जत तालुक्याच्या उत्तर भागात बेवनूर हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिंदे, देवकर आणि सरगर ही तीन ऐतिहासिक घराणी गावात आहेत. या घराण्यांसंबंधी वाडे, समाध्या, बारव व अन्य वास्तू अवशेष रूपात येथे आहेत. बेवनूर गावच्या इतिहासासंबंधी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली काही वर्षे अभ्यास करीत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना गावात विखुरलेले अवशेष आढळून आले.
समाधीस्थळे
जुन्या महादेव मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर एक छोटी मंदिरवजा समाधी आहे. चुन्याच्या सहाय्याने दगडात बांधलेली आणि वर चुना-विटाचे शिखर असलेली ही समाधी प्रथमदर्शनी मंदिरच भासते. या समाधी मध्ये लहानसे शिवलिंग आहे. समाधीच्या चौथऱ्यावर पुष्पदल कोरले आहे. समाधीच्या चौकटीच्यावर दगडात कोरलेला लेख असून शिंदे- पाटील यांनी शके १७६० म्हणजे इसवी सन १८३८मध्येही समाधी बांधल्याचे म्हटले आहे. गावातील शिंदे घराण्याची ही समाधी असून तेथे समाधी खाली असलेल्या देवळीमध्ये या घराण्यातील मृत व्यक्तिच्या अस्थि आजही ठेवल्या जातात.
सतीशिळा
महादेव मंदिरासमोरच सतीचे समाधी मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. या सतीसमाधीच्या चौथऱ्याला टेकून सती निदर्शक हात असलेली दगडी शिळा ठेवली आहे. अशीच आणखी एक सतीशिळा काही दिवसांपूर्वी काटेरी झुडुपात काही विद्यार्थ्यना आढळून आली होती. ती जतन करून ठेवण्यात आली आहे.
ऐतिहासिक वाडे
गावात शिंदे, सरगर आणि देवकर या घराण्याचे वाडे आहेत. त्यांची बरीच पडझड झाली आहे. या वाड्यांपैकी काहींच्या भिंतीच्या दगडावर हत्ती, घोडा, मोर, सुर्य-चंद्र, फुलांची नक्षी व अन्य भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. तर काही दगडांवर नावे लिहीली आहेत. काही वाडयात धान्य साठविण्याच्या अंबाऱ्या आहेत. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे हे वाडे आहेत. त्यांची आता बरीच पडझड झाली आहे.
ऐतिहासिक पारकट्टा
गावात मध्यभागी सध्याच्या ग्रामपंचायती समोर ऐतिहासिक पारकट्टा आहे. त्यावर दोन्ही बाजुला सन १९४० हे इंग्रजी व मराठी मध्ये लिहिले आहे. मध्यभागी श्री शिवाजीराव असे नाव लिहिले आहे.
ऐतिहासिक बारव
गावंदरीलगत शिंदे घराण्याच्या समाईक जागेत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची कमानी युक्त बारव आहे. सहा मोटांच्या या बारवेत उतरण्यासाठी अर्धचक्राकार पायऱ्या आहेत. सध्या या बारवेची पडझड सुरू आहे.
म्हसोबा मंदिर
गावाबाहेर दोन ओढ्यांच्या काठावर भव्य आवारात वसलेले म्हसोबा मंदिर आहे. मंदिराला घाटवजा पायऱ्या आहेत. मंदिराजवळच चुन्याची घाणी व दगडी चाक आहे. दरवर्षी येथे गुढीपाडव्यानंतर मोठी यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो.
दीर्घ लष्करी परंपरा
गावाला मोठी सैन्य परंपरा आहे. दुसरे महायुद्ध आणि आझाद हिंद फौजेत येथील जवान सहभागी होते. सन १९६५, १९७१, बांगलादेश आघाडी, सुवर्णमंदिर ऑपरेशन, श्रीलंका शांतिसेना, कारगील अशा विविध समर प्रसंगात येथील जवानांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कामगिरी बद्द्ल येथील जवानांना जंगी इनाम दाखल जमिनीही मिळाल्या आहेत. सध्या गावात आजी माजी सैनिक मिळून सुमारे शंभर जवान आहेत.
शिखर शिंगणापूरची कावड
येथील शिंदे घराण्याचे कुलदैवत खरसुंडीचा सिद्ध नाथ आहे. मात्र, येथून शिंदे घराण्यातील लोक शिखर शिंगणापूरला कावड अनेक वर्षे नेतात. तांबे धातुच्या या कावडीही ऐतिहासिक आहेत. समृध्द इतिहास असलेल्या या गावात अन्य काही ऐतिहासिक अवशेष विखुरलेले दिसतात. - मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर
No comments:
Post a Comment