Tuesday, December 15, 2020

बुद्धिबळातील 'लिटल चॅम्प' : श्रेया हिप्परगी

जागतिक बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड


सध्या पाचवीच्या वर्गात शिकत असलेली श्रेया हिप्परगी बुद्धीबळ स्पर्धांमध्ये  चमकदार कामगिरी करत आहे. वडिलांची मदत, मोबाईल आणि संगणक हेच बुद्धिबळाच्या प्रशिक्षणाचे आणि सरावाचे साधन असलेल्या श्रेयाने जतसारख्या ग्रामीण भागाचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. संख येथील राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशालेत शिकत असलेल्या श्रेयाची १९ डिसेंबरपासून सुरू  होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या दहा वर्षांखालील आशियाई बुद्धिबळ  स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची निवड झाली. गेल्या काही वर्षात अनेक स्पर्धातून  पारितोषिके पटकावली आहे. नुकतेच ११ ते १३ डिसेंबर अखेर आंतरराष्ट्रीय आशियाई बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन स्पर्धा झाली. त्यामध्ये दहा वर्षाखालील  मुलींच्या गटात सातपैकी सहा फेऱ्या  जिंकून श्रेया हिने द्वितीय क्रमांक  पटकावला. स्पर्धेत आशिया खंडातील  २० देशातील खेळाडू सहभागी झाले होते. तिने द्वितीय क्रमांक पटकावून देशाची मान उंचावली. तिच्या निवडीमुळे सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्रेया सध्या नागपूरचे आंतरराष्ट्रीयमास्टर अनुप देशमुख यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. 

जत तालुक्यातील सिंदूर येथील गुरू हिप्परगी सध्या संख येथे माध्यमिक शिक्षक आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना बुद्धिबळाची आवड निर्माण झाली. याच खेळाची गोडी मुलगी श्रेयालाही लागावी यासाठी त्यांनी तिला वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळाच्या खेळाचे प्राथमिक धडे देणे सुरू केले. तिला या खेळाची प्रचंड गोडी लागली. त्यानंतर दोन वर्षांत प्रत्येक स्पर्धेत तिने सहभाग घेत यश मिळवले. काही वर्षांपूर्वी सांगली येथे झालेल्या  जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहा प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत तिने प्रथम, तर राज्य बुद्धिबळ संघामार्फत मुंबईत झालेल्या ७ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धेत राज्यातील ७० स्पर्धकांनी भाग घेतला होता. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ७ वर्षे वयोगटाखालील एकूण १२५ स्पर्धकांमध्ये श्रेया दुसरी आली. थायलंडमध्ये १ ते १० एप्रिल या कालावधित झालेल्या ८ वर्षाखालील स्पर्धेत आशिया खंडातील ६० स्पर्धकांमधून श्रेयाने रौप्य व कास्यपदकाची कमाई केली.

थायलंड येथील स्पर्धेसाठी तिला शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. तिच्या कुटुंबियांनी तर दीड लाख रुपये खर्च केले होते.  स्पेन येथे झालेल्या स्पर्धेतही तिने यश मिळवले होते.  संगणक, मोबाईलवर विश्वनाथन आनंद, गॅरी कास्पोरोव यांसारख्या जागतिक दर्जाच्या बुद्धिबळपटूंच्या खेळातील चालीचा अभ्यास ती करीत आहे.

आशियाई स्पर्धेतील कामगिरीमुळे तिची १९ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या  जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे. तिला संस्थेचे संस्थापक बसवराज पाटील,  संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष पाटील,  शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनूर, ए. एस. बिराजदार, दिपक वायचळ मार्गदर्शन लाभत आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, November 27, 2020

महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी


जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक इतिहास आहे. रामायण आणि महाभारत याचबरोबर शिलाहार, कलचुरी, देवगिरीचे यादव, मोगल, विजापूरची आदिलशाही आणि शिवशाही अशा सर्व राजवटींच्या काळात जत तालुक्याला महत्त्व होते. सांगली जिल्ह्याच्या एका पूर्व टोकाला असलेल्या आणि आकाराने विस्तीर्ण असलेल्या जत तालुक्यात प्राचीन काळापासून इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. तालुक्याचे ठिकाण असलेले जत शहर(जयंत नगरी), संख, उमदी, उमराणी(प्राचीनकाळी उंबरवनी), माडग्याळ (प्राचीन नांव माडगीहाळ), सिंगनहळ्ळी, लोणार,डफळापूर ही व अन्य अनेक गांवे प्राचीन आहेत. सुमारे साडेसातशे वर्षापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या इतिहासात पराक्रमाचा ठसा उमटविणारे देवगिरीचे राजे सिंघनदेव आणि संकमदेव यादव या तालुक्यात येऊन गेलेले आहेत.त्यांच्या नांवाने ओळखली जाणारी सिंघनहळ्ळी व संख अशी गांवे आजही या तालुक्यात आहेत.विशेष म्हणजे सिंघनहळ्ळी या लोणारीबहूल गावात लोणारी समाजाची लोकसंख्या ९०%च्या आसपास आहे.तर संख व परिसरातील गोंधळेवाडी, सोरडी, आसंगी, जाल्याळ, दरिबडची, माणिकनाळ, खंदनाळ या गावात लोणारी समाजाची लोकसंख्या दखलपात्र आहे.तर सिंघनहळ्ळी या ऐतिहासिक गावाच्या शेजारी लोणारवाडी (वाळेखिंडी), काशिलिंगवाडी, बागलवाडी ही अशीच लोणारीबहूल गावे आहेत.जत ही महात्मा बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमि आहे. म्हणून जत तालुक्यात हिंदू लोणारी बरोबर लिंगायत-लोणारी समाजाची संख्याही लक्षणीय आहे.

खुद्द जतमध्ये श्रीबंकेश्वर,माडग्याळमधील श्री महादेव आणि उमराणीतील हेमलिंगेश्वर ही मंदिरे अतिप्राचीन असून तीनही ठिकाणी प्राचीन हळेकन्नड किंवा कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. अलीकडेच गुगवाड येथेही एक कन्नड शिलालेख आढळून आले आहे.त्यावरून जत तालुक्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा पराक्रम या तालुक्याने पाहिलेला आहे.विजापूरच्या आदिलशाहाचा सरदार बहलोलखान याच्या चतुरंग सैन्याचा प्रतापराव गुजर यांनी उमराणीजवळ पराभव केला आणि बहलोल खान शरण आला. जतच्या डफळे घराण्याशी सुमारे चारशे वर्षाच्या पराक्रमाचा इतिहास जोडलेला आहे.राजस्थानमधील पराक्रमी दुधात हाडा चौहान राजपूत वंशाबरोबर जतच्या डफळे घराण्याचा इतिहास निगडित आहे.डफळे घराण्याला  सर्जनसिंह, शामलसिंह, शार्दूलसिंह, सटवाजी अशा पराक्रमी पुरुषांची परंपरा या घराण्याला आहे.

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्याची एक स्वतंत्र गादी आहे.डफळे घराण्याचे संस्थापक श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते.श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सुनबाई राणी येसूबाई यांनी १७०७ ते १७३८ सालापर्यंत डफळे संस्थानाचा राज्यकारभार एकहाती सांभाळला. १७३८ साली राणी येसूबाई यांनी आपले सावत्रदीर खानाजीराव यांच्या चारही मुलांना दत्तक घेतले.दत्तकानंतर यशवंतराव, रामराव,भगवंतराव व मुकुंदराव हे डफळे संस्थानाचे वारस झाले.या चारही मुलांना राणी येसूबाई यांनी आपली जहागिरी वाटून दिली.थोरले यशवंतराव यांना जत,दुसरे रामराव यांना डफळापूर,तिसरे भगवंतराव यांना उमराणी तर सर्वात लहान असलेले मुकुंदराव यांना सध्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात असलेल्या हुलजंतीची जहागिरी दिली.

पूर्वीच्या जत संस्थानातील पण नंतरच्या हुलजंती संस्थानातील अर्थात आताच्या मंगळवेढा तालुक्यातील "लोणार"या गांवात प्राचीनकाळी जमिनीतून मीठ काढण्याची पद्धत होती."लोणार"या गांवाचा तशा खनिज मिठासंदर्भात अभ्यासकांनी प्राचीन शिलालेखात उल्लेख केलेला असल्याची माहिती इतिहास अभ्यासक चिंतामणी सहस्रबुद्धे यांच्या "इतिहासाची सुवर्णपाने"या पुस्तकात केलेला आहे.माडगीहाळ किंवा मडीहाळ(आज माडग्याळ ता.जत)येथील महादेव मंदिरातील शिलालेखही (२७ जानेवारी ११७२,नंदन संवत्सर शके १०९३) प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतो.या ठिकाणी माडग्याळचा मालिंगे असा उल्लेख आहे,याशिवाय वासुबिंगे(वासुंबे ता.तासगांव)लोणार ता.जत आणि कोळनूर या गांवाचा उल्लेख आहे.पण "लोणार"या पूर्वीच्या जत संस्थानातील गांवात १२ व्या शतकात खनिजमातीपासून मीठ काढले जात होते,असा शिलालेखात उल्लेख आहे.

Wednesday, October 28, 2020

वज्रवाड येथे 650 वर्षांपूर्वीचा शिलालेख


जत तालुक्यातील वज्रवाड येथे ओढ्याच्या काठावर बसवेश्वर मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिक असून चालुक्यांच्या काळात बांधण्यात आले असावे,असे इतिहासकार सांगतात. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून सभामंडप ,अंतराळ आणि गर्भगृह अशा तीन भागात उभारलेले आहे. परंतु  जुना सभामंडप नष्ट झाला आहे तर अंतराळ आणि गाभारा शिल्लक आहे. अंतराळ भागात दगडी भिंतीवर हळे कन्नड भाषेतील एक शिलालेख कोरला आहे. 12 ओळींचा हा शिलालेख तीन टप्प्यात आहे. मात्र या लेखावर ऑईलपेंटने रंगवण्यात आल्याने तो अस्पष्ट झाला होता. हा ऑईलपेंट काढण्यात आल्यानंतर त्यावरील अक्षरे सुस्पष्ट दिसू लागली. सदर शिलालेखाचा अभ्यास मिरज येथील इतिहास अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा.गौतम काटकर यांनी वज्रवाड येथे येऊन केला. हंपी येथील डॉ.कलवीर मंवाचार्य यांच्याकडून त्याचे वाचन करून घेण्यात आले. 1371 मध्ये या बसवेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.त्याचीच नोंद करण्यासाठी हा लेख कोरून ठेवण्यात आला. यावं काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता नष्ट होऊन मुस्लिम राजसत्तेचा अंमल या भागावर होता. अशा काळात या मंदिराचा जीर्णोद्धार वज्रवाड येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाळ शेट्टी यांचा मुलगा याने केला. सदर मूळ मंदिर म्हणजे शिवालय आहे. सध्या मात्र बसवेश्वर मंदिर या नावाने ते ओळखले जाते. या मंदिराची रचना आणि बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असून ते उत्तर चालुक्यांच्या काळात बांधलेले असावे. 

वज्रवाड येथे जो शिलालेख सापडला आहे. त्या लेखात तत्कालीन प्रसिद्ध अशा वीरवणज या व्यापारी श्रेणीचा म्हणजे संघटनेचा उल्लेख आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या या गावात आढळलेल्या या शिलालेखामुळे सांगली जिल्ह्याच्या इतिहासात अभ्यासकांच्या दृष्टीने एक नवी भर पडली आहे. या व्यापाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आणि जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती या शिलालेखाच्या अभ्यासातून स्पष्ट होते.

या शिलालेखात शके 1293 मध्ये साधारण नाम संवत्सराच्या फाल्गुन शुद्ध द्वितीयेला रोहिणी नक्षत्र असताना सिद्धनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ शेट्टी यांच्या मुलाने केला असल्याचे म्हटले आहे. तीन फेब्रुवारी सन 1371 अशी इंग्रजी तारीख येते. हे शिवालय असून त्याच्या अंगभोग आणि रंगभोगासाठी काही जमीन ब्राह्मणांना दान देण्यात आली आहे. शेवटी हा शिलालेख नष्ट करू नये, अशा आशयाचे वाक्य लिहिले आहे. सांगली जिल्ह्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दृष्टीने या लेखाचे महत्त्व आहे.

Sunday, September 27, 2020

उमराणी येथील डफळे सरकार यांचा वाडा


जतच्या दक्षिणेला  कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धीस आलेले  उमराणी गाव आहे.  प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धीस आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे.  इ.स. १६७३ साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने  महाराज पन्हाळगडावर असताना अदिलशाही सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता  समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस खानावर रवाना केले. त्यांना आज्ञा दिली की “खान वलवल भारी करतो, त्यास मारोन फते करणे. महाराजांच्या आज्ञेनुसार  प्रतापराव बहलोलखानावर चालून गेले. यावेळी बहलोलखानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील डोण नदीकिनारी होता. मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने त्यावर हल्ला केला. पाण्याशिवाय कासावीस झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता. बेहलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. शरण आलेला बहलोलखान मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला.  हि बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले. महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते. बहलोलखान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती. त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून “सला काय निमित्य केला?  असा जाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत, सेनापतीसारखे वागला नाहीत अशी प्रतापरावांची निर्भर्त्सना केली. या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच नेसरी खिंडीत प्रतापराव यांचे बलीदान नाट्य घडले. याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे  पाटील सटवाजी चव्हाण यांनी  १६८० च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर  डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले.  संभाजीराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईत आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे  स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता. १८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. उमराणी गाव सांगली शहरापासुन ८३ कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून  २० कि.मी. अंतरावर आहे. जत संस्थाना अंतर्गत उमराणी हे एक महत्वाचे ठिकाण असल्याने डफळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे. उमराणी गावात आजही राजे डफळे यांची गढी असुन त्यांचे वंशज तेथे वास्तव्य करून आहेत.  सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात  हि गढी बांधली गेली असावी. साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेली हि गढी चौकोनी आकाराची असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. सध्या या गढीचा वापर डफळे यांचे वंशज करत असुन त्यांनी या गढीला तिच्या मूळ स्वरुपात कायम ठेवले आहे. गढीबाहेर दरवाजा शेजारी आपल्याला गजलक्ष्मी  शिल्प पहायला मिळते. गढीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असुन या गढीच्या  चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात दगडात बांधलेली  खोल विहीर असुन डफळे यांचा चौसोपी वाडा आहे.  गढीतील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ  स्थितीत बांधकामातील लाकडावर अतिशय सुंदर कोरीवकाम केले आहे. वाड्यात राजे डफळे यांचे वास्तव्य असल्याने मर्यादित भागात प्रवेश दिला जातो.  गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. उमराणी गढी व आसपासचा परिसर  पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.



Saturday, September 12, 2020

सामुहाहिक विवाहाची मुहूर्तमेढ रोवणारे संगतीर्थ


महाराष्ट्र-कर्नाटकतल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. धानम्मादेवीच्या विवाहस्थळाला म्हणजेच संगतीर्थ(वळसंग) या धार्मिक स्थळाला श्रावण मासात भाविक मोठ्या संख्येने भेट देऊन तृप्त होतात.जतसारख्या दुष्काळ ओसाड भागात काहीशा दरित वसलेले हे निसर्गरम्य तीर्थक्षेत्र म्हणजे वाळवंटातले ओअ‍ॅसिस म्हटले पाहिजे. श्रावणात भाविकांबरोबरच शाळांच्या सहलीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात.

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी जत तालुक्यातले श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील धानम्मादेवीचे मंदिर म्हणजे एक जागरूक देवस्थान मानले जाते. महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातले लाखो भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात. गुड्डापूरला भेट देण्याआधी भाविक संगतीर्थला आवश्य भेट देतात.वळसंग गावापासून सोरडी मार्गावर अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर संगतीर्थ आहे. धानम्मा हिचा जन्म उमराणी गावचा असला तरी  संगतीर्थ इथे तिने 21 दिवस तपश्‍चर्या केली. हा काळ बाराव्या शतकातला असून ज्या वडाच्या झाडाखाली धानम्माने तपश्‍चर्या केली, ते झाड आजही इथे दिमाखात उभे आहे. त्याच्या थंडगार सावलीखाली विसावा घेणार्‍या भाविकांना एक प्रकारे धार्मिक समाधान मिळते.

धानम्माच्या तपश्‍चर्येमुळे भाविक तिच्या दर्शनाला येत राहिले. मात्र या वाळवंट परिसरात पाण्याचा थेंबदेखील नव्हता.  लोकांच्या सांगण्यावरून धानम्माने इथे शंख फुंकला आणि इथे गंगा अवतरली, अशी अख्यायिका आहे.त्यामुळे या ठिकाणाला संखतीर्थ म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन संगतीर्थ असे नाव या क्षेत्राला पडले. या मंदिराचा पायथ्याशी जिवंत झरा असून बारमाही या ठिकाणी पाणी असते. त्यामुळे या परिसरातल्या लोकांना , भाविकांना पाण्याची टंचाई कधी भासली नाही. इथले पाणी प्यायला गोड, मधुर आहे. भाविक पिण्याच्या बाटल्या भरून तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात.

धानम्मा पुढे कुडलसंगम(कर्नाटक) इथे गेली. तिथेही तिने तपश्‍चर्या केली. पुढे कुडलसंगमचा सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचा विवाह संगतीर्थ इथे झाला. या ठिकाणी 501 जोडप्यांचा सामुदायिक विवाह पार पडला. त्यात सोमेश्‍वर आणि धानम्मा यांचाही समावेश होता. ही सामुदायिक विवाहाची मुहूर्तमेढ होती. त्यानंतर इथे सामुदायिक विवाह होऊ लागले. आजही इथे विवाह होतात. श्रावणात दरवर्षी तिसर्‍या सोमवारी इथे अक्षता पडतात. भाविक धानम्माचा विवाह उत्सव साजरा करतात. या ठिकाणी वडाच्या पारंब्यातून निर्माण झालेल्या खोडाला श्री गणेशाची स्वयंभू प्रतिमा तयार झाल्याचे आपल्याला दिसते.

हा परिसर निसर्गरम्य असा असून वळसंगच्या श्री. धानम्मा ट्रस्टने भाविकांच्या निवासासाठीही अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बारा महिने याठिकाणी अन्नछत्र (दासोह) उघडण्यात आले आहे. भाविक मोठ्या भक्तीभावाने त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेतात. पावसाळ्यातली किंवा श्रावणातील सहकुटुंब छोटी सहल म्हणून या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला काहीच हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

Monday, July 6, 2020

जालिहाळ बुद्रुकची स्मार्ट व्हिलेजच्या दिशेने वाटचाल

ग्रामविकासाच्या अनेकजण गप्पा मारतात, सरकारी पातळीवर तर रामराज्यापासून स्मार्ट व्हिलेजपर्यत अनेक घोषणा झाल्या पण देशातील व महाराष्ट्रातील खेडी सुधारणांपासून, विकासापासून कोसो मैल दूर राहिली, स्थलांतर होत राहिली. शहरात गर्दी वाढली. ना ग्रामविकास ना शैक्षणिक सुधारणा, ना शेतीला पाणी, ना हाताला काम. पूर्वजन्मीचं पाप म्हणून कायमस्वरूपी दुष्काळी भागात जन्माला यायचं आणि दुष्काळी पट्ट्यातच विकासापासून वंचित आयुष्य कसं बसं ओढायचं असं निराश, हताश जीवन जगणाऱ्या जनतेला एक आशेचा दीप गवसलाय येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि जालिहाल पॅटर्न.

Monday, June 15, 2020

विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी

मराठी समीक्षेतील एक बलदंड नाव म्हणजे डॉक्टर भीमराव कुलकर्णी हे होय. ते आपल्या जतचे असल्यामुळे समस्त सांगली जिल्हयाला त्यांच्याबद्दल अत्यंत रास्त असा अभिमान आहे. प्रतिकुल परिस्थितीशी झगडत झगडत त्यांनी शिक्षण घेतले. जिद्दीच्या बळावर उच्चशिक्षण घेतले. पुण्यासारख्या
विद्यानगरीत अव्वल दर्जाचे व्यासंगी प्राध्यापक असा
लौकीक प्राप्त केला आणि वा. ल. कुलकर्णी, गो.
म. कुलकर्णी अशा दिग्गज समीक्षकांच्या पंक्तीत आपलेही मानाचे पान निर्माण केले. आणि हे जे सारे त्यांनी केले ते केवळ स्वबळावर साध्य केले म्हणून त्यांचे आजही अप्रूप वाटते. विद्यावाचस्पती भीमराव कुलकर्णी यांच्या अकाली निधनाचा त्यावेळी मराठी समीक्षा क्षेत्रावर मोठाच आघात झाला होता.

दुष्काळी भागाचा आधार दोड्डनाला तलाव

जत तालुक्यातील उमदी,उटगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, निगडी बुद्रुक या गावांना जलस्वराज्य व भारत निर्माण अंतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित आहे. मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला मात्र दोड्डनाला तलावातील पाण्याचा उपयोग होत आहे. जत तालुक्यासह सर्वत्र1972 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे इथल्या लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. खायला अन्न नव्हते, अशा परिस्थितीत शासनाने 1985 च्या दरम्यान मध्यम प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

मांसासाठी प्रसिध्द माडग्याळी मेंढी

राज्यात मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘माडग्याळ’ मेंढीच्या संवर्धनासाठी तिचे उगमस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातील माडग्याळ (ता. जत) गावात संशोधन व संवर्धन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. देशातील अधिक मांस उत्पादन देणाऱ्या मेंढ्यांच्या जातींपैकी ‘माडग्याळ’ ही जात आहे. त्यामुळे ‘माडग्याळ’चे संगोपन व संवर्धन केल्यास राज्यातील मांस उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळेल, असा हेतू आहे.

Saturday, June 6, 2020

जत परिसरातील रूढी,परंपरा

शुद्ध शाकाहारी बनाळी
जतपासून अवघ्या 10-11 किलोमीटर अंतरावर असणारं बनाळी गाव. 40 एकर जमिनीवरील झाडीत हे गाव वसलेलं आहे. हे बनशंकरी देवीचं जागृत देवस्थान. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडत नाही. कारण कोणी मांसाहार केलेला येथील देवीला चालत नाही. जर तो कोणी केला तर त्याच्यावर येथील मधमाशा हल्ला चढवितात,असं सांगितलं जातं. गावात जाणारा पाहुणा असला तरी तो यातून सुटत नाही. अशा अनेक घटना गावात घडल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भितीपोटी गावात कुणीही मांसाहार करत नाही. शिवाय मांसाहार करून कोणी गावाच्या शिवारात पाऊल ठेवत नाही. शिवाय गावात होणारा नवरात्र उत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसात गावातील लोक कडकडीत उपवास करतात या दिवसात हे लोक साधं पाणीही पीत नाहीत.

जत पंचायत समितीची वाटचाल


जत पंचायत समितीची स्थापना 1962 मध्ये झाली. तालुक्यात 124 महसुली गावे असून 117 ग्रामपंचायती आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुका भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. पूर्व-पश्चिम लांबी 120 किलोमीटर, तर दक्षिण उत्तर लांबी 67 किलोमीटर इतकी आहे. पंचायत समितीची स्थापना झाल्यानंतर स्वतःची प्रशासकीय इमारत नव्हती. त्यामुळे जत शहरातील महाराणा प्रताप चौकालगत असलेल्या बनाळी यांच्या भाड्याच्या इमारतीत पंचायत समितीचे सुरुवातीला कार्यालयीन कामकाज सुरू झाले होते. 1968-69 दरम्यान जत तहसील कार्यालयालगत जत पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम बांधकाम व्यावसायिक खान यांनी पूर्ण केले.

डॉ.खोचीकर यांच्या संशोधनाला जागतिक संदर्भ कोषात स्थान

जत तालुक्याचे सुपुत्र असलेले डॉ.मकरंद खोचीकर यांनी मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाविषयी केलेल्या संशोधन आणि उपचाराविषयक माहितीचा जागतिक पातळीवर मानाचा समाजाला जाणारा वैद्यकीय क्षेत्रातील 'सर्जरी कोअर प्रिन्सिपल प्रॅक्टिस' या संदर्भ कोष ग्रंथात समावेश करण्यात आला आहे. पनामा (अमेरिका), लंडन व दिल्ली येथे काही वर्षांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. मूत्राशयाशी संबंधित अवयवांना होणाऱ्या कर्करोगाचे निदान व सर्जरीविषयक मूलभूत संशोधन ते गेली वीस वर्षे करत होते. आज ते सांगलीतील युरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत.

Thursday, June 4, 2020

जत तालुक्याची हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल

जत तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 2 लाख 24 हजार 824 हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र 1 लाख 58 हजार 700 हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र 65 हजार 700 हेक्टर तर रब्बीचे 93 हजार 300 हेक्टर क्षेत्र आहे. गायरान क्षेत्र 2 हजार 667 हेक्टर, मुलकी पड क्षेत्र 1 हजार970.73 हेक्टर आहे. तालुक्यातील एकूण बागायती क्षेत्र 22 हजार75 हेक्टर तर जिरायती क्षेत्र 62 हजार299 हेक्टर आहे.  जत तालुक्यातील एकूण महसूल गावे 123 आहेत. ग्रामपंचायती 117 आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 427.5 मि. मी. इतके आहे. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. 25 वर्षांपूर्वी शेती ही उदारनिर्वाहापुरती केली जात होती. ही शेती फक्त पावसाच्या भरवशावर केली जायची. अन्नधान्ये, कडधान्ये व गळीत धान्याची पिके घेतली जात होती. पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असल्याने मिळणारे उत्पन्न अत्यल्प होते.

लेखन परंपरेच्या पाईकांची भूमी


कडलास आणि आलेगाव या सांगोला तालुक्यात वास्तव्यास राहून जत तालुक्यातील येळवी गावात वास्तवास आलेला बाळकृष्ण कावडे यांचा कार्यकाला नक्की कोणता? याचे उत्तर आज तरी मिळत नाही. संपूर्ण शाकाहारी गाव आणि बनशंकरीचा सहवास या गोष्टीचे आकर्षण निर्माण झाल्याने हे बाळकृष्णबुवा बनाळीत स्थायिक झाले. त्यांनी या गावात
एक मठही बांधला. जीर्ण आणि भग्न अवस्थेत हा मठ आजही बाळकृष्ण बुवाच्या वैभवाची आणि कार्याची जाणीव करून देतो आहे. या बाळकृष्ण कावडे बुवांची पाचवी पिढी जगण्यासाठीचा संघर्ष करीत असली तरी त्यांचा शिष्य असणारे काराजनगी येथील कीर्तनकार आणि शाहिरी कवने करणारे मार्तड कुलकर्णी यांची शेकडो कवने आपल्या संशोधनाचा विषय केला आहे.

Wednesday, June 3, 2020

द्राक्ष शेतीवर आधारित लघु उद्योग उभारण्याची गरज

जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. महाराष्ट्र व
कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या या तालुक्यात निसर्गाची अवकृपा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तालुक्यातील तीस हजार शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबासह दरवर्षी नदीकाठी उसतोडणीसाठी जावे लागते. मात्र या तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासावर द्राक्ष व डाळिंब बागेच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये या तालुक्यात येत आहेत.

डाळींब: दुष्काळातील लाल क्रांती

जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळींब उत्पादनाकडे वळण्यापूर्वी बोर पिकवण्याचा प्रयोग केला होता. बोराच्या उत्पन्नात चार-सहा वर्षे चांगली मिळकतही झाली. हा काळ होता 1990-95 चा. पण ग्रामीण शेतकऱ्यांची अनुकरण करण्याची कृती या बोरांना नंतर योग्य भाव मिळण्यास अडसर ठरू लागली. बोर पिकावर कोणतीही प्रक्रिया करण्याची त्यावेळी तरतूद नसल्याने आणि  बारमाही उत्पन्नापेक्षा एका ठराविक काळातच उत्पन्न घेण्याची पध्दत असल्याने बोरांची आवक वाढत गेली. अर्थातच मग याचा परिणाम दरांवर झाला आणि दर घसरू लागले. १९९० च्या दशकाच्या सुरवातीला किलोमागे १५ ते २० रूपये भाव देणारी बोरं या दशकाच्या अखेरीस रस्त्यावर ओतण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ग्रामपंचायत ते नगरपरिषद

महाभारत, रामायण आणि इतिहासकालीन दाखले देणारे शहर म्हणून जत शहराकडे पाहिले जाते. आज जत हे शहर तालुक्याचे ठिकाण असले तरी  संस्थानकालीन राजवटीचा वेगळा ठसा व वारसा जत शहराला लाभला आहे. जत येथे संस्थानकाळात १८९३ साली नगर पालिकेची स्थापना करण्यात आली होती. संस्थानानंतर जतच्या नगरपालिकेचे ग्रामपंचायतीत रूपांतर झाले.  १९४९ मध्ये जत संस्थानने प्रजासत्ताक राज्य पध्दतीचा स्वीकार करत संस्थानचे विलिनीकरण केले. त्यानंतर ३० मे १९५३ साली ग्रामपंचायतीची स्थापन झाली.

जत तालुक्याचा लेखा-जोखा

समुद्र सपाटीपासून 917 मीटर उंचावर उगम पावणारी माणनदी 163 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर तालुक्यातल्या सरकोली गावाजवळ भिमानदीस मिळते. सरकोली गावाजवळ जिथे माण आणि भीमा यांचा मिलाफ घडतो ते ठिकाण समुद्र सपाटीपासून 416 मीटर उंचावर आहे.सातारा जिल्ह्यातील माण, दहिवडी, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा तालुक्यातील काही भाग, सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्यातील काही भाग, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुका या माण नदीच्या खोऱ्यात येतात. इतिहासात या माण नदीच्या खोऱ्यातील प्रजा किती सुखी आणि समाधानी होती याचे दाखले मिळत असले तरी बदलत्या जगाच्या राहाटीने माणदेश कसा बदलत गेला, याचे स्वातंत्र्य पूर्व काळातले चित्रणही माडगूळकरांच्या 'बनगरवाडी' या साहित्यकृतीने केले आहे. ही माणसे आणि त्यांची गुण वैशिष्ट्ये पाहण्यासाठी व्यंकटेश माडगूळकरांचा 'माणदेशी माणसं' वाचली पाहिजेत.

Monday, June 1, 2020

शिक्षण क्षेत्रातील मानबिंदू राजे रामराव महाविद्यालय

केवळ 70 विद्यार्थी आणि कला, वाणिज्य या शाखा चालू झालेल्या जत येथील राजे रामराव महाविद्यालयात आज कला, वाणिज्य आणि विज्ञान त्याचबरोबर संगणक, व्यवसाय शिक्षण ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारख्या विद्या शाखांचे ज्ञानदान होते.तीन हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शेकडो शिक्षकांची संख्या आहे. हे महाविद्यालय म्हणजे जतच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू ठरले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील श्री रामराव विद्यामंदिर

जतचे संस्थानाधिपती कै.अमृतराव महाराज १८८० ते ८४ दरम्यान ब्रिटीशांच्या नजरकैदेत होते. ते नजरकैदेत असताना प्रजेच्या हिताच्या दृष्टीने मौलिक स्वरूपाचे विचारमंथन करून नजरकैदेतून सुटका होताच १८८५ साली त्यांनी जत शहरात इंग्रजी शिक्षणाचा पहिला वर्ग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. हीच श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलची स्थापना होय. प्रारंभी या विद्यामंदिरचे नाव ‘ए. व्ही. हायस्कूल' असे होते. नंतर काही वर्ष जत हायस्कूल असेही नाव होते. सुरुवातीला मराठी शाळेत व नंतर बंकेश्वर मंदिरात या शाळेचे वर्ग भरत. इंग्रजी शिकवणारे शिक्षक त्याकाळी मिळणे कठीण होते. तसेच जागा, साधनसामुग्रीचा अभावही होता. तरीसुध्दा न खचता शिक्षणाचा डोलारा वाढविण्याचा अविरत प्रयत्न सुरूच होता.

करजगीचा जुनेदीबाबा दर्गा

जत तालुक्यातील कराजगी येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या जुनेदी बाबांच्या दर्ग्यास सहाशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. जुनेदी बाबा हे धर्मप्रसारासाठी भारतात आले होते. हा अतिशय जुना दर्गा असून तो आदिलशहाच्या काळातील असल्याचे सांगण्यात येते. या दर्ग्याविषयी आणि जुनेदी बाबांच्या इतिहासाचे आज संशोधन होणे आवश्यक आहे.

नवसाला पावणारे वळसंगचे श्री केंचराया

जतपासून ११ किलोमीटरवर जत–सोलापूर मार्गावरील वळसंग येथे श्री. केंचराया यांचे भव्य मंदिर आहे. सात वाडया-वस्त्या एकत्रित करून वळसंग गावाची निर्मिती झाली असून ते कार्य सिध्दपुरुष जोगसिध्द यांनी केले आहे. वळसंग येथे श्री केंचराया प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. कुर्म, मत्स्य, वराह, वामन, नरसिंह, वाम, परशुराम, कृष्ण, बौध्द व कलंकी हे अवतार संपल्यावर श्री विष्णूंनी क्षिरसागरात शयन केले. त्यानंतर विष्णूच्या इच्छेने हाल मताच्या ठाईत अवतार इच्छा होवून या हालमताच्या ठाईतील भक्ताकडून सेवा करून घेण्याच्या इच्छेने अवतार घेतल्याचे आख्यायिका सांगितली जाते.

उमदीचे जागृत श्री मलकारसिद्ध

उमदी येथील मलकारसिद्ध देवस्थान हे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा देव म्हणून त्यांची ख्याती आहे. या देवाचा यात्रोत्सव वर्षातून दोन वेळा होतो. भिवर्गी हे मलकारसिद्धांचे मूळ गाव. श्री अमोगसिद्ध देवाच्या औदुसिद्ध, बिळयासिध्द, स्वामाणमुथ्या, कन्नमुथ्या या चार मुलांपैकी कन्नमुथ्या यांचा मुलगा मलकारसिद्ध होय. मलकारसिद्ध देवाला पाच भाऊ आणि एक बहीण होती. करियोगसिद्ध (ता.अथणी), यददनगेरी मलकारी (ता. बागलकोट), कुचनूर मादण्णा (ता.जमखंडी), उमदी मलकारसिद्ध (ता.जत),जोतलकाप्पा उमदी (ता.जत), आरकेरी भ्रमवडियर (ता.विजापूर) व एक बहीण गुबव्वा.

Sunday, May 31, 2020

लेखक,पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे

जत तालुक्याच्या साहित्य क्षेत्रास फार मोठी परंपरा नाही. ज्या मोजक्याच साहित्यीकांनी लेखक केले, त्यांनी आपल्या नावाचा सुस्पष्ट ठसा उमटविला आहे. त्यापैकी एक आहेत, मच्छिंद्र गोरखनाथ ऐनापुरे. प्राथमिक शिक्षक, अभ्यासू पत्रकार व साहित्यीक म्हणून त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे. जत तालुक्यातील ते असे एकमेव साहित्यिक आहेत, ज्यांची पाठ्यपुस्तक मंडळाने घेतली आहे. बालकथा, विनोदी कथा, व्यक्तीचित्रे व वृत्तपत्र लेख असे त्यांनी विपुल लेखन केले आहे.

बिळूरचे अतिप्राचीन काशी काळभैरव मंदिर

जत तालुक्यातील बिळूर येथील काशी काळभैरव मंदिरास अनेक वर्षांचा इतिहास आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. राज्यासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बिळुरचा काळभैरव हा भक्तांच्या हाकेला धावुन जातो. 'हरभंडी' या थरारक शर्यतीमुळे या मंदिराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील काळ्या कुळकुळीत पाषाणातील चमकदार नंदी व आतील शिवलिंग सुमारे ७०० ते ८०० वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. कलचुरी व यादव राज्याच्या काळात जी मंदिरे बांधण्यात आल्याची आढळतात. त्यातील हे एक अतिप्राचीन मंदिर आहे. सध्या हे जुने मंदिर पाडून त्याठिकाणी कोट्यवधी रूपयाचे नवे नियोजीत मंदिर बांधण्यात येत आहे.

दुष्काळातलं नंदनवन बनाळीची बनशंकरी

पूर्वी होती सुंदर वनराई
तिथे प्रकटली शाकंभरी आई!
महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या बनाळीच्या श्री बनशंकरी देवीचे मूळपीठ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बदामीजवळ चोलचगुड येथे आहे. देवीचे उपपीठ जत तालुक्यातील बनाळी येथे आहे. बनाळीतील हे मंदिर हेमाडपंथी असून हे मंदिर रामदेवराव यादव यांच्या कालखंडातील आहे. बनात वसलेले हे मंदिर अतिशय रमणीय ठिकाणी असून याठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होते.

Saturday, May 30, 2020

महाशरणी गुड्डापूरची श्री दानम्मा देवी

महाशरणी दानम्माचे जीवनकार्य अनेक दिव्य भव्य अशा घटनांनी भरलेले असून वीरशैव लिंगायत धर्म संस्थापक श्री बसवेश्वरांच्या समकालीन असणाऱ्या श्री दानम्मादेवीची आख्यायिका सांगितले जाते.

Friday, May 29, 2020

जत तालुक्यातील गावांच्या नावाचा इतिहास

कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जत तालुक्याला प्राचीन आणि ऐतिहासिक मोठा वारसा लाभला आहे. अतिशय जुनी गावे येथे आहेत. आज या तालुक्यात १२० गावे आणि २५० हुन अधिक वाड्यावस्त्या आहेत. या सर्व गावांची नावे आणि त्यांचा इतिहासही वेगळा आहे. सर्वच गावांच्या नावाला इतिहास आहे. प्रत्येक गावाच्या नावाला काही ना काही इतिहास आहे. यातील काही निवडक गावांची नावे आणि इतिहास....

Thursday, May 28, 2020

भाविकांचे श्रद्धास्थान: भाऊसाहेब महाराज उमदीकर

श्री निंबरगी महाराज व श्री भाऊसाहेब महाराज यांचा उल्लेख साक्षात तुकाराम महाराज असा केला जातो. भाऊसाहेब महाराजांची योग्यता मोठी होती. त्यांनी नामाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवले. नाम निंबरगी महाराजांनी स्वर्गातून आणले आहे,तेच नाम आपण भक्तांना देत आहोत असे ते सांगत. भाऊसाहेब महाराजांबद्दल भक्ती आहे. त्यांच्या संदर्भात कथा व दृष्टांत दिले जातात.

Wednesday, May 27, 2020

जत वाचनालय:गौरवशाली परंपरा

आर्थिक चढउतार, युद्ध परिस्थिती, प्लेगची साथ, महागाई, उदासिनता, विरोधकांच्या कुरघोड्या या सर्वांवर यशस्वी मात करून जतच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे, तो जत वाचनालयाने! तब्बल 135 वर्षे हा ज्ञानदीप अखंडपणे जळत असून आजपर्यंत लाखो वाचकांना ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम अविरत सुरूच आहे.

Tuesday, May 26, 2020

स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर सोन्याळ

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा लढा असो अथवा स्वातंत्र्यानंतरचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा किंवा गोवामुक्ती संग्राम असो त्याचबरोबर भूमिहिनांचा सत्याग्रह असो या साऱ्या लढ्यात जत तालुक्यातील सोन्याळ गावचे योगदान मौलिक आणि दखलपात्र आहे. या गावाने विशेषतः काराजनगी कुटुंबीयाने या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा बनून गावाचे नाव इतिहासात कोरले  आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला तालुक्यातील एकमेव राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा साक्ष देतो आहे.

Monday, May 25, 2020

जत शहरातील मंदिरे

जत शहराला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. संस्थान काळापासून आजतागायत जतची यल्लम्मा यात्रा भरते. डोंगरावरील अंबाबाईचे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेते तर जत शहराच्या मध्यभागी असलेला जतच्या चिनगीबाबांचा दर्गा व त्यांच्या बाजूला असलेले १०० वर्षापूर्वीचे राम मंदिरात आजही भाविकांनी फुललेले असते. भीमाने स्थापन केलेले बकेश्वर मंदिर हे जतच्या वैभवात भरच घालत आहे.

Friday, May 22, 2020

उमराणी गावाचा वैभवशाली इतिहास

उमराणीचे डफळे म्हणजे जतच्या डफळे राजघराण्यांची एक स्वतंत्र गादी आहे. डफळे घराण्याचे संस्थापक महापराक्रमी श्रीमंत सटवाजीराजे यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांचे पुत्र बाबाजीराजे व खानाजीराजे यांचे निधन झाले होते. श्रीमंत सटवाजीराजे यांच्या सूनबाई राणी येसूबाई यांनी 1706 ते 1738 सालापर्यंत डफळे संस्थानचा एकसूत्री राज्य कारभार सांभाळला.

Thursday, May 21, 2020

भक्तांच्या हाकेला धावून येणारी जतची यल्लम्मादेवी

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेली जत येथील श्री यल्लम्मा देवी ही नवसाला पावणारी, भक्ताच्या हाकेला ओ देणारी म्हणून सर्वदूर प्रसिध्द आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा संस्थानपूर्व काळापासून जतच्या दक्षिणेस दीड किलोमीटरवर असलेल्या गंधर्व नदीच्या काठावर भरते. लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या महात्म्याविषययी भक्तांच्या हाकेला धावून आख्यायिका प्रसिध्द आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक श्री बुवानंद


जतपासून १८ किलोमीटरवर असलेल्या डफळापूरला
ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. तालुक्यातील सर्वच बाबतीत प्रगत गाव म्हणून त्याची ख्याती आहे. जत संस्थानमधील उपराजधानी म्हणून गावाला ओळखले जाते. डफळापूरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम आहे. दोन्ही समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. श्री बुवानंद हे मूळचे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथील सुफी संत होते. धर्मप्रचार प्रसार करण्यासाठी निघालेले श्री बुवानंद हे मजल दरमजल करीत जत तालुक्यातील खलाटी येथील डोंगरावर आले.

भक्ती आणि शक्तीपीठ श्री बिसल सिद्धेश्वर

जत-येळवी रस्त्यावर निर्जन स्थळी योगेश्वर श्री बिसल सिध्देश्वर यांचे असलेले समाधीस्थळ जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर ओळखले जाते. जतसह कर्नाटकातील भाविकांचे शक्तीपीठ, भक्तीपीठ म्हणून उदयास येत आहे. श्री बिसल सिध्देश्वरांचे जीवन चरित्र ९०० वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते. श्री बिसल सिध्देश्वर जतच्या या भुमीत आले कसे? यांची आख्यायिका प्रसिध्द आहे. जतचा हा भाग पूर्वी मिरवाड नावाने ओळखला जात होता. सुंदरतेने नटलेल्या या गावावर नंदेआप्पा गौंड यांचे राज्य होते. राजा नंदेआप्पा गौंड व महाराणी गंगादेवी यांना अनेक वर्षापासून पुत्ररत्न नसल्याने जोडपे दु:खी होते. अनेक वर्षानंतर महालिंगरायाच्या रूपाने राजा नंदेआप्पा व महाराणी गंगादेवी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. पण महालिंगरायाला महारोग झाल्याने ते चिंतेत होते.

Wednesday, May 20, 2020

पवित्र क्षेत्र संगतीर्थ

श्री क्षेत्र गुड्डापूरपासून सात किलोमीटरवर असलेले तालुक्यातील संगतीर्थ हे पवित्र तीर्थस्थान आहे. हे स्थान श्री दानाम्मा व श्री सोमनाथ यांचा विवाह झालेले स्थळ म्हणून ओळखले जाते. हे संस्मरणीय तीर्थस्थान ठिकाण वळसंग ते सोरडी मार्गावर आहे. मानवाच्या कल्याणार्थ बाराव्या शतकात प्रत्यक्ष शिवपार्वतीने मानव स्वरूपात जन्म घेतला व विधी विधानानुसार प्रत्यक्ष शिवपार्वतीच्या म्हणजे सोमनाथ–दानम्माचा लग्नसोहळा येथे झाल्याची आख्यायिका आहे. श्री दानम्माचा जन्म कुंडलसंगम येथे झाला. सोमनाथांबरोबर त्यांचा विवाह निश्चित झाला.

Tuesday, May 19, 2020

महाभारत कालीन मुचंडीचा श्री दरेश्वर




मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे.
महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पूर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता. त्यामुळे या गावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते. जत तालुक्यात मुचंडी येथील श्री दरेश्वराचे मंदिर प्रसिध्द आहे. महाराष्ट्राबरोबर कर्नाटकातील भाविक याठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनास येतात. श्री दरेश्वर देवामुळेच मुचंडी गावास महाभारतकालिन पौराणिक इतिहासही असल्याचे सांगितले जाते. पुर्वी येथे मुचकंदेश्वर ऋषींचा आश्रम होता त्यामुळे या
गावास मुचंडी असे नाव पडल्याचे सांगितले जाते.

चालुक्य कालीन माडग्याळचे शिवमंदिर

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जत तालुक्यातील माडग्याळ येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर अतिप्राचीन आहे. प्राचीन काळात मंगळवेढ्याचा राजा  महामंडलेश्वर हेमाडीदेव आणि त्यांची पत्नी पट्टणमहादेवी (चंदला देवी) यांनी त्याकाळी मोठी देणगी या मंदिरासाठी दिल्याची नोंद आहे.

जत जवळील किल्ला:रामदुर्ग

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्यातील रामपुर या गावातील छोट्याश्या टेकडीवर बांधला. किल्ल्याचा आकार, संरक्षणाच्या सोई आणि पाण्याची व्यवस्था पाहाता हा किल्ला प्रशासकीय व्यवस्थेसाठी बांधला असावा असे म्हणता येइल.

जतचा पहिला क्रांतीकारक- वीर सिंदूर लक्ष्मण

भारत स्वतंत्र व्हावा यासाठी देशभरातील लाखो देशभक्तांनी आपल्या जिवाचे रान केले. अनेकांनी निधडया छातीने इंग्रजाच्या गोळया छातीवर झेलल्या, जन्मठेपेची शिक्षा भोगली. जुलमी इंग्रजांच्या ताब्यातून देश स्वतंत्र व्हावा यासाठी हजारो ज्ञातअज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जतसारख्या दुष्काळी व मागासलेल्या भागातही स्वातंत्र्याच्या क्रांतीचे वारे जोरात वाहू लागले होते. याच काळात जत तालुक्यातील सिंदूर येथील लक्ष्मण नामक युवकांने क्रांतीचा झेंडा हाती घेतला व सारे रान, पेटविले. भीम ताकतीच्या या युवकाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.

Monday, May 18, 2020

सरसेनापती प्रतापराव गुजर

स्वामिनिष्ठा, पराक्रमाच्या बळावर आदिलशाहच्या साम्राज्याला सतत हादरा देणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर या विराने आदिलशाहच्या 12 हजार सैन्यांना उमराणीत धूळ चारली. एवढेच नव्हे तर त्यांना शरण येण्यास भाग पाडले. जगात कुठेही झाली नसेल  अशी सात सैनिक विरुद्ध 12 हजार सैन्यांची लढाई मराठयांच्या इतिहासात झाली. या लढाईची सुरुवात जत तालुक्यातील उमराणी येथे झाली. तर शेवट कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे सहा जून 1674 रोजी झाला.

Saturday, May 16, 2020

पराक्रमी डफळे घराणे


सोळाव्या शतकात पराक्रमाच्या जोरावर जी घराणी राज्यकर्ते बनली ,त्यामध्ये जत तालुक्यातील डफळे हे एक घराणे होय. मूळचे राजस्थानातील बांववडे येथील हाडा चौहान या शूर राजपुतांचे ते वंशज. दुदा, शार्दूलराजे व सटवाजीराव हे डफळे घराण्याचे प्रमुख संस्थापक आणि पराक्रमी पुरुष म्हणून इतिहासात नोंद आहे.

प्राचीन आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला जत तालुका

जत तालुक्याला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. अगदी चालुक्य घराण्यापासूनच्या राजांच्या अनेक पाऊलखुणा तालुक्याच्या अंगाखाद्यावर आजही दिमाखाने मिरवीत आहेत.सांगली जिल्ह्यात अनेक संस्थानिक हो ऊन गेले. सांगली, मिरज व तासगाव येथील पटवर्धन घराण्याबरोबरच जतच्या डफळे घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. या संस्थानिकांच्या अनेक महत्त्वाच्या वास्तू आजही आपणास पाहावयास मिळतात.

ऐतिहासिक डफळापूर

जत तालुका आदिलशाहीचा एक भाग होता. त्या काळात डफळापूर हे प्रगत व ऐतिहासिक व वीरांचे गाव म्हणून ओळखले जात होते. गावाला 1200 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. डफळापूर संस्थान काळात उपराजधानी म्हणून ओळखले जात होते. पूर्वी येथील कापूर ओढ्यावर दवनापूर म्हणून उल्लेख आढळतो. डफळापुरातील  चव्हाण (चौहान) हे मूळचे राजस्थान भागातील असून युद्ध करत करत येत ते डफळापुरात येऊन स्थिरावले.