महाराष्ट्र-कर्नाटकतल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. धानम्मादेवीच्या विवाहस्थळाला म्हणजेच संगतीर्थ(वळसंग) या धार्मिक स्थळाला श्रावण मासात भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन तृप्त होतात.जतसारख्या दुष्काळ ओसाड भागात काहीशा दरित वसलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे वाळवंटातले ओअॅसिस म्हटले पाहिजे. श्रावणात भाविकांबरोबरच शाळांच्या सहलीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातले श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील धानम्मादेवीचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातले लाखो भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. गुड्डापूरला भेट देण्याआधी भाविक संगतीर्थला आवश्य भेट देतात.वळसंग गावापासून सोरडी मार्गावर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर संगतीर्थ आहे. धानम्मा हिचा जन्म उमराणी गावचा असला तरी संगतीर्थ इथे तिने 21 दिवस तपश्चर्या केली. हा काळ बाराव्या शतकातला असून ज्या वडाच्या झाडाखाली धानम्माने तपश्चर्या केली, ते झाड आजही इथे दिमाखात उभे आहे. त्याच्या थंडगार सावलीखाली विसावा घेणार्या भाविकांना एक प्रकारे धार्मिक समाधान मिळते.
धानम्माच्या तपश्चर्येमुळे भाविक तिच्या दर्शनाला येत राहिले. मात्र या वाळवंट परिसरात पाण्याचा थेंबदेखील नव्हता. लोकांच्या सांगण्यावरून धानम्माने इथे शंख फुंकला आणि इथे गंगा अवतरली, अशी अख्यायिका आहे.त्यामुळे या ठिकाणाला संखतीर्थ म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन संगतीर्थ असे नाव या क्षेत्राला पडले. या मंदिराचा पायथ्याशी जिवंत झरा असून बारमाही या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे या परिसरातल्या लोकांना , भाविकांना पाण्याची टंचाई कधी भासली नाही. इथले पाणी प्यायला गोड, मधुर आहे. भाविक पिण्याच्या बाटल्या भरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात.
धानम्मा पुढे कुडलसंगम(कर्नाटक) इथे गेली. तिथेही तिने तपश्चर्या केली. पुढे कुडलसंगमचा सोमेश्वर आणि धानम्मा यांचा विवाह संगतीर्थ इथे झाला. या ठिकाणी 501 जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडला. त्यात सोमेश्वर आणि धानम्मा यांचाही समावेश होता. ही सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ होती. त्यानंतर इथे सामुदायिक विवाह होऊ लागले. आजही इथे विवाह होतात. श्रावणात दरवर्षी तिसर्या सोमवारी इथे अक्षता पडतात. भाविक धानम्माचा विवाह उत्सव साजरा करतात. या ठिकाणी वडाच्या पारंब्यातून निर्माण झालेल्या खोडाला श्री गणेशाची स्वयंभू प्रतिमा तयार झाल्याचे आपल्याला दिसते.
हा परिसर निसर्गरम्य असा असून वळसंगच्या श्री. धानम्मा ट्रस्टने भाविकांच्या निवासासाठीही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बारा महिने याठिकाणी अन्नछत्र (दासोह) उघडण्यात आले आहे. भाविक मोठ्या भक्तीभावाने त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. पावसाळ्यातली किंवा श्रावणातील सहकुटुंब छोटी सहल म्हणून या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला काहीच हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment