Wednesday, March 17, 2021

जतच्या प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरेचे अधिक संशोधन व्हावे


जतला प्राचीन आणि ऐतिहासिक अशी मोठी परंपरा आहे, याचा पुरावा अलिकडच्या काळात सापडलेल्या विविध ठिकाणच्या शिलालेखावरून आढळून येत आहे. रामायण आणि महाभारत काळात हा परिसर सर्व प्रदेश समृद्ध होताच शिवाय राम,सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबरच महाभारतातील प्रमुख व्यक्तींचा पावनस्पर्श या भूमीला लागला आहे. या भागात आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शिवाय सापडलेल्या शिलालेखांचे संग्राहलय उभे करण्यात यावे आणि जतच्या ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहासाचा या माध्यमातून परिचय करून देण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.

परवाच जतजवळ असलेल्या मल्लाळ गावात शेतात नांगरणी करताना एका शेतकऱ्याला 900 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. यापूर्वी वज्रवाड, बालगाव, कुडणूर परिसरात शिलालेख आढळून आले आहेत. दुष्काळी आणि मागास अशा  जत तालुक्याला  अतिशय प्रगल्भ असा इतिहास लाभला आहे. जत तालुक्यामध्ये सापडणारे शिलालेख या इतिहासाच्या वैभवामध्ये भरच टाकत आहेत.

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, शिलालेख आढळून येत आहेत. तालुक्यातील मल्लाळ याठिकाणी दीपक माने या इसमाची डोंगरावर जमीन आहे. याठिकाणी नांगरणी करत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे.सन 1120 मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर (जमीन आकार ) जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चालूक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे. गेल्या सहा महिन्यात नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचे हे चार शिलालेख मिरज संशोधन मंडळामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात समोर आले आहेत. या तालुक्याच्या विविध गावात चालुक्य, कलचुरी, यादवकालीन यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटरवर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे. यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे या व्यक्तीला मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन होते. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. याबद्दल येथील रहिवासी मारूती ओलेकर आणि ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी याठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला असता या शिलालेखात एकूण 13 ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले असून, या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे.

चालुक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी राजा होता. त्याने 50 वर्षे राज्य केले आहे. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला. चालुक्य सम्राट विक्रमादित्य हा इसवी सन 1076 मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली होती . त्या मंदिरांसाठी जमीनी दान देण्यात आल्या होत्या, त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.

या शिलालेखात काय आहे

मल्लाळ येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रम शक 45 शार्वरीनामसंवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी 10 मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या लेखात आहे. हा लेख 1 ऑगस्ट सन 1120 रोजी लिहिला गेला आहे. या लेखात उल्लेख केलेला जतचा प्रमुख बंकेय याने जतमध्ये बांधलेल्या शिवमंदिराला बंकेश्वर या नावाने ओळखले जाते. जत आणि परिसरात या दंडनायकाचे प्रभुत्व असल्याचे या शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात त्याच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. जत तालुक्यातील अभ्यासक, संशोधक, राजकीय, तसेच विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन जतचा इतिहास जगासमोर आणायला हवा. जतचे ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी  जतचा वैभवशाली इतिहास पुस्तकरूपाने लिहिला आहे. आता ते प्राचीन आणि स्थळांची माहिती आणि छायाचित्रे युट्युबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणत आहेत.

आजपर्यंत जत तालुक्यात मध्ये सापडलेले शिलालेख

1) वज्रवाड- येथे साडेसहाशे वर्षांपूर्वीचा हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. 1371 मध्ये सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्या पूजा नैवेद्यासाठी जमिनी दान दिल्याचा यावर उल्लेख आहे.

वज्रवाड शिलालेख-2) जत तालुक्यातील कर्नाटक सीमेजवळ बालगाव नऊशे वर्षापूर्वी शिलालेख आहे. हा 1136 मधील शिलालेख असून यावर चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या मांडलिक बीज्जल कलचुरी दिलेला दानलेख यावर आहे.

बालगाव शिलालेख- 3) जत आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्याच्या सीमेवर असलेलं कुडनूर गावामध्ये यादवकालीन शिलालेख सापडलेला आहे. या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. साधारणत: एक हजार पूर्वीचा हा शिलालेख आहे.

कुडनूर गावात सापडलेला शिलालेख- 4) मल्लाळ याठिकाणी सापडलेला चालुक्य सम्राट विक्रमादित्याचा शिलालेख

Thursday, March 4, 2021

कुडणूरला सापडला यादवकालीन शिलालेख


जत तालुक्यातील पश्चिम भागातील कुडणूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर, मानसिंग कुमठेकर यांना हा शिलालेख आढळून आला आहे. कुडणूरजवळ असलेल्या शिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपासून या दोघांचे संशोधन सुरू आहे. हा शिलालेख मारुती मंदिराशेजारील रस्त्यावर भंगलेल्या अवस्थेत होता. तालुक्यात चालुक्य आणि यादवकालीन काही शिलालेख मिळाले आहेत. जत तालुक्याच्या एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर कुडणूर हे गाव आहे. कुडणूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतीश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी एक शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा.काटकर, कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती. शिलालेखाचे दोन भाग झाले होते. शिलालेखाच्या वरच्या बाजूला गाय, सूर्य-चंद्र, शस्त्र अशी चित्रे कोरली आहेत. या लेखाचा अभ्यास तज्ज्ञ लोकांकडून अभ्यास करून घेण्यात आला. त्याचे वाचन करून घेण्यात आले. यात नऊ ओळी आहेत. वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. सदर लेखात शिंगणापूर येथील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर  या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. या गावाशेजारी शिंगणापूर हे गाव आहे. या गावात असलेल्या महादेवाच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र सध्या अशा नावाची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरून आणि लिपिवरून हा लेख उत्तर यादव काळातील असावा असाही अंदाज आहे. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादव राजा सिंघण याच्या नावावरून स्थापन केलेल्या मंदिराचा असावा. जत तालुक्यात सिंगणहळळी आणि शिंगणापूर अशी गावांची नावे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरूनच असावीत.

ओढयांच्या संगमावर

कुडणूर हे गाव ओढ्याच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोड्या अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ शिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने सदरचा शिलालेख कुडणूर गावाच्या हद्दीत आला असावा, असेही संशोधक कुमठेकर यांनी सांगितले.