Tuesday, August 22, 2023

अचकनहळ्ळीचे ऐतिहासिक बिसल सिद्धेश्वर मंदिर


पाचशे वर्षांपूर्वी डोण परिसरात वसलेले; निगडी खुर्द व अचकनहळ्ळी गावांच्या सीमेवरील स्थान तालुक्‍यातील अचनकहळ्ळी हद्दीतील व सुप्रसिद्ध काळ्या मातीच्या डोण परिसरात महान तपस्वी व योगी संत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. पाचशे वर्षांपूवी आदिलशाहने मंदिराची निर्मिती केली असून, संपूर्ण बहामनी कालीन वास्तुशिल्पकलेतून उभारणी झाली आहे. त्या मंदिरास बिसल सिद्धेश्‍वर असेही म्हटले जाते. 

जत तालुक्यासह बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. श्रावणात दररोज सकाळी ६.१५ ला आरती केली जाते. श्रावण सोमवारी 'लाखो भाविक दर्शनास येत असतात व शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. 

हे मंदिर जत शहराच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर आहे. जत ते निगडी दरम्यान काळ्या मातीचे मोठे डोण आहे. डोण परिसरात कुठेही लोकवस्ती वसविता येत नाही. सर्व मातीचा परिसर असल्याने जमिनीत बांधकामासाठी पाया लागत नाही. त्यामुळे परिसरात साधे घरही बांधता येत नाही. असे असले तरी पाचशे वर्षांपूर्वी परिसरात बिसल सिद्धेश्व रांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मुचंडी येथील दरेश्वर व बिसल सिद्धेश्वर या दोन मंदिरांची रचना समान आहे. मंदिराभोवती भव्य तटबंदी आहे. समोर भव्य कमान आहे. मुख्य कमानीच्या आत दोन उंच मीनार आहेत. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सकाळी सूर्य उगवताना मुख्य कमान ,दोन्ही मीनार व नंदीच्या छत्रीच्या माध्यमातून थेट पिंडीवर सूर्यकिरणे पडतात. कन्नड मध्ये उन्हाला'बिसल 'म्हणतात. म्हणून या मंदिरास 'बिसल सिद्धेश्वर' असे नाव पडले आहे. 

जत, निगडी खुर्द व अचकनहळ्ळी या तीन गावांच्या सीमेवर सिद्धेश्वर स्वामी यांनी घोर तपस्या केली. याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. त्या ठिकाणावर विजापूरच्या आदिलशाहने भव्य मंदिर उभारले. प्रतिवर्षी श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनाला येतात. प्रत्येक सोमवारी दर्शनास गर्दी असते. मंदिराच्या विकासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकाराने जिल्हा नियोजन मधून एक कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च करून सभागृह, भक्तनिवास, रस्ता, पेव्हिंग ब्लॉक्स, स्वतंत्र ट्रांसफार्मर असा विकास करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment