Tuesday, January 30, 2024

जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

सांगली : परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्दीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते. दारिद्य्राशी झुंजणारे कुटुंब, वडापचे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारे वडील अशा वातावरणातून आलेल्या मुलाने जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक


पटकाविले.दुष्काळी उमदी (ता. जत) येथील वडाप चालकाचा मुलगा निखिल नागप्पा कोळी याने तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात ९३ किलो व क्लीन अँड जर्क या प्रकारात ११९ किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.निखिल सध्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये बारावीत शिकत आहे. उमदी येथील क्रीडा प्रशिक्षक संजय नांदणीकर यांनी वेटलिफ्टिंगचे त्याला प्रशिक्षण दिले. निखिल याने संभाजीनगर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने अरुणाचल प्रदेश येथील राष्ट्रीय युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत त्याची निवड झाली होती. तेथील कामगिरीच्या जोरावर तो तामिळनाडू येथे खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी झाला होता. राष्ट्रीय स्तरावरही त्याने यशाची कहाणी नोंदविली.निखिलची परिस्थिती बेताची आहे. वडापचालक म्हणून काम करीत वडिलांना कुटुंबाचा भार उचलावा लागत आहे. मात्र, जबाबदारीचा भार उचलत निखिलने भारोत्तलनात चमक दाखवून वडिलांच्या कष्टाला यशाचे कोंदण लावले. निखिलला सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस.के. होर्तीकर यांनी मोठे पाठबळ दिले. देशपातळीवर यशाचा झेंडा रोवण्याची निखिलमधील क्षमता ओळखून होर्तीकरांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हटल्यावरही पैशाचा भार पडतो. हा भार पेलण्याचे काम शिक्षण संस्थेने केली.निखिलचे प्रशिक्षक असलेले संजय नांदणीकर यांनीही त्याची जिद्द व प्रामाणिकपणा ओळखला होता. पहाटे कितीही वाजता सरावाला येण्याची त्याची तयारी, अनेक तास सराव करण्याची मानसिकता त्याच्यात होती. नांदणीकरांना त्याच्यातील हा गुण भावला. राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडू घडविणाऱ्या नांदणीकरांनी निखिलची जबाबदारीही स्वीकारली. त्यांनीही तेवढीच जिद्द दाखवित त्याला यशापर्यंत पोहोचविण्यास मदत केली.

निखिलने यशासाठी खूप कष्ट घेतले आहेत. एवढ्या यशावर न थांबता पुढील एशियन गेम्सकरिता आम्ही तयारी करणार आहोत. देशाचे नाव मोठे करण्याची क्षमता निखिलमध्ये आहे.- संजय नांदणीकर, प्रशिक्षक, उमदी (ता. जत)

Sunday, January 21, 2024

जत: डफळापुरातील प्राचीन राम मंदिर आहे शिवशाही काळातील


 येथील श्री राम मंदिराचा कालावधी सन १६७०-१६८० सांगितला जातो. येथील श्रीराम मंदिर  गावच्या मध्यभागी प्राचीन राजवाडा परिसरात आहे. डफळापूर व जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण  यांनी जत, कारजनगी, होनवाड व बारडोल प्रांताची देशमुखी प्राप्त केल्यानंतर येथे राजवाडा बांधला.

श्रीराम मंदिर याच काळात बांधले असावे. डफळापूर संस्थानच्या वार्षिक (१८५०-१९१७) अहवालात चव्हाण घराण्यातील खासगी मालकीच्या राममंदिरावर केलेल्या खर्चाच्या नोंदी आहेत. संस्थानचे शेवटचे शासक रामचंद्रराव चव्हाण  होते. त्यांच्या मृत्यूनंतर राणीबाई चव्हाण यांनी कारभार केला. राणीबाई यांनी मंदिराभोवती १९१३-१४ मध्ये बांधकाम केल्याची नोंद आहे.

संस्थानमध्ये रामनवमी उत्साहात केल्याच्या नोंदी आहेत. राणीबाई यांच्या मृत्यूनंतर संस्थान जत संस्थानमध्ये विलीन करण्यात आले. गाडवे या मंदिराचे सध्या पुजारी आहेत. ते दररोज पूजा करतात. श्रीराम मंदिराची रचना काळ्या पाषाणात आहे. आयताकार दगडी चौथऱ्यावर चौरस गाभारा आहे. प्रवेशद्वार पूर्वेस आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर प्रवेशमंडपासाठी जागा सोडली आहे. चारही दिशांना भिंती काटकोनी पद्धतीने असून गाभाऱ्यावर शिखर नाही.

उत्तरेला गर्भगृहातून देवपूजा वा अभिषेकाचे पाणी बाहेर पडण्यासाठी गोमुख शिल्प आहे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या वरच्या चारही दिशेला वानरशिल्प कोरलेले असून पूर्वेस प्रवेशद्वाराजवळ डाव्या व उजव्या बाजूस प्राण्यांची शिल्पे आहेत. आतून पाहिले असता छत घुमटाकार दिसते. बाहेरून सपाट दिसते.

धनुर्धारी रुपातील श्रीराम मूर्ती आहे. उजवीकडे माता सीता व डावीकडे लक्ष्मण आहेत. लक्ष्मणाच्या डाव्या अंगाला रामभक्त श्री हनुमान मूर्ती आहे. सर्व मूर्ती या दगडी चौथऱ्यावर बसवल्या आहेत. मूर्ती शास्त्राप्रमाणे परिपूर्ण मूर्तिमंत असून क्षत्रिय शरीराचे प्रदर्शन करणारी प्रभू श्री रामाची मूर्ती विलोभनीय आहे. मूर्तीवरील कोरीव काम लक्ष वेधून घेणारे आहे.

(साभार-दैनिक सकाळ)

Tuesday, August 22, 2023

अचकनहळ्ळीचे ऐतिहासिक बिसल सिद्धेश्वर मंदिर


पाचशे वर्षांपूर्वी डोण परिसरात वसलेले; निगडी खुर्द व अचकनहळ्ळी गावांच्या सीमेवरील स्थान तालुक्‍यातील अचनकहळ्ळी हद्दीतील व सुप्रसिद्ध काळ्या मातीच्या डोण परिसरात महान तपस्वी व योगी संत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. पाचशे वर्षांपूवी आदिलशाहने मंदिराची निर्मिती केली असून, संपूर्ण बहामनी कालीन वास्तुशिल्पकलेतून उभारणी झाली आहे. त्या मंदिरास बिसल सिद्धेश्‍वर असेही म्हटले जाते. 

जत तालुक्यासह बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. श्रावणात दररोज सकाळी ६.१५ ला आरती केली जाते. श्रावण सोमवारी 'लाखो भाविक दर्शनास येत असतात व शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. 

हे मंदिर जत शहराच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर आहे. जत ते निगडी दरम्यान काळ्या मातीचे मोठे डोण आहे. डोण परिसरात कुठेही लोकवस्ती वसविता येत नाही. सर्व मातीचा परिसर असल्याने जमिनीत बांधकामासाठी पाया लागत नाही. त्यामुळे परिसरात साधे घरही बांधता येत नाही. असे असले तरी पाचशे वर्षांपूर्वी परिसरात बिसल सिद्धेश्व रांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मुचंडी येथील दरेश्वर व बिसल सिद्धेश्वर या दोन मंदिरांची रचना समान आहे. मंदिराभोवती भव्य तटबंदी आहे. समोर भव्य कमान आहे. मुख्य कमानीच्या आत दोन उंच मीनार आहेत. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सकाळी सूर्य उगवताना मुख्य कमान ,दोन्ही मीनार व नंदीच्या छत्रीच्या माध्यमातून थेट पिंडीवर सूर्यकिरणे पडतात. कन्नड मध्ये उन्हाला'बिसल 'म्हणतात. म्हणून या मंदिरास 'बिसल सिद्धेश्वर' असे नाव पडले आहे. 

जत, निगडी खुर्द व अचकनहळ्ळी या तीन गावांच्या सीमेवर सिद्धेश्वर स्वामी यांनी घोर तपस्या केली. याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. त्या ठिकाणावर विजापूरच्या आदिलशाहने भव्य मंदिर उभारले. प्रतिवर्षी श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनाला येतात. प्रत्येक सोमवारी दर्शनास गर्दी असते. मंदिराच्या विकासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकाराने जिल्हा नियोजन मधून एक कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च करून सभागृह, भक्तनिवास, रस्ता, पेव्हिंग ब्लॉक्स, स्वतंत्र ट्रांसफार्मर असा विकास करण्यात आला आहे.


Saturday, April 8, 2023

इतिहाससमृद्ध गाव बेवनूर

जत तालुक्याच्या उत्तर भागात बेवनूर हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिंदे, देवकर आणि सरगर ही तीन ऐतिहासिक घराणी गावात आहेत. या घराण्यांसंबंधी वाडे, समाध्या, बारव व अन्य वास्तू अवशेष रूपात येथे आहेत. बेवनूर गावच्या इतिहासासंबंधी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली काही वर्षे अभ्यास करीत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना गावात विखुरलेले अवशेष आढळून आले.

समाधीस्थळे

जुन्या महादेव मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर एक छोटी मंदिरवजा समाधी आहे. चुन्याच्या सहाय्याने दगडात बांधलेली आणि वर चुना-विटाचे शिखर असलेली ही समाधी प्रथमदर्शनी मंदिरच भासते. या समाधी मध्ये लहानसे शिवलिंग आहे. समाधीच्या चौथऱ्यावर पुष्पदल कोरले आहे. समाधीच्या चौकटीच्यावर दगडात कोरलेला लेख असून शिंदे- पाटील यांनी शके १७६० म्हणजे इसवी सन १८३८मध्येही समाधी बांधल्याचे म्हटले आहे. गावातील शिंदे घराण्याची ही समाधी असून तेथे समाधी खाली असलेल्या देवळीमध्ये या घराण्यातील मृत व्यक्तिच्या अस्थि आजही ठेवल्या जातात. 

सतीशिळा

महादेव मंदिरासमोरच सतीचे समाधी मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. या सतीसमाधीच्या चौथऱ्याला टेकून सती निदर्शक हात असलेली दगडी शिळा ठेवली आहे. अशीच आणखी एक सतीशिळा काही दिवसांपूर्वी काटेरी झुडुपात काही विद्यार्थ्यना आढळून आली होती. ती जतन करून ठेवण्यात आली आहे.

ऐतिहासिक वाडे

गावात शिंदे, सरगर आणि देवकर या घराण्याचे वाडे आहेत. त्यांची बरीच पडझड झाली आहे. या वाड्यांपैकी काहींच्या भिंतीच्या दगडावर हत्ती, घोडा, मोर, सुर्य-चंद्र, फुलांची नक्षी व अन्य भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. तर काही दगडांवर नावे लिहीली आहेत. काही वाडयात धान्य साठविण्याच्या अंबाऱ्या आहेत. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे हे वाडे आहेत. त्यांची आता बरीच पडझड झाली आहे.

ऐतिहासिक पारकट्टा

गावात मध्यभागी सध्याच्या ग्रामपंचायती समोर ऐतिहासिक पारकट्टा आहे. त्यावर दोन्ही बाजुला सन १९४० हे इंग्रजी व मराठी मध्ये लिहिले आहे. मध्यभागी श्री शिवाजीराव असे नाव लिहिले आहे.

ऐतिहासिक बारव

गावंदरीलगत शिंदे घराण्याच्या समाईक जागेत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची कमानी युक्त बारव आहे. सहा मोटांच्या या बारवेत उतरण्यासाठी अर्धचक्राकार पायऱ्या आहेत. सध्या या बारवेची पडझड सुरू आहे.

म्हसोबा मंदिर

गावाबाहेर दोन ओढ्यांच्या काठावर भव्य आवारात वसलेले म्हसोबा मंदिर आहे. मंदिराला घाटवजा पायऱ्या आहेत. मंदिराजवळच चुन्याची घाणी व दगडी चाक आहे. दरवर्षी येथे गुढीपाडव्यानंतर मोठी यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो.

दीर्घ लष्करी परंपरा

गावाला मोठी सैन्य परंपरा आहे. दुसरे महायुद्ध आणि आझाद हिंद फौजेत येथील जवान सहभागी होते. सन १९६५, १९७१, बांगलादेश आघाडी, सुवर्णमंदिर ऑपरेशन, श्रीलंका शांतिसेना, कारगील अशा विविध समर प्रसंगात येथील जवानांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कामगिरी बद्द्ल येथील जवानांना जंगी इनाम दाखल जमिनीही मिळाल्या आहेत. सध्या गावात आजी माजी सैनिक मिळून सुमारे शंभर जवान आहेत.

शिखर शिंगणापूरची कावड 

येथील शिंदे घराण्याचे कुलदैवत खरसुंडीचा सिद्ध नाथ आहे. मात्र, येथून शिंदे घराण्यातील लोक शिखर शिंगणापूरला कावड अनेक वर्षे नेतात. तांबे धातुच्या या कावडीही ऐतिहासिक आहेत.  समृध्द इतिहास असलेल्या या गावात अन्य काही ऐतिहासिक अवशेष विखुरलेले दिसतात. - मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर

Monday, February 27, 2023

उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने उभारले तब्बल पंधरा कोटींचे बुद्ध विहार


सांगली जिल्ह्यातील गुगवाड (ता. जत) येथील उद्योजक  आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने जतसारख्या दुष्काळी भागात भव्य असे देखणे 'धम्मभूमी' बुद्धविहार उभारले आहे. यासाठी तब्बल पंधरा कोटी खर्च आला आहे. रोज शेकडो लोक ते पाहण्यासाठी येत असतात. श्री. सांगलीकर यांना आळंदी (पुणे) येथे अनाथपिंडक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

 सांगली जिल्ह्यातील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी गुगवाड येथे स्वतः च्या तब्बल वीस एकर जागेत तब्बल पंधरा कोटींचे देखणे प्रशस्त, स्वखर्चाने "धम्मभूमी"  बुद्ध विहार उभारले आहे. गेल्या 12 नोव्हेंबर 2022 रोजी या "धम्मभूमी" चा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अंदाजे दोन लाख धम्मबांधवांच्या उपस्थितीत होते. सांगलीकर यांच्या तन, मन,धनाने करत असलेल्या प्रामाणिक धम्म कार्याचा गौरव म्हणून बुद्ध विहार समन्वय समितीने अनाथपिंडक हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. 


         

Wednesday, April 21, 2021

जत तालुक्याची काही खास वैशिष्ट्ये

 जत तालुक्याला रामायण महाभारत काळापासून संदर्भ आहेत.

1) भीमाने वध केलेल्या बंकासूराचे जतमध्ये प्राचीन मंदिर आहे.  बंकेश्वर नावाचे जगातील हे एकमेव मंदीर आहे. 

2) काळवेदन राक्षसाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने मुचकंदेश्वर ॠषींच्या आश्रमात आश्रय घेतला होता.  ते मुनीवर जत तालुक्यातील मुचंडी येथे वास्तवास होते. त्यांच्या नावावरून गावाचे नाव मुचंडी पडले आहे. 

3) महर्षी वाल्मिकी यांनी ध्यान साधना केलेली गुफा कोळगिरी डोंगरात आहे.  त्याला जोगीहरी म्हणून ओळखले जाते.  वाल्या कोळी यांचे वास्तव्य होते म्हणून गावाचे नाव कोळगिरी पडले आहे. 

4) श्री दत्त महाराज यांनी होम केलेल्या कुंडापैकी तिसरा कुंड जत तालुक्यातील तिकुंडी येथे आहे.  त्यामुळे गावाचे नाव तिकुंडी पडले आहे. 

5) महात्मा बसवेश्वर यांच्या शरण दलाच्या सेनापती,  हजार वर्षापूर्वी सामुहिक विवाह पध्दती सुरू करणाऱ्या देवी दानम्मा यांचा जन्म जत तालुक्यात उमराणी येथे  झाला. गुड्डापूर हे त्यांचे सासर.  सध्या ते लिंगायत धर्माचे तिर्थक्षेत्र आहे. 

6) हिंचगीरी सांप्रदायाचे संस्थापक भाऊसाहेब महाराज जत तालुक्यातील उमदीचे. 

7) संत गाडगे बाबा महाराज यांचे शिष्य सद्गुरू बागडे बाबा जत तालुक्यातील गोंधळेवाडीचे

8) छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर व आदीलशाही सेनापती अब्दुल करिम बहलोल खान यांच्यातील जगप्रसिद्ध युध्द जत तालुक्यातील  उमराणी येथे झाले. 

9) कर्नाटक व महाराष्ट्र सीमावर्ती भागातील राॅबीनहूड,  क्रांतीसूर्य सिंदूर लक्ष्मण जत तालुक्यातील सिंदूरचे .

10) सांगली-सोलापूर-विजापूर अशा तीन जिल्ह्यातील पाच परगण्यात 350 वर्षे राज्य करणारे डफळे संस्थान जतचेच. 

11) स्वतंत्र सांगली जिल्ह्याचे पहिले खासदार जतचे श्रीमंत विजयसिंह राजे  हे होते. 

12) श्रीमंत विजयसिंह राजे हे महाराष्ट्र रणजी संघाचे कर्णधार होते. गोलमेज परिषदेस उपस्थित राहणारे ते जिल्ह्यातील एकमेव होते. 

13) जिल्ह्यातील पहिले विमान व विमानतळ जतला होते. 

14) जत तालुक्यात 4 भुईकोट किल्ले व एक डोंगरी दूर्ग, तसेच विसहून अधिक गढ्या आहेत. 

15)  जत तालुक्यात एक हजार वर्षापूर्वीचे पंधराहून अधिक शिलालेख आहेत. 

16) जत तालुक्यात दोन हजार वर्षापूर्वीची 17 हेमाडपंथी मंदीरे आहेत. 

17) जतच्या यल्लमादेवीची यात्रा जगप्रसिद्ध आहे.

18) माजी राष्ट्रपती बी. डी .जत्ती हे मूळचे जत तालुक्यातील.  त्यामुळे त्यांचे आडनाव जत्ती पडले.

19) जत हा गवताळ प्रदेश असून हरिण,  तरस,  लांडगे,  खवले मांजर, वोंबाट, दुर्मिळ घुबड,   म्हांडूळ, घोणस, नागसाप, अजगर  असे अनेक दुर्मिळ वन्यजीव जत तालुक्यात आजही आढळून येतात. 

माडग्याळी मेंढी, बोरे,  व्हसपेठचे जेन,  वाळेखिंडी,  सिंदूर पेढे, हळद, डाळींब ही जतची खासियत आहे. 

संदर्भ- " वैभवशाली जत " हे पुस्तक. 

लेखक: श्री दिनराज वाघमारे

Wednesday, March 17, 2021

जतच्या प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरेचे अधिक संशोधन व्हावे


जतला प्राचीन आणि ऐतिहासिक अशी मोठी परंपरा आहे, याचा पुरावा अलिकडच्या काळात सापडलेल्या विविध ठिकाणच्या शिलालेखावरून आढळून येत आहे. रामायण आणि महाभारत काळात हा परिसर सर्व प्रदेश समृद्ध होताच शिवाय राम,सीता आणि लक्ष्मण यांच्याबरोबरच महाभारतातील प्रमुख व्यक्तींचा पावनस्पर्श या भूमीला लागला आहे. या भागात आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा केली जात आहे. शिवाय सापडलेल्या शिलालेखांचे संग्राहलय उभे करण्यात यावे आणि जतच्या ऐतिहासिक आणि पौराणिक इतिहासाचा या माध्यमातून परिचय करून देण्यात यावा, अशी मागणीही केली जात आहे.

परवाच जतजवळ असलेल्या मल्लाळ गावात शेतात नांगरणी करताना एका शेतकऱ्याला 900 वर्षांपूर्वीचा शिलालेख आढळून आला आहे. यापूर्वी वज्रवाड, बालगाव, कुडणूर परिसरात शिलालेख आढळून आले आहेत. दुष्काळी आणि मागास अशा  जत तालुक्याला  अतिशय प्रगल्भ असा इतिहास लाभला आहे. जत तालुक्यामध्ये सापडणारे शिलालेख या इतिहासाच्या वैभवामध्ये भरच टाकत आहेत.

जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, शिलालेख आढळून येत आहेत. तालुक्यातील मल्लाळ याठिकाणी दीपक माने या इसमाची डोंगरावर जमीन आहे. याठिकाणी नांगरणी करत असताना चालुक्य सम्राट विक्रमादित्य (सहावा) याच्या कारकीर्दीतील शिलालेख सापडला आहे.सन 1120 मध्ये एका शिवमंदिरासाठी जतचा प्रमुख दंडनायक बंकेय याने मल्लाळ येथील दहा मत्तर (जमीन आकार ) जमीन दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात आहे. या शिलालेखातून चालूक्यसम्राट विक्रमादित्य याच्या कारकीर्दीतील नवी माहिती उजेडात आली आहे. गेल्या सहा महिन्यात नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचे हे चार शिलालेख मिरज संशोधन मंडळामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात समोर आले आहेत. या तालुक्याच्या विविध गावात चालुक्य, कलचुरी, यादवकालीन यांच्या राजवटीतील शिलालेख आढळून आले आहेत. मल्लाळ हे गाव जतपासून सुमारे चार किलोमीटरवर आहे. या गावच्या दक्षिणेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर खडकाळ जमीन आहे. यापैकी दीपक माने यांची जमीन नांगरत असताना भगवान काळे या व्यक्तीला मोठा दगड आढळून आला. या दगडावर शिवलिंग, गाय-वासरू, कट्यार, सुर्य चंद्राचे शिल्पांकन होते. खालील बाजूस हळे कन्नड लिपीतील मजकूर आहे. याबद्दल येथील रहिवासी मारूती ओलेकर आणि ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण ओलेकर यांनी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना दिली. त्यांनी याठिकाणी जाऊन शिलालेखाचे ठसे घेऊन त्याचा अभ्यास केला असता या शिलालेखात एकूण 13 ओळी आहेत. या शिलालेखाचे वाचन हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे शिलालेखशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कलवीर मनवाचार यांनी करून दिले असून, या शिलालेखात चालुक्य राजा विक्रमादित्य याचा उल्लेख आला आहे.

चालुक्य विक्रमादित्य हा महापराक्रमी राजा होता. त्याने 50 वर्षे राज्य केले आहे. त्याच्या काळात चालुक्य राज्याच्या सीमा गुजरातपासून दक्षिणेत तामीळनाडू पर्यंत भिडल्या होत्या. त्याच्या काळात कला, विद्या यांचा मोठा विकास झाला. चालुक्य सम्राट विक्रमादित्य हा इसवी सन 1076 मध्ये गादीवर आला. त्याने आपल्या राज्यारोहणानिमित्त स्वतःच्या नावाचा चालुक्य विक्रम शक सुरू केला. पश्चिम महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या चालुक्य सम्राट विक्रमादित्याच्या काळात अनेक मंदिरे बांधली गेली होती . त्या मंदिरांसाठी जमीनी दान देण्यात आल्या होत्या, त्यासंबंधी अनेक शिलालेख उपलब्ध आहेत. मल्लाळ येथे सापडलेला हा शिलालेख सांगली जिल्ह्यात विक्रमादित्याचा सापडलेला कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे.

या शिलालेखात काय आहे

मल्लाळ येथे सापडलेल्या या शिलालेखात चालुक्य विक्रम शक 45 शार्वरीनामसंवत्सरे, भाद्रपद शुद्ध पंचमी सोमवार या दिवशी जत येथील प्रमुख दंडनायक बंकेय याने शिव मंदिरासाठी 10 मत्तर जमीन दान दिल्याचा उल्लेख या लेखात आहे. हा लेख 1 ऑगस्ट सन 1120 रोजी लिहिला गेला आहे. या लेखात उल्लेख केलेला जतचा प्रमुख बंकेय याने जतमध्ये बांधलेल्या शिवमंदिराला बंकेश्वर या नावाने ओळखले जाते. जत आणि परिसरात या दंडनायकाचे प्रभुत्व असल्याचे या शिलालेखावरून दिसते. या शिलालेखात त्याच्या विशेषणांचा उल्लेख करण्यात आला आहे. जत तालुक्यातील अभ्यासक, संशोधक, राजकीय, तसेच विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन जतचा इतिहास जगासमोर आणायला हवा. जतचे ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी  जतचा वैभवशाली इतिहास पुस्तकरूपाने लिहिला आहे. आता ते प्राचीन आणि स्थळांची माहिती आणि छायाचित्रे युट्युबच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणत आहेत.

आजपर्यंत जत तालुक्यात मध्ये सापडलेले शिलालेख

1) वज्रवाड- येथे साडेसहाशे वर्षांपूर्वीचा हळेकन्नड लिपीतील शिलालेख सापडला आहे. 1371 मध्ये सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याच्या पूजा नैवेद्यासाठी जमिनी दान दिल्याचा यावर उल्लेख आहे.

वज्रवाड शिलालेख-2) जत तालुक्यातील कर्नाटक सीमेजवळ बालगाव नऊशे वर्षापूर्वी शिलालेख आहे. हा 1136 मधील शिलालेख असून यावर चालुक्य राजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल यांच्या कारकिर्दीतील त्यांच्या मांडलिक बीज्जल कलचुरी दिलेला दानलेख यावर आहे.

बालगाव शिलालेख- 3) जत आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्याच्या सीमेवर असलेलं कुडनूर गावामध्ये यादवकालीन शिलालेख सापडलेला आहे. या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. साधारणत: एक हजार पूर्वीचा हा शिलालेख आहे.

कुडनूर गावात सापडलेला शिलालेख- 4) मल्लाळ याठिकाणी सापडलेला चालुक्य सम्राट विक्रमादित्याचा शिलालेख