पेटून उठला व त्यांने स्वत:ची टोळी तयार करण्याचा संकल्प केला. केवळ संकल्प केला नाही तर भाचा नरसा याला सोबत घेऊन दरोडेखोरांची टोळीच तयार केली.
जत तालुक्यातील बिळूर येथील मन्या सावकार म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या मनोहर कुलकर्णी यांच्या बाड्यावर सिंदूरच्या लक्ष्मण टोळीने पहिला दरोडा टाकला व धान्याची पोती लुटून नेली. लुटून नेलेली धान्याची पोती त्यांनी उपाशीपोटी मरणयातना भोगत असलेल्या गरिबांना मुक्त हस्ते वाटप केली. त्यानंतर त्यांनी गोरगरिबांना लुटलेल्या सावकारांचा फडशा पाडत अनेक गोरगरिबांची कर्जे, सावकाराकडे गहाण पडलेल्या जमिनी, घरेदारे, दागदागिने आपल्या जबरीने सोडवून आणले. बालीकर म्हणून सिंदूरच्या चावडीत काम करणारा सिंदूरच्या लक्ष्मणाची टोळी त्याकाळात चांगलीच फार्मात आली.'गरिबांचा वाली तर श्रीमंतांचा कर्दनकाळ' कर्नाटकात म्हणून सिंदूरच्या लक्ष्मणाचा महाराष्ट्रासह कर्नाटकत  दबदबा निर्माण झाला. त्यांचे  नाव जरी काढले तरी श्रीमंत मंडळी थरथरा  कापायची. दरोडेखोरांच्या रूपाने लक्ष्मण  गरिबांचा देव झाला. क्रांतीचा पहिले बलाढ्य, क्रांतीकारक पाऊल टाकत त्याने व त्यांच्या सवंगाड्यांनी परिसरातील गोरगरिबांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे व अन्याय करणाऱ्यांना फोडून काढण्याचे काम हाती घेतले. पीळदार शरीराचा व  ताकदीचा लक्ष्मण पायामध्ये खिळ्याची चप्पल घालायचा. वाडेच्या वाडे तो सहज पार करायचा, सिंदूर, लक्ष्मणाच्या या असलेल्या या बीराचा पराक्रमामुळे संस्थान व इंग्रज सरकार
चांगलेच हबकले. त्याला पकडण्यासाठी नामी युक्त्या त्यांनी वापरल्या. विजापूर जिल्हाधिकारी, जत संस्थानचे पोलीस व ब्रिटिशांनी लक्ष्मणला पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. पण, डोंगर-दऱ्यात राहणारा लक्ष्मण गोऱ्या सोल्जर व संस्थान पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांकडून पळविलेल्या बंदुका, कुराडी, भाले तसेच लक्ष्मणाचा पाठीराखा धनिक वतनदार व्यंकाप्पा नाईक यांनी दिलेली बंदूक व गोरगरिबांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या टोळीची ताकत दुप्पट झाली होती.

म्हमूललाल फौजदाराचे शीर वेशीला टांगले
वीर सिंदूर लक्ष्मणाच्या अनेक दंतकथा आजही महाराष्ट्र व कर्नाटक सिमेवर सांगितल्या जातात. त्यांच्या वीरश्रीचे पोवाडे गायले जातात. इंग्रजांच्या नाकीनऊ आल्यानंतर इंग्रजांनी सिंदूरच्या या वीराला पकडण्यासाठी रोख दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी म्हमूललाल फौजदाराने सिंदूरच्या लक्ष्या टोळीला जेरबंद करण्याचा विडा उचलला होता. ही  माहिती लक्ष्मणला कळताच चवताळलेल्या
 लक्ष्मणाने फौजदार म्हमूलालला गाठले व त्यांचे मुंडके धडावेगळे करून वेशीला टांगले होते. म्हमूललालचे मुंडके सिंदूरच्या लक्ष्मणने घडावेगळे टाकल्याची वार्ता कळताच इंग्रजासह संस्थान पोलीस, विजापूर जिल्हाधिकारी यांचे चांगलेच धाबे दणाणले. व्यंकाप्पा नाईक यांनी दिलेल्या बंदुकीच्या गोळीने गार्नर नावाच्या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हॅट हवेततल्या हवेतच लक्ष्मणाने उडविल्याने वीर सिंदूर लक्ष्मणाची प्रचंड दहशत परिसरात निर्माण झाली. दोन ते तीन वेळा सिंदूर लक्ष्मण व त्याचा भाचा नरसा याला पोलिसांनी गजाआड केले होते. पण, या दोन्ही बहाद्दरांनी तुरुंग फोडून पलायन केले होते. जतच्या डफळे संस्थानचे कै. रामराब डफळे यांनी क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणला खरा देशभक्त असे संबोधले होते.

पत्नीची साथ मोलाची 
हतबल झालेल्या इंग्रजांनी सिंदूर येथील लक्ष्मणाचे घरदार जप्त केले. घरदार जप्त केल्याने त्यांची पत्नी चंद्रा व वयोवृद्ध आईलाही रानोमाळ फिरावे लागले. या  संपूर्ण लढ्यात पत्नी चंद्रा हिनेही मोलाची साथ दिली. पतीच्या खांद्याला खांदा लावून तीही क्रांतीच्या या लढ्यात उतरली. सिंदूर न्यांनी साम्राज्यशाही लक्ष्मण व त्याचा भाचा नरसा हे दोघेही तुरूंगात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पत्नी चंद्रा हिने खास जेवण बनविले. व   धन्यासाठी जेवण आणल्याचे सांगितले.
 जेवणाची तपासणी करून जेवण लक्ष्मणला देण्यात आले. जेवणाच्या या दुरडीत कडबू  (कर्नाटकातील खास पक्वान्न) देण्यात आले होते. त्या कडबुमध्ये पत्नी चंद्रा हिने सळ्या कापायचे कानस घातले होते. याच कानसाचा उपयोग करून लक्ष्मण व नरसा यांनी जेल फोडून पलायन केले होते. लक्ष्मणची पत्नी चंद्राही धाडसी, शूर व साहसी होती. दऱ्याखोऱ्यात फिरत असलेल्या आपल्या पतीला, त्यांच्या टोळीला ती अन्न, पाणी व रसद पुरवायची.

व्यंकाप्पा नाईकाने केला घात
ज्या व्यंकाप्पा नाईकाने वीर सिंदूर लक्ष्मण व त्यांच्या टोळीला सर्वतोपरी सहकार्य केले त्याच व्यंकाप्पाला हाताशी धरून इंग्रजांनी क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणाचा घात केला. इंग्रजांनी धूर्तनीतीचा अवलंब करीत व्यकाप्पा नाईकालाच फितूर केले. त्यांचे वतन खालसा करण्याची धमकी देण्याबरोबरच जादा जमीन व वतन देण्याचे आमिष व्यंकाप्पाला दाखविले. एका अमावस्येच्या रात्री व्यंकाप्पाने वीर सिंदूर लक्ष्मण व भाचा नरसा याला गावाबाहेर असलेल्या देवळाच्या आवारात जेवणासाठी बोलावले. यात काही दगाबाजी असेल अशी शंका न आल्याने वीर लक्ष्मण बिनधास्त व्यंकाप्पा यांच्या आमंत्रणाला मान देऊन जेवणास गेला. व्यंकाप्पाने जेवणाची तयारी केली होती तर इंग्रज शिपायांनी सर्व परिसर घेतला होता. लक्ष्मण ओळखता यावा म्हणून व्यंकअप्पाने लक्ष्मण च्या बाजूला कंदील ठेवला होता. लक्ष्मणने जेवणास सुरुवात करताच लपलेल्या इंग्रज शिपायांनी वीर सिंदूर लक्ष्मणावर फ़ैरी झाडल्या. या दगाबाजीने सिंदूरच्या या लक्ष्मणाचा बळी घेतला व जतचा पहिला क्रांतीकारक होण्याचा मानही त्याला मिळाला.

सिंदूर कट्टा
क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणाला ज्या ठिकाणी गोळ्या घालून इंग्रजांनी ठार मारले तो भाग जमखंडी संस्थानातील कल्लोळी गावानजीक आहे. गोळ्या घातल्यानंतर लक्ष्मण धारातीर्थी पडला, त्या कट्ट्याला आजही 'सिंदूर कट्टा' म्हणून ओळखले जाते. तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली असून त्या समाधीवर सिंदूर लक्ष्मण असे नाव देण्यात आले आहे. क्रांतीकारक वीर सिंदूर लक्ष्मणाच्या कथा आजही परिसरात आवर्जून जुन्या लोकांनाडून सांगितल्या जातात. वीर सिंदूर यांच्या जीवनावर कर्नाटकात नाटकाचे प्रयोग केले जातात. याला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात चांगला प्रतिसाद मिळतो. 

No comments:

Post a Comment