Tuesday, January 30, 2024

जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

सांगली : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. दारिद्य्राशी झुंजणारे कुटुंब, वडापचे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे वडील अशा वातावरणातून आलेल्या मुलाने जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक


पटकाविले.दुष्काळी उमदी (ता. जत) येथील वडाप चालकाचा मुलगा निखिल नागप्पा कोळी याने तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात ९३ किलो व क्लीन अँड जर्क या प्रकारात ११९ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.निखिल सध्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये बारावीत शिकत आहे. उमदी येथील क्रीडा प्रशिक्षक संजय नांदणीकर यांनी वेटलिफ्टिंगचे त्याला प्रशिक्षण दिले. निखिल याने संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने अरुणाचल प्रदेश येथील राष्ट्रीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याची निवड झाली होती. तेथील कामगिरीच्या जोरावर तो तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्तरावरही त्याने यशाची कहाणी नोंदविली.निखिलची परिस्थिती बेताची आहे. वडापचालक म्हणून काम करीत वडिलांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. मात्र, जबाबदारीचा भार उचलत निखिलने भारोत्तलनात चमक दाखवून वडिलांच्या कष्टाला यशाचे कोंदण लावले. निखिलला सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस.के. होर्तीकर यांनी मोठे पाठबळ दिले. देशपातळीवर यशाचा झेंडा रोवण्याची निखिलमधील क्षमता ओळखून होर्तीकरांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हटल्यावरही पैशाचा भार पडतो. हा भार पेलण्याचे काम शिक्षण संस्थेने केली.निखिलचे प्रशिक्षक असलेले संजय नांदणीकर यांनीही त्याची जिद्द व प्रामाणिकपणा ओळखला होता. पहाटे कितीही वाजता सरावाला येण्याची त्याची तयारी, अनेक तास सराव करण्याची मानसिकता त्याच्यात होती. नांदणीकरांना त्याच्यातील हा गुण भावला. राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडविणाऱ्या नांदणीकरांनी निखिलची जबाबदारीही स्वीकारली. त्यांनीही तेवढीच जिद्द दाखवित त्याला यशापर्यंत पोहोचविण्यास मदत केली.

निखिलने यशासाठी खूप कष्ट घेतले आहेत. एवढ्या यशावर न थांबता पुढील एशियन गेम्सकरिता आम्ही तयारी करणार आहोत. देशाचे नाव मोठे करण्याची क्षमता निखिलमध्ये आहे.- संजय नांदणीकर, प्रशिक्षक, उमदी (ता. जत)

Sunday, January 21, 2024

जत: डफळापुरातील प्राचीन राम मंदिर आहे शिवशाही काळातील


 येथील श्री राम मंदिराचा कालावधी सन १६७०-१६८० सांगितला जातो. येथील श्रीराम मंदिर  गावच्या मध्यभागी प्राचीन राजवाडा परिसरात आहे. डफळापूर व जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण  यांनी जत, कारजनगी, होनवाड व बारडोल प्रांताची देशमुखी प्राप्त केल्यानंतर येथे राजवाडा बांधला.

श्रीराम मंदिर याच काळात बांधले असावे. डफळापूर संस्थानच्या वार्षिक (१८५०-१९१७) अहवालात चव्हाण घराण्यातील खासगी मालकीच्या राममंदिरावर केलेल्या खर्चाच्या नोंदी आहेत. संस्थानचे शेवटचे शासक रामचंद्रराव चव्हाण  होते. त्यांच्या मृत्यूनंतर राणीबाई चव्हाण यांनी कारभार केला. राणीबाई यांनी मंदिराभोवती १९१३-१४ मध्ये बांधकाम केल्याची नोंद आहे.

संस्थानमध्ये रामनवमी उत्साहात केल्याच्या नोंदी आहेत. राणीबाई यांच्या मृत्यूनंतर संस्थान जत संस्थानमध्ये विलीन करण्यात आले. गाडवे या मंदिराचे सध्या पुजारी आहेत. ते दररोज पूजा करतात. श्रीराम मंदिराची रचना काळ्या पाषाणात आहे. आयताकार दगडी चौथऱ्यावर चौरस गाभारा आहे. प्रवेशद्वार पूर्वेस आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर प्रवेशमंडपासाठी जागा सोडली आहे. चारही दिशांना भिंती काटकोनी पद्धतीने असून गाभाऱ्यावर शिखर नाही.

उत्तरेला गर्भगृहातून देवपूजा वा अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्यासाठी गोमुख शिल्प आहे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या वरच्या चारही दिशेला वानरशिल्प कोरलेले असून पूर्वेस प्रवेशद्वाराजवळ डाव्या व उजव्या बाजूस प्राण्यांची शिल्पे आहेत. आतून पाहिले असता छत घुमटाकार दिसते. बाहेरून सपाट दिसते.

धनुर्धारी रुपातील श्रीराम मूर्ती आहे. उजवीकडे माता सीता व डावीकडे लक्ष्मण आहेत. लक्ष्मणाच्या डाव्या अंगाला रामभक्त श्री हनुमान मूर्ती आहे. सर्व मूर्ती या दगडी चौथऱ्यावर बसवल्या आहेत. मूर्ती शास्त्राप्रमाणे परिपूर्ण मूर्तिमंत असून क्षत्रिय शरीराचे प्रदर्शन करणारी प्रभू श्री रामाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीवरील कोरीव काम लक्ष वेधून घेणारे आहे.

(साभार-दैनिक सकाळ)