Tuesday, August 22, 2023

अचकनहळ्ळीचे ऐतिहासिक बिसल सिद्धेश्वर मंदिर


पाचशे वर्षांपूर्वी डोण परिसरात वसलेले; निगडी खुर्द व अचकनहळ्ळी गावांच्या सीमेवरील स्थान तालुक्‍यातील अचनकहळ्ळी हद्दीतील व सुप्रसिद्ध काळ्या मातीच्या डोण परिसरात महान तपस्वी व योगी संत श्री सिद्धेश्‍वर महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. पाचशे वर्षांपूवी आदिलशाहने मंदिराची निर्मिती केली असून, संपूर्ण बहामनी कालीन वास्तुशिल्पकलेतून उभारणी झाली आहे. त्या मंदिरास बिसल सिद्धेश्‍वर असेही म्हटले जाते. 

जत तालुक्यासह बाहेरील भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होतात. श्रावणात दररोज सकाळी ६.१५ ला आरती केली जाते. श्रावण सोमवारी 'लाखो भाविक दर्शनास येत असतात व शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. अनेक भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जाते. 

हे मंदिर जत शहराच्या उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर आहे. जत ते निगडी दरम्यान काळ्या मातीचे मोठे डोण आहे. डोण परिसरात कुठेही लोकवस्ती वसविता येत नाही. सर्व मातीचा परिसर असल्याने जमिनीत बांधकामासाठी पाया लागत नाही. त्यामुळे परिसरात साधे घरही बांधता येत नाही. असे असले तरी पाचशे वर्षांपूर्वी परिसरात बिसल सिद्धेश्व रांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मुचंडी येथील दरेश्वर व बिसल सिद्धेश्वर या दोन मंदिरांची रचना समान आहे. मंदिराभोवती भव्य तटबंदी आहे. समोर भव्य कमान आहे. मुख्य कमानीच्या आत दोन उंच मीनार आहेत. मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे. सकाळी सूर्य उगवताना मुख्य कमान ,दोन्ही मीनार व नंदीच्या छत्रीच्या माध्यमातून थेट पिंडीवर सूर्यकिरणे पडतात. कन्नड मध्ये उन्हाला'बिसल 'म्हणतात. म्हणून या मंदिरास 'बिसल सिद्धेश्वर' असे नाव पडले आहे. 

जत, निगडी खुर्द व अचकनहळ्ळी या तीन गावांच्या सीमेवर सिद्धेश्वर स्वामी यांनी घोर तपस्या केली. याच ठिकाणी त्यांनी देह ठेवला. त्या ठिकाणावर विजापूरच्या आदिलशाहने भव्य मंदिर उभारले. प्रतिवर्षी श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शनाला येतात. प्रत्येक सोमवारी दर्शनास गर्दी असते. मंदिराच्या विकासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांतून आणि पुढाकाराने जिल्हा नियोजन मधून एक कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च करून सभागृह, भक्तनिवास, रस्ता, पेव्हिंग ब्लॉक्स, स्वतंत्र ट्रांसफार्मर असा विकास करण्यात आला आहे.


Saturday, April 8, 2023

इतिहाससमृद्ध गाव बेवनूर

जत तालुक्याच्या उत्तर भागात बेवनूर हे गाव आहे. या गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शिंदे, देवकर आणि सरगर ही तीन ऐतिहासिक घराणी गावात आहेत. या घराण्यांसंबंधी वाडे, समाध्या, बारव व अन्य वास्तू अवशेष रूपात येथे आहेत. बेवनूर गावच्या इतिहासासंबंधी मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली काही वर्षे अभ्यास करीत आहेत. या अभ्यासादरम्यान त्यांना गावात विखुरलेले अवशेष आढळून आले.

समाधीस्थळे

जुन्या महादेव मंदिरासमोर उंच चौथऱ्यावर एक छोटी मंदिरवजा समाधी आहे. चुन्याच्या सहाय्याने दगडात बांधलेली आणि वर चुना-विटाचे शिखर असलेली ही समाधी प्रथमदर्शनी मंदिरच भासते. या समाधी मध्ये लहानसे शिवलिंग आहे. समाधीच्या चौथऱ्यावर पुष्पदल कोरले आहे. समाधीच्या चौकटीच्यावर दगडात कोरलेला लेख असून शिंदे- पाटील यांनी शके १७६० म्हणजे इसवी सन १८३८मध्येही समाधी बांधल्याचे म्हटले आहे. गावातील शिंदे घराण्याची ही समाधी असून तेथे समाधी खाली असलेल्या देवळीमध्ये या घराण्यातील मृत व्यक्तिच्या अस्थि आजही ठेवल्या जातात. 

सतीशिळा

महादेव मंदिरासमोरच सतीचे समाधी मंदिर उंच चौथऱ्यावर आहे. या सतीसमाधीच्या चौथऱ्याला टेकून सती निदर्शक हात असलेली दगडी शिळा ठेवली आहे. अशीच आणखी एक सतीशिळा काही दिवसांपूर्वी काटेरी झुडुपात काही विद्यार्थ्यना आढळून आली होती. ती जतन करून ठेवण्यात आली आहे.

ऐतिहासिक वाडे

गावात शिंदे, सरगर आणि देवकर या घराण्याचे वाडे आहेत. त्यांची बरीच पडझड झाली आहे. या वाड्यांपैकी काहींच्या भिंतीच्या दगडावर हत्ती, घोडा, मोर, सुर्य-चंद्र, फुलांची नक्षी व अन्य भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. तर काही दगडांवर नावे लिहीली आहेत. काही वाडयात धान्य साठविण्याच्या अंबाऱ्या आहेत. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीचे हे वाडे आहेत. त्यांची आता बरीच पडझड झाली आहे.

ऐतिहासिक पारकट्टा

गावात मध्यभागी सध्याच्या ग्रामपंचायती समोर ऐतिहासिक पारकट्टा आहे. त्यावर दोन्ही बाजुला सन १९४० हे इंग्रजी व मराठी मध्ये लिहिले आहे. मध्यभागी श्री शिवाजीराव असे नाव लिहिले आहे.

ऐतिहासिक बारव

गावंदरीलगत शिंदे घराण्याच्या समाईक जागेत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची कमानी युक्त बारव आहे. सहा मोटांच्या या बारवेत उतरण्यासाठी अर्धचक्राकार पायऱ्या आहेत. सध्या या बारवेची पडझड सुरू आहे.

म्हसोबा मंदिर

गावाबाहेर दोन ओढ्यांच्या काठावर भव्य आवारात वसलेले म्हसोबा मंदिर आहे. मंदिराला घाटवजा पायऱ्या आहेत. मंदिराजवळच चुन्याची घाणी व दगडी चाक आहे. दरवर्षी येथे गुढीपाडव्यानंतर मोठी यात्रा भरते. यावेळी मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी दिला जातो.

दीर्घ लष्करी परंपरा

गावाला मोठी सैन्य परंपरा आहे. दुसरे महायुद्ध आणि आझाद हिंद फौजेत येथील जवान सहभागी होते. सन १९६५, १९७१, बांगलादेश आघाडी, सुवर्णमंदिर ऑपरेशन, श्रीलंका शांतिसेना, कारगील अशा विविध समर प्रसंगात येथील जवानांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कामगिरी बद्द्ल येथील जवानांना जंगी इनाम दाखल जमिनीही मिळाल्या आहेत. सध्या गावात आजी माजी सैनिक मिळून सुमारे शंभर जवान आहेत.

शिखर शिंगणापूरची कावड 

येथील शिंदे घराण्याचे कुलदैवत खरसुंडीचा सिद्ध नाथ आहे. मात्र, येथून शिंदे घराण्यातील लोक शिखर शिंगणापूरला कावड अनेक वर्षे नेतात. तांबे धातुच्या या कावडीही ऐतिहासिक आहेत.  समृध्द इतिहास असलेल्या या गावात अन्य काही ऐतिहासिक अवशेष विखुरलेले दिसतात. - मानसिंगराव कुमठेकर, प्रा. गौतम काटकर

Monday, February 27, 2023

उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने उभारले तब्बल पंधरा कोटींचे बुद्ध विहार


सांगली जिल्ह्यातील गुगवाड (ता. जत) येथील उद्योजक  आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सी.आर. सांगलीकर यांनी स्वखर्चाने जतसारख्या दुष्काळी भागात भव्य असे देखणे 'धम्मभूमी' बुद्धविहार उभारले आहे. यासाठी तब्बल पंधरा कोटी खर्च आला आहे. रोज शेकडो लोक ते पाहण्यासाठी येत असतात. श्री. सांगलीकर यांना आळंदी (पुणे) येथे अनाथपिंडक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  

 सांगली जिल्ह्यातील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांनी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी गुगवाड येथे स्वतः च्या तब्बल वीस एकर जागेत तब्बल पंधरा कोटींचे देखणे प्रशस्त, स्वखर्चाने "धम्मभूमी"  बुद्ध विहार उभारले आहे. गेल्या 12 नोव्हेंबर 2022 रोजी या "धम्मभूमी" चा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतील अंदाजे दोन लाख धम्मबांधवांच्या उपस्थितीत होते. सांगलीकर यांच्या तन, मन,धनाने करत असलेल्या प्रामाणिक धम्म कार्याचा गौरव म्हणून बुद्ध विहार समन्वय समितीने अनाथपिंडक हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.