जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड
सध्या पाचवीच्या वर्गात शिकत असलेली श्रेया हिप्परगी बुद्धीबळ स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. वडिलांची मदत, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन असलेल्या श्रेयाने जतसारख्या ग्रामीण भागाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशालेत शिकत असलेल्या श्रेयाची १९ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची निवड झाली. गेल्या काही वर्षात अनेक स्पर्धातून पारितोषिके पटकावली आहे. नुकतेच ११ ते १३ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन स्पर्धा झाली. त्यामध्ये दहा वर्षाखालील मुलींच्या गटात सातपैकी सहा फेऱ्या जिंकून श्रेया हिने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत आशिया खंडातील २० देशातील खेळाडू सहभागी झाले होते. तिने द्वितीय क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली. तिच्या निवडीमुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रेया सध्या नागपूरचे आंतरराष्ट्रीयमास्टर अनुप देशमुख यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे.
जत तालुक्यातील सिंदूर येथील गुरू हिप्परगी सध्या संख येथे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. याच खेळाची गोडी मुलगी श्रेयालाही लागावी यासाठी त्यांनी तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळवले. काही वर्षांपूर्वी सांगली येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली.
थायलंड येथील स्पर्धेसाठी तिला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. तिच्या कुटुंबियांनी तर दीड लाख रुपये खर्च केले होते. स्पेन येथे झालेल्या स्पर्धेतही तिने यश मिळवले होते. संगणक, मोबाईलवर विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पोरोव यांसारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंच्या खेळातील चालीचा अभ्यास ती करीत आहे.
आशियाई स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची १९ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तिला संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनूर, ए. एस. बिराजदार, दिपक वायचळ मार्गदर्शन लाभत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment