Thursday, May 21, 2020

भक्ती आणि शक्तीपीठ श्री बिसल सिद्धेश्वर

जत-येळवी रस्त्यावर निर्जन स्थळी योगेश्वर श्री बिसल सिध्देश्वर यांचे असलेले समाधीस्थळ जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर ओळखले जाते. जतसह कर्नाटकातील भाविकांचे शक्तीपीठ, भक्तीपीठ म्हणून उदयास येत आहे. श्री बिसल सिध्देश्वरांचे जीवन चरित्र ९०० वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. श्री बिसल सिध्देश्वर जतच्या या भुमीत आले कसे? यांची आख्यायिका प्रसिध्द आहे. जतचा हा भाग पूर्वी मिरवाड नावाने ओळखला जात होता. सुंदरतेने नटलेल्या या गावावर नंदेआप्पा गौंड यांचे राज्य होते. राजा नंदेआप्पा गौंड व महाराणी गंगादेवी यांना अनेक वर्षापासून पुत्ररत्न नसल्याने जोडपे दु:खी होते. अनेक वर्षानंतर महालिंगरायाच्या रूपाने राजा नंदेआप्पा व महाराणी गंगादेवी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण महालिंगरायाला महारोग झाल्याने ते चिंतेत होते.

एके दिवशी दारी आलेल्या साधूने महालिंगरायाला कल्याणपट्टण येथे एक साधू गावाबाहेर तपश्चर्या करत आहे, त्याला रोगमुक्त होण्यासाठी तेथे पाठवावे, असे सांगितले व महालिंगरायाला आशीर्वाद देवून साधू निघून गेला. साधू निघून जाताच अंथरूणावर खिळून पडलेला महालिंगराया चालू फिरू लागला. साधूच्या या चमत्कारामुळे आनंदी झालेल्या महालिंगरायाने रोगमुक्त होण्यासाठी आईला परत येण्याचे वचन देवून थेट कल्लाणपट्टण गाठले. कल्लाणपट्टण येथे
आल्यानंतर त्याला गावाबाहेर श्री बिसल सिध्देश्वर तपश्चर्या करत असल्याचे दिसले. त्यांनी श्री बिसल सिध्देश्वर यांची मनापासून सेवा सुरू केली. भक्तीवर प्रसन्न झालेल्या श्री बिसल सिध्देश्वर यांनी महालिंगरास लवकरच रोगमुक्त केले
व आईला दिलेले वचन पाळण्याचा आदेश देत परत जाण्यास सांगितले. भक्तीत रमलेल्या महालिंगरायास  श्री.बिसल सिध्देश्वर यांना सोडून जाण्यास मन धजेना, त्यांची इच्छा होईना. आदेश व ॐ वचन या चक्रव्युहात अडकलेल्या महालिंगरायाने श्री बिसल सिध्देश्वर यांना कोडे घातले. मी परत जातो पण तुम्ही जेथे असाल तेथे तेथे येवून दररोज आपली दूध, तुप व लोणीने पूजा करू इच्छितो तेव्हा आपणास दररोज दर्शन द्यावे, अशी इच्छा प्रकट केली.
महालिंगरायाला मनाप्रमाणे श्री बिसल सिध्देश्वर यांनी वर दिल्याने महालिंगराय मिरवाड नगरीत परतले व श्री बिसल सिध्देश्वर यांची मनोभावे भक्ती करू लागले. दरम्यान श्री बिसल सिध्देश्वर यांनी भक्त महालिंगरायाची कठोर परीक्षा घेतली. प्रत्येक परीक्षेत महालिंगराया उत्तीर्ण झाले. महालिंगरायाच्या भक्तीने प्रसन्न झालेले श्री बिसल सिध्देश्वर स्वत:च भक्तं महालिंगराय यास भेटण्यास मिरवाड नगरीत आले
व तेथेच कायमचे वास्तव्य केले. जतपासून पाच किलोमीटरवर श्री बिसल, सिध्देश्वर यांचे मंदिर आहे. हे मंदिर भक्त चोळळी यांनी बांधले आहे. मंदिरात श्री सिध्देश्वर डिकमळ, नंदी आहे. या मंदिरासारखेच दुसरे हुबेहुब मंदिर अचकनहळळी
हद्दीत मल्ल्याळ येथे आहे. जतकर व मल्ल्याळच्या लोकांनी या मंदिराची उभारणी केली आहे. मंदिरापासूच जवळच असलेल्या काराजनगी येथे श्री बिसल सिध्देश्वर यांच्या आदेशापासून आजही दुधाची विक्री केली जात नाही हे विशेष! मिरवाडच्या महालिंगरायाच्या जीवनात घडलेल्या अनेक घटना, चोळळयाच्या जीवनातील प्रसंग, बालविधवा निलगंगाची कहाणी, परमभक्त हुच्चव्याची अमर कहाणी सर्वत्र प्रसिध्द आहे. भक्तांच्या हाकेला ओ देणारा म्हणून श्री बिसल सिध्देश्वर यांना ओळखले जाते. आठवड्यातील रविवार, सोमवार, गुरूवार व श्रावण महिन्यात महिनाभर तसेच श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी यात्रा भरते. 

No comments:

Post a Comment