Monday, June 15, 2020

विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी

मराठी समीक्षेतील एक बलदंड नाव म्हणजे डॉक्टर भीमराव कुलकर्णी हे होय. ते आपल्या जतचे असल्यामुळे समस्त सांगली जिल्हयाला त्यांच्याबद्दल अत्यंत रास्त असा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत झगडत त्यांनी शिक्षण घेतले. जिद्दीच्या बळावर उच्चशिक्षण घेतले. पुण्यासारख्या
विद्यानगरीत अव्वल दर्जाचे व्यासंगी प्राध्यापक असा
लौकीक प्राप्त केला आणि वा. ल. कुलकर्णी, गो.
म. कुलकर्णी अशा दिग्गज समीक्षकांच्या पंक्तीत आपलेही मानाचे पान निर्माण केले. आणि हे जे सारे त्यांनी केले ते केवळ स्वबळावर साध्य केले म्हणून त्यांचे आजही अप्रूप वाटते. विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचा त्यावेळी मराठी समीक्षा क्षेत्रावर मोठाच आघात झाला होता.

दुष्काळी भागाचा आधार दोड्डनाला तलाव

जत तालुक्यातील उमदी,उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, निगडी बुद्रुक या गावांना जलस्वराज्य व भारत निर्माण अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित आहे. मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मात्र दोड्डनाला तलावातील पाण्याचा उपयोग होत आहे. जत तालुक्यासह सर्वत्र1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. खायला अन्न नव्हते, अशा परिस्थितीत शासनाने 1985 च्या दरम्यान मध्यम प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

मांसासाठी प्रसिध्द माडग्याळी मेंढी

राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

Saturday, June 6, 2020

जत परिसरातील रूढी,परंपरा

शुद्ध शाकाहारी बनाळी
जतपासून अवघ्या 10-11 किलोमीटर अंतरावर असणारं बनाळी गाव. 40 एकर जमिनीवरील झाडीत हे गाव वसलेलं आहे. हे बनशंकरी देवीचं जागृत देवस्थान. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडत नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर येथील मधमाशा हल्ला चढवितात,असं सांगितलं जातं. गावात जाणारा पाहुणा असला तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भितीपोटी गावात कुणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावाच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात या दिवसात हे लोक साधं पाणीही पीत नाहीत.

जत पंचायत समितीची वाटचाल


जत पंचायत समितीची स्थापना 1962 मध्ये झाली. तालुक्यात 124 महसुली गावे असून 117 ग्रामपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. पूर्व-पश्चिम लांबी 120 किलोमीटर, तर दक्षिण उत्तर लांबी 67 किलोमीटर इतकी आहे. पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर स्वतःची प्रशासकीय इमारत नव्हती. त्यामुळे जत शहरातील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या बनाळी यांच्या भाड्याच्या इमारतीत पंचायत समितीचे सुरुवातीला कार्यालयीन कामकाज सुरू झाले होते. 1968-69 दरम्यान जत तहसील कार्यालयालगत जत पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम बांधकाम व्यावसायिक खान यांनी पूर्ण केले.

डॉ.खोचीकर यांच्या संशोधनाला जागतिक संदर्भ कोषात स्थान

जत तालुक्याचे सुपुत्र असलेले डॉ.मकरंद खोचीकर यांनी मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाविषयी केलेल्या संशोधन आणि उपचाराविषयक माहितीचा जागतिक पातळीवर मानाचा समाजाला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील 'सर्जरी कोअर प्रिन्सिपल प्रॅक्टिस' या संदर्भ कोष ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. पनामा (अमेरिका), लंडन व दिल्ली येथे काही वर्षांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाचे निदान व सर्जरीविषयक मूलभूत संशोधन ते गेली वीस वर्षे करत होते. आज ते सांगलीतील युरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.

Thursday, June 4, 2020

जत तालुक्याची हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल

जत तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 2 लाख 24 हजार 824 हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 58 हजार 700 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र 65 हजार 700 हेक्टर तर रब्बीचे 93 हजार 300 हेक्टर क्षेत्र आहे. गायरान क्षेत्र 2 हजार 667 हेक्टर, मुलकी पड क्षेत्र 1 हजार970.73 हेक्टर आहे. तालुक्यातील एकूण बागायती क्षेत्र 22 हजार75 हेक्टर तर जिरायती क्षेत्र 62 हजार299 हेक्टर आहे.  जत तालुक्यातील एकूण महसूल गावे 123 आहेत. ग्रामपंचायती 117 आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 427.5 मि. मी. इतके आहे. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. 25 वर्षांपूर्वी शेती ही उदारनिर्वाहापुरती केली जात होती. ही शेती फक्त पावसाच्या भरवशावर केली जायची. अन्नधान्ये, कडधान्ये व गळीत धान्याची पिके घेतली जात होती. पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असल्याने मिळणारे उत्पन्न अत्यल्प होते.

लेखन परंपरेच्या पाईकांची भूमी


कडलास आणि आलेगाव या सांगोला तालुक्यात वास्तव्यास राहून जत तालुक्यातील येळवी गावात वास्तवास आलेला बाळकृष्ण कावडे यांचा कार्यकाला नक्की कोणता? याचे उत्तर आज तरी मिळत नाही. संपूर्ण शाकाहारी गाव आणि बनशंकरीचा सहवास या गोष्टीचे आकर्षण निर्माण झाल्याने हे बाळकृष्णबुवा बनाळीत स्थायिक झाले. त्यांनी या गावात
एक मठही बांधला. जीर्ण आणि भग्न अवस्थेत हा मठ आजही बाळकृष्ण बुवाच्या वैभवाची आणि कार्याची जाणीव करून देतो आहे. या बाळकृष्ण कावडे बुवांची पाचवी पिढी जगण्यासाठीचा संघर्ष करीत असली तरी त्यांचा शिष्य असणारे काराजनगी येथील कीर्तनकार आणि शाहिरी कवने करणारे मार्तड कुलकर्णी यांची शेकडो कवने आपल्या संशोधनाचा विषय केला आहे.

Wednesday, June 3, 2020

द्राक्ष शेतीवर आधारित लघु उद्योग उभारण्याची गरज

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. महाराष्ट्र व
कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या या तालुक्यात निसर्गाची अवकृपा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबासह दरवर्षी नदीकाठी उसतोडणीसाठी जावे लागते. मात्र या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासावर द्राक्ष व डाळिंब बागेच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये या तालुक्यात येत आहेत.

डाळींब: दुष्काळातील लाल क्रांती

जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब उत्पादनाकडे वळण्यापूर्वी बोर पिकवण्याचा प्रयोग केला होता. बोराच्या उत्पन्नात चार-सहा वर्षे चांगली मिळकतही झाली. हा काळ होता 1990-95 चा. पण ग्रामीण शेतकऱ्यांची अनुकरण करण्याची कृती या बोरांना नंतर योग्य भाव मिळण्यास अडसर ठरू लागली. बोर पिकावर कोणतीही प्रक्रिया करण्याची त्यावेळी तरतूद नसल्याने आणि  बारमाही उत्पन्नापेक्षा एका ठराविक काळातच उत्पन्न घेण्याची पध्दत असल्याने बोरांची आवक वाढत गेली. अर्थातच मग याचा परिणाम दरांवर झाला आणि दर घसरू लागले. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला किलोमागे १५ ते २० रूपये भाव देणारी बोरं या दशकाच्या अखेरीस रस्त्यावर ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ग्रामपंचायत ते नगरपरिषद

महाभारत, रामायण आणि इतिहासकालीन दाखले देणारे शहर म्हणून जत शहराकडे पाहिले जाते. आज जत हे शहर तालुक्याचे ठिकाण असले तरी  संस्थानकालीन राजवटीचा वेगळा ठसा व वारसा जत शहराला लाभला आहे. जत येथे संस्थानकाळात १८९३ साली नगर पालिकेची स्थापना करण्यात आली होती. संस्थानानंतर जतच्या नगरपालिकेचे ग्रामपंचायतीत रूपांतर झाले.  १९४९ मध्ये जत संस्थानने प्रजासत्ताक राज्य पध्दतीचा स्वीकार करत संस्थानचे विलिनीकरण केले. त्यानंतर ३० मे १९५३ साली ग्रामपंचायतीची स्थापन झाली.

जत तालुक्याचा लेखा-जोखा

समुद्र सपाटीपासून 917 मीटर उंचावर उगम पावणारी माणनदी 163 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली गावाजवळ भिमानदीस मिळते. सरकोली गावाजवळ जिथे माण आणि भीमा यांचा मिलाफ घडतो ते ठिकाण समुद्र सपाटीपासून 416 मीटर उंचावर आहे.सातारा जिल्ह्यातील माण, दहिवडी, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा तालुक्यातील काही भाग, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्यातील काही भाग, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुका या माण नदीच्या खोऱ्यात येतात. इतिहासात या माण नदीच्या खोऱ्यातील प्रजा किती सुखी आणि समाधानी होती याचे दाखले मिळत असले तरी बदलत्या जगाच्या राहाटीने माणदेश कसा बदलत गेला, याचे स्वातंत्र्य पूर्व काळातले चित्रणही माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या साहित्यकृतीने केले आहे. ही माणसे आणि त्यांची गुण वैशिष्ट्ये पाहण्यासाठी व्यंकटेश माडगूळकरांचा 'माणदेशी माणसं' वाचली पाहिजेत.

Monday, June 1, 2020

शिक्षण क्षेत्रातील मानबिंदू राजे रामराव महाविद्यालय

केवळ 70 विद्यार्थी आणि कला, वाणिज्य या शाखा चालू झालेल्या जत येथील राजे रामराव महाविद्यालयात आज कला, वाणिज्य आणि विज्ञान त्याचबरोबर संगणक, व्यवसाय शिक्षण ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारख्या विद्या शाखांचे ज्ञानदान होते.तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांची संख्या आहे. हे महाविद्यालय म्हणजे जतच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू ठरले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील श्री रामराव विद्यामंदिर

जतचे संस्थानाधिपती कै.अमृतराव महाराज १८८० ते ८४ दरम्यान ब्रिटीशांच्या नजरकैदेत होते. ते नजरकैदेत असताना प्रजेच्या हिताच्या दृष्टीने मौलिक स्वरूपाचे विचारमंथन करून नजरकैदेतून सुटका होताच १८८५ साली त्यांनी जत शहरात इंग्रजी शिक्षणाचा पहिला वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. हीच श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलची स्थापना होय. प्रारंभी या विद्यामंदिरचे नाव ‘ए. व्ही. हायस्कूल' असे होते. नंतर काही वर्ष जत हायस्कूल असेही नाव होते. सुरुवातीला मराठी शाळेत व नंतर बंकेश्वर मंदिरात या शाळेचे वर्ग भरत. इंग्रजी शिकवणारे शिक्षक त्याकाळी मिळणे कठीण होते. तसेच जागा, साधनसामुग्रीचा अभावही होता. तरीसुध्दा न खचता शिक्षणाचा डोलारा वाढविण्याचा अविरत प्रयत्न सुरूच होता.

करजगीचा जुनेदीबाबा दर्गा

जत तालुक्यातील कराजगी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या जुनेदी बाबांच्या दर्ग्यास सहाशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. जुनेदी बाबा हे धर्मप्रसारासाठी भारतात आले होते. हा अतिशय जुना दर्गा असून तो आदिलशहाच्या काळातील असल्याचे सांगण्यात येते. या दर्ग्याविषयी आणि जुनेदी बाबांच्या इतिहासाचे आज संशोधन होणे आवश्यक आहे.

नवसाला पावणारे वळसंगचे श्री केंचराया

जतपासून ११ किलोमीटरवर जत–सोलापूर मार्गावरील वळसंग येथे श्री. केंचराया यांचे भव्य मंदिर आहे. सात वाडया-वस्त्या एकत्रित करून वळसंग गावाची निर्मिती झाली असून ते कार्य सिध्दपुरुष जोगसिध्द यांनी केले आहे. वळसंग येथे श्री केंचराया प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. कुर्म, मत्स्य, वराह, वामन, नरसिंह, वाम, परशुराम, कृष्ण, बौध्द व कलंकी हे अवतार संपल्यावर श्री विष्णूंनी क्षिरसागरात शयन केले. त्यानंतर विष्णूच्या इच्छेने हाल मताच्या ठाईत अवतार इच्छा होवून या हालमताच्या ठाईतील भक्ताकडून सेवा करून घेण्याच्या इच्छेने अवतार घेतल्याचे आख्यायिका सांगितली जाते.

उमदीचे जागृत श्री मलकारसिद्ध

उमदी येथील मलकारसिद्ध देवस्थान हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा देव म्हणून त्यांची ख्याती आहे. या देवाचा यात्रोत्सव वर्षातून दोन वेळा होतो. भिवर्गी हे मलकारसिद्धांचे मूळ गाव. श्री अमोगसिद्ध देवाच्या औदुसिद्ध, बिळयासिध्द, स्वामाणमुथ्या, कन्नमुथ्या या चार मुलांपैकी कन्नमुथ्या यांचा मुलगा मलकारसिद्ध होय. मलकारसिद्ध देवाला पाच भाऊ आणि एक बहीण होती. करियोगसिद्ध (ता.अथणी), यददनगेरी मलकारी (ता. बागलकोट), कुचनूर मादण्णा (ता.जमखंडी), उमदी मलकारसिद्ध (ता.जत),जोतलकाप्पा उमदी (ता.जत), आरकेरी भ्रमवडियर (ता.विजापूर) व एक बहीण गुबव्वा.